मुंबई-गोवा महामार्गावर पथकर वसूल न करण्याची शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांची मागणी
सिंधुदुर्ग – मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम अनेक ठिकाणी अपूर्ण आहे. त्यामुळे पथकर (टोल) वसुलीची कार्यवाही करू नये, अशी मागणी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. याविषयी जिल्हा परिषदेचे सदस्य तथा शिवसेनेचे गटनेते नागेंद्र परब यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली आहे.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील तळगाव ते कलमठपर्यंत मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अद्याप अपूर्ण आहे. राजापूर पूल आणि येथील रस्त्याचे बांधकाम अद्याप अपूर्ण आहे. राजापूर तालुक्यात संरक्षक भिंत (रिटेनिंग वॉल) योग्य प्रकारे न झाल्याने अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत, तसेच नांदगाव (कणकवली) येथील उड्डाणपूलाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. या सर्व त्रुटींमुळे, तसेच अपूर्ण आणि सदोष असलेल्या बांधकामामुळे महामार्गाचा वापर करणारे वाहनधारक आणि स्थानिक यांच्यात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे पथकराच्या वसुलीस महामार्ग वापरकर्ते आणि स्थानिक यांचा विरोध आहे. त्यामुळे जनभावनेचा आदर करून सध्या पथकर वसुली करू नये, असे या पत्रकात म्हटले आहे.
खासदार विनायक राऊत जनतेच्या डोळ्यांत धूळफेक करत आहेत ! – प्रमोद जठार, माजी आमदार भाजप
सिंधुदुर्ग – मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पथकर वसुलीची कार्यवाही करू नये, अशी मागणी करणारे खासदार राऊत देहलीत जाऊन पथकर वसुलीचा ठेका स्वतःच्या मुलाला मिळावा, म्हणून प्रयत्न करत आहेत. याचा अर्थ ते जनतेच्या डोळ्यांत धूळफेक करत आहेत. कोकणातील २ लाख बेरोजगारांना रोजगार देणारा केंद्र सरकारचा ‘नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्प’ त्यांनी नाकारला आणि स्वतःच्या मुलाची बेरोजगारी मात्र यांना बघवत नाही, अशी टीका भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी केली आहे.