समृद्ध जीवन आर्थिक घोटाळ्यातील महत्त्वाची कागदपत्रे ‘सीआयडी’कडून शासनाधीन !
लोकांना आर्थिक आमीष दाखवून फसवणूक करणार्यांना कठोरात कठोर शासन व्हायला हवे. अल्प वेळात आणि अल्प कष्टात श्रीमंत करून देणार्यांच्या भूलथापांना जनतेने बळी पडू नये.
पुणे – समृद्ध जीवन आर्थिक घोटाळ्याचा उलगडा करणारी महत्त्वाची कागदपत्रे राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (‘सीआयडी’) आर्थिक गुन्हे शाखेने शासनाधीन केली आहेत. एक दुकान आणि दोन सदनिका यांमध्ये ही कागदपत्रे लपवून ठेवली होती. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेळीपालन आणि अन्य व्यवसाय यांची जोड देत त्यातून मोठा आर्थिक लाभ मिळण्याचे आमीष समृद्ध जीवनचे महेश मोतेवार अन् त्यांच्या साथीदारांनी दाखवून राज्यातील शेतकरी तसेच गुंतवणूकदार यांची फसवणूक केली होती. मोतेवार विरुद्ध राज्यात २८ गुन्हे नोंद आहेत. या गुन्ह्यातील १७ जणांना ‘सीआयडी’ने याआधीच कह्यात घेतले असून ८ जण फरारी आहेत. महेश मोतेवार हेही ओरिसा राज्यातील कारागृहामध्ये आहेत.