शालेय पोषण आहाराचे अनुदान बँक खात्यात जमा करण्याच्या सरकारच्या निर्णयाला शिक्षक समितीचा विरोध !
नागपूर – उन्हाळी सुटीतील शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वितरित न करता तो अनुदान स्वरूपात थेट विद्यार्थ्यांच्या अधिकोष खात्यात जमा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे केवळ १५० रुपयांच्या अनुदानासाठी विद्यार्थ्यांना १ सहस्र रुपयांचे अधिकोष खाते उघडावे लागणार आहे. हा निर्णय पालकांना परवडणारा नसल्याने या निर्णयाला पालक आणि महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती यांनी विरोध केला आहे.
विविध सरकारी योजना आणि शिष्यवृत्ती घेणार्या विद्यार्थ्यांचे अधिकोष खाते आहे; परंतु हे प्रमाण पुष्कळ अत्यल्प आहे. अशा परिस्थितीत शिक्षण विभागाचा हा आदेश चुकीचा असल्याचे मत समितीचे जिल्हाध्यक्ष लीलाधर ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. ‘उन्हाळी सुट्टीतील ३५ दिवसांचे अनुदान इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी १५६ रुपये आहे, तर इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी २३४ रुपये ठरणार आहे. त्यामुळे किमान १५० रुपयांच्या निधीसाठी १ सहस्र रुपये भरून बँक खाते उघडणे अनेक पालकांना परवडणारे नाही. त्यामुळे हा निर्णय सरकारने रहित करावा’, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने केली आहे.