कास पठारावरील (जिल्हा सातारा) शिवकालीन राजमार्ग खुला करण्यास वनसमितीचा विरोध !
सातारा – कास पठार हे जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समाविष्ट असून कास पठाराला ‘युनेस्को’चे नामांकन प्राप्त झाले आहे. हे नामांकन टिकवायचे असेल, तर कास पठाराचे संवर्धन होणे आवश्यक आहे. कास पठार ते सह्याद्रीनगर हा शिवकालीन मार्ग खुला केल्यास या मार्गावर अनेक अवैध प्रकार चालू होतील. त्यामुळे वनसंपत्तीला धोका पोचू शकतो, शिकारीचे प्रमाण वाढू शकते, अशा अनेक निसर्गाला धोकादायक गोष्टी घडू शकतात. त्यामुळे हा राजमार्ग बंद आहे, तो तसाच बंद रहावा, असा ठराव कास पठार कार्यकारी वनसमितीच्या ३० जून या दिवशी झालेल्या बैठकीत करण्यात आला आहे.
पर्यटन विकास झाला पाहिजे; मात्र कास पठारावरील अनेक हेक्टर परिसर हा निर्जन आहे. तेथे स्थानिक गुराखी त्यांची जनावरे आणि वन्यजीव यांचा मुक्त वावर आहे. हा भाग निर्मनुष्य असल्यामुळेच पर्यटकांना त्याचे गुढ वाटते. ते तसेच राहिले पाहिजे. या भागातून डांबरी रस्ता गेला, तर या परिसरातील निरव शांतता भंग होईल. पर्यटक या शांततेच्या अनुभवासाठीच येथे येतात. आपण केवळ विकासाच्या मागे धावलो, तर येथील अल्हाददायक वातावरण नष्ट होईल. या मार्गावर कोणतीही मानवीवस्ती नाही. आजूबाजूच्या गावांना जाण्यासाठी डांबरी रस्ते उपलब्ध आहेत. तरीही काही लोकांना शिवकालीन राजमार्ग खुला करण्याची घाई झाली आहे. कास पठारावरील वनसंपदा टिकली, तरच भविष्यात कासचे पर्यटन वाढणार आहे. त्यामुळे निसर्गाचा समतोल राखण्यासाठी सर्वांनीच सहकार्य करावे, असे आवाहन वनसमितीने केले आहे.