स्त्रियांनो, धर्मशास्त्र समजून घ्या !
स्त्रियांनी अंत्यसंस्कार का करू नये ?
एखादी पुत्र नसलेली व्यक्ती मृत झाली असेल, तर त्याच्या कुळातील कोणीही पुरुष अंत्यसंस्कार करू शकतो. स्त्रियांना अंत्यसंस्काराचा अधिकार नाही; मात्र त्यालाही काही अपवाद आहे. उदाहरणार्थ नैसर्गिक आपत्ती किंवा युद्ध यांमुळे पूर्ण कुळच नष्ट झाले असेल किंवा कुळातील पुरुष व्यक्ती दूरदेशी असेल, तर पत्न्यादिकांना अंत्यसंस्कार करण्याचा अधिकार शास्त्राने दिला आहे. धर्मशास्त्रानुसार स्त्रियांना मंत्र म्हणण्याचा अधिकार नाही. स्त्रीची जननेंद्रिये ओटीपोटात असतात. मंत्रांचा उच्चार केल्यामुळे तिच्या प्रजनन क्षमतेवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे ‘त्यांनी मंत्रपठण करू नये’, असे सांगितले आहे. पूर्वीच्या काळी मैत्रेयी, गार्गी या वेदपठण करत असत; मात्र ऋत्विजाचे कोणतेही पद भूषवत नसत, हे लक्षात घ्यायला हवे. अंत्यसंस्काराच्या वेळी मंत्राग्नी देतांना, तसेच पुढील दिवसांचे जे कार्य असते, त्यातही मंत्रोच्चार असतो. त्याचा त्रास स्त्रीला होऊ नये; म्हणून स्त्रीने मंत्राग्नी देऊ नये.’ (संदर्भ : दैनिक सनातन प्रभात)
अध्यात्मशास्त्रानुसार स्त्रियांनी स्मशानात न जाण्यामागील कारणे !
‘स्त्रियांमध्ये प्रजननाची क्षमता असते. स्त्रिया या सृजनशक्तीचे प्रतीक आहेत. स्मशानात लयाची स्पंदने कार्यरत असतात. त्यामुळे त्या लयाच्या स्पंदनांचा त्यांच्या सृजनशक्तीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. स्त्रिया या संवेदनशील असतात. त्यामुळे त्यांच्यावर याचा लवकर परिणाम होतो. स्मशानात त्रासदायक शक्ती असू शकतात. त्याचाही त्यांच्यावर परिणाम होऊ शकतो. या कारणास्तव ‘स्त्रियांनी स्मशानात जाऊ नये’, असे सांगितले जाते.’ (संदर्भ : दैनिक सनातन प्रभात)
पतीच्या निधनानंतर मंगळसूत्र न घालण्यामागील शास्त्र !
जसे मूर्ती भंगल्यानंतर तिच्यातील चैतन्य नष्ट होते, तसे पतीच्या निधनानंतर त्यांच्यातील एकत्व नष्ट झाल्याने मंगळसूत्रातील उद्दिष्टाचे प्रतीक असलेल्या वाट्यांचे महत्त्व रहात नाही. मंगळसूत्र हे विवाहाचे प्रतीक असून विवाहात वर वधुपित्याला सांगतो, ‘धर्म आणि प्रजा यांच्या सिद्धीसाठी मी या कन्येचा स्वीकार करतो.’ तेच विवाहाचे मुख्य उद्दिष्ट आहे. यामुळे पतीच्या निधनानंतर पत्नीचे ते उद्दिष्टच उरत नाही.
‘मंगळसूत्र हे पतीच्या संमतीने आणि त्याच्या हस्ते स्त्रीच्या गळ्यात घातलेले असल्याने मंगळसूत्रात पतीच्या इच्छेशी संबंधित लहरी आलेल्या असतात. पती गेल्यानंतरही स्त्रीने जर नव रुढी (फॅशन) म्हणून अथवा त्याच्याविषयीचा आदर म्हणून मंगळसूत्र घातले, तर या स्पंदनांच्या साहाय्याने तिच्या पतीचा लिंगदेह परत भूमंडलात अडकू शकतो. मंगळसूत्राला पाहिल्यावर स्त्रीला पतीचे स्मरण राहिल्याने पतीला परत भूलोकात यावे लागते. यामुळे पतीच्या लिंगदेहाला गती मिळण्यात अडथळा निर्माण होतो. आजकालच्या बुद्धीवादी स्त्रिया पतीच्या निधनानंतरही ‘नवरा गेला म्हणून काय झाले’ या आविर्भावात मंगळसूत्र घालतात. या कृतीमुळे त्यांच्या वारलेल्या पतीची आणि त्यांची आध्यात्मिक स्तरावर हानी होते; म्हणून ‘हिंदु धर्माने घालून दिलेल्या विधीवत शास्त्रशुद्ध संस्काराचे पालन करणे, यातच आपले कल्याण आहे’, असे समजून धर्मापुढे आपली बुद्धी न चालवता धर्मपालनाकडे कटाक्षाने लक्ष द्यावे.
(सनातनचा ग्रंथ : स्त्रियांच्या अलंकारामागील शास्त्र)
स्त्रियांचा धीरोदत्तपणा !
आपल्या भारतात वैधव्याला स्त्रीजीवनातील मोठा आघात मानला जातोे. अनेक विधवा स्त्रियांनीच पुरुषालाही लाज वाटावी असे पराक्रम, राजकारण आणि समाजसेवा करून त्रिकालबाधीत असे आदर्श प्रस्थापित केले आहेत. शिवरायांच्या मातोश्री जिजामाता, पुण्यश्लोक अहल्याबाई होळकर, वीरांगना झाशीची राणी यांना वैधव्य प्राप्त झाले, तरी त्या खचल्या नाहीत. उलट राजकारण, समाजकारण यात त्यांनी उत्तुंग आदर्श प्रस्थापित केले. परिस्थितीशी झगडण्याची शक्ती आणि जिद्द उपजतच स्त्रियांना निसर्गाकडून प्राप्त झाल्याचे दिसते. त्यामुळे भारतात सहस्रो शेतकर्यांनी परिस्थितीला शरण जाऊन आत्महत्या केल्या; पण त्यांच्या बायकांनी असा अविचार कधी केला नाही. परिस्थितीशी सामना करण्यासाठी जिद्दीने उभ्या राहिल्या. समाजामध्ये आजही अशा अनेक माता आहेत, ज्यांनी वैधव्यानंतरही खूचन न जाता घरसंसार समर्थपणे सांभाळला आणि आपल्या मुला-मुलींना शिकवून मोठे केले. मातृत्वाची महती गायली जाते ती उगीच नाही. उगीच नाही समाजाकडून अशा मातृत्वाचे सत्कार होत ! – श्री. शंकर गो. पांडे, पुसद, जिल्हा यवतमाळ
(साभार : ‘एकता’, मे २०१३)
सर्व मुले लढाईत मारली जाऊनही ‘देशाला अर्पण करण्यास मुलगा नाही’, याची खंत वाटणारी वीरमाता !
एका मातेचे पाचही पुत्र पाकिस्तान विरुद्धच्या लढाईत मृत्यूमुखी पडले. तिचे शेजारी आणि देशाचे नेते तिच्या सांत्वनासाठी आले. त्या वेळी रडत रडत ती त्यांना म्हणाली, ‘‘लढाईमध्ये माझ्या पाचही मुलांचा मृत्यू झाला, याचे मला दुःख वाटत नाही; मात्र देशासाठी आणखी एक मुलगा अर्पण करू शकत नाही, याचे मला दुःख आहे.’’