आंबोली घाटातील मुख्य धबधब्याजवळील परिसर धोकादायक
मोठा दगड रस्त्यावर पडला; पर्यटन बंद असल्याने जीवितहानी टळली
सावंतवाडी – तालुक्यातील आंबोली घाटातील मुख्य धबधब्याजवळ एक मोठा दगड रस्त्याच्या बाजूला पडला. हा दगड प्रचंड मोठा असून या ठिकाणी सुदैवाने पर्यटन चालू नसल्याने मोठी जीवितहानी टळली.
येथील ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार वनविभागाने धबधब्यांच्या वरच्या बाजूला बंधारे बांधले आहेत. त्यामुळे पाणी झिरपून दगड किंवा छोट्या-मोठ्या दरडी खाली येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे धबधब्यांवरील बंधारे लवकरात लवकर काढले पाहिजेत. आता जर धबधब्यावरील पर्यटन चालू असते, तर मोठा अपघात घडला असता आणि मोठी जीवितहानीही झाली असती. धबधब्याजवळील दरडीची पहाणी करून याविषयी योग्य ती उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. तसे न केल्यास भविष्यात अशा दरडी कोसळतच रहातील आणि मोठी जीवितहानीही होईल.