स्त्रियाच क्रांती करतील !

परात्पर गुरु डॉ. आठवले

अत्रि नाडीभविष्यात सांगितले आहे, ‘हिंदु राष्ट्रासंबंधीच्या पुढील आंदोलनांत स्त्रियांचा सहभाग पुरुषांपेक्षा अधिक प्रमाणात असेल. स्त्रियाच क्रांती करतील !’

– अत्रि नाडीवाचक श्री. व्ही. मुदलियार (माघ कृष्ण पक्ष तृतीया, कलियुग वर्ष ५११४ (२८.२.२०१३))

पुरुषांनो, अहंभाव सोडा !

‘पुरुषांनी हातात (अहंच्या) बांगड्या भरल्यामुळे स्त्रियाच क्रांती करतील’, असे मी १९९४ या वर्षी सांगितले होते. कलियुगात हिंदु राष्ट्राची, म्हणजे रामराज्याची, धर्मराज्याची स्थापना करण्यात आता स्त्रिया पुढाकार घेत आहेत. याची प्रत्यक्ष प्रचीती येत आहे. धर्मराज्याची स्थापना करण्यासाठी आध्यात्मिक बळ अत्यावश्यक आहे. पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये ते अधिक प्रमाणात आहे.

(संदर्भ : परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी लिहिलेला लेख)

पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचा क्रांतीतील सहभाग उल्लेखनीय असेल !

१. स्त्रियांमध्ये भावनाप्रधानता असल्यामुळे त्यांच्या भावनेचा उद्रेक लवकर होणे : स्त्रियांमध्ये भावना अधिक असल्यामुळे क्रांतीसाठी आवश्यक असणारा भावनेचा उद्रेक प्रथम स्त्रियांमध्ये होणार आहे.

२. काळानुसार स्त्रीशक्ती जागृत होणार असणे : स्त्रियांमध्ये श्री दुर्गादेवीची शक्ती सुप्त अवस्थेत असल्यामुळे त्या सौम्य रूपात वावरतात. काळानुसार स्त्रीशक्ती जागृत होणार आहे. जेव्हा स्त्रियांमध्ये सुप्त असणारी श्रीदुर्गादेवीची शक्ती जागृत होऊन कार्यरत होते, तेव्हा स्त्रियांचे रूप उग्र होते. या उग्र रूपाकडून काळानुसार आवश्यक असणारी क्षात्रधर्म साधना होणार आहे.

३. आत्मशक्ती जागृत झालेल्या स्त्रियाच क्रांती करू शकणे : स्त्रियांच्या तुलनेत पुरुष अल्प प्रमाणात धर्माचरण करत असल्यामुळे त्यांची आत्मशक्ती जागृत होत नाही. स्त्रिया धर्माचरण करत असल्यामुळे त्यांची आत्मशक्ती जागृत होते. धर्माचरणामुळे आत्मशक्ती जागृत झालेल्या स्त्रियाच क्रांती करू शकतात.

त्यामुळे पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचा क्रांतीतील सहभाग उल्लेखनीय असेल किंवा स्त्रीशक्तीच क्रांती करेल.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले