कोरोना महामारी आणि जीवघेणा दुष्प्रचार !
१. बातम्यांचा अपप्रचार हा कोरोना महामारीपेक्षाही अधिक भयानक असल्याने खोट्या बातम्यांची शक्ती न्यून करण्यासाठी लोकांमध्ये जागृती मोहिमा राबवायला हव्यात !
‘भारतात कोरोनाव्यतिरिक्त अजून एक महामारी पसरली आहे, ती आहे खोट्या बातम्यांची महामारी ! विशेषत: सामाजिक माध्यमांवर अनेक खोट्या आणि चुकीच्या बातम्या पसरवल्या जातात. त्यामुळे सामान्यांच्या मनात भीतीची भावना निर्माण होते. ‘आय.सी.एम्.आर्.’च्या (भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेच्या) अहवालामध्ये म्हटले आहे की, ९० टक्के रुग्णांना ऑक्सिजनची काहीही आवश्यकता नसते. ज्या इंजेक्शनसाठी लोक धावपळ करत आहेत, त्याचीही आवश्यकता नाही. वृत्तपत्रांमध्ये ज्या प्लाझ्माविषयी चर्चा चालू होती, त्याचीही आवश्यकता नाही. कुणाला कशाची आवश्यकता आहे, ते आधुनिक वैद्यच (डॉक्टरच) ठरवू शकतात.
ज्या वेळी आपण स्वत:च स्वतःचे ‘डॉक्टर’ होतो, तेव्हा आपण आपली पुष्कळ हानी करत असतो. अनुमाने ७० ते ८० टक्के लोक घरी राहून बरे झाले आहेत. भारतात खोट्या बातम्यांचा अपप्रचार हा चिनी विषाणूपेक्षाही अधिक वेगाने होत आहे. काही लोक खोट्या ध्वनीचित्रफीती प्रसारित करतात, तर काही अर्धवट माहिती असलेले तथाकथित तज्ञ दूरचित्रवाहिनीवर काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे लोकांमध्ये भ्रम निर्माण होतो. हे थांबवण्यासाठी लोकांमध्ये जागृती मोहिमा चालवून खोट्या बातम्यांची शक्ती न्यून करायला हवी. आज भारत खोट्या बातम्यांच्या संकटावरून जागरूक झाला नाही, तर आगामी काळात आपला देश आणि त्याची लोकशाही यांवर वाईट परिणाम होऊ शकतात.
२. खोट्या बातम्या पसरवणार्यांवर कठोर कारवाई करणे आवश्यक !
भारतात चिनी विषाणूचे रुग्ण वाढायला लागले, तसतशा सामाजिक माध्यमांमध्ये अनेक प्रकारच्या बातम्याही पसरू लागल्या. तथाकथित तज्ञांनी हानीकारक उपाय सांगितले. इंजेक्शन किंवा ऑक्सिजन यांसाठी मोठ्या रांग लागलेल्यांची छायाचित्रे सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाली. त्यामुळे लोकांच्या मनात भीती निर्माण झाली. ज्यांना इंजेक्शन आणि ऑक्सिजन यांची आवश्यकता नव्हती, त्यांच्याही नातेवाइकांनी रांगेत उभे रहाणे चालू केले. त्यामुळे रोगराईच्या प्रसाराला चालना मिळाली. खोट्या बातम्या पसरवणे, हा भारताला जडलेला एक गंभीर आजार आहे. दुर्दैवाने अशा बातम्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी कुठलाही कठोर कायदा किंवा यंत्रणा नाही. राजकीय पक्षांनीही चांगले काम करण्याऐवजी अशा स्थितीत आगीत तेल ओतण्याचे काम केले. त्यामुळे माध्यमांमध्ये खोटी माहिती पसरवणार्यांवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे.
३. ‘आय.सी.एम्.आर्.’च्या प्रवक्त्यांनी प्रतिदिन माध्यमांसमोर येऊन खोट्या बातम्यांची सत्यता लोकांना सांगितल्यास भीतीचे प्रमाण न्यून होईल !
हा माहितीचा महापूर केवळ भारतातच आहे, असे नाही, तर संपूर्ण जगातच आहे. आज भारतात सामाजिक माध्यमांचे प्रमाण पुष्कळ अधिक आहे. आज ६० ते ७० टक्के भारतीय कुठल्या तरी सामाजिक माध्यमांचा वापर करतात. आपल्या देशात विविध भाषा आणि पंथ यांचे लोक रहातात. त्यामुळे दुष्प्रचार करणे सोपे होते. फेसबूक आणि ट्विटर यांचा आवाका एवढा मोठा आहे की, त्यावर भौतिकदृष्ट्या लक्ष ठेवणे कठीण असते. त्यामुळे जागरूक नागरिकांनी संशयास्पद बातमी पुढे प्रसारित करण्याऐवजी तिला ‘एजन्सी’कडे (वृत्तसंस्थेकडे) पोचवले पाहिजे. त्यामुळे ती बातमी खरी कि खोटी आहे, ते कळेल. भारतीय वैद्यकीय क्षेत्रात ‘आय.सी.एम्.आर्.’ ही सर्वांत मोठी संस्था आहे. तिच्या प्रवक्त्यांनी प्रतिदिन माध्यमांच्या समोर येऊन खोट्या बातम्यांमधील सत्यता लोकांना सांगितली पाहिजे. तसे झाल्यास लोकांमध्ये भीती निर्माण होणार नाही.
सध्या ‘इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट २०००’ या कायद्याचा फारसा उपयोग होत नाही. त्यामुळे हा कायदा अधिक कठोर केला पाहिजे. अनेकदा दूरचित्रवाहिनीवर त्या त्या विषयांतील तज्ञ उपस्थित असतात. तेव्हा त्यांचे मत योग्य असतेच, असे नाही. जेव्हा ७० ते ८० टक्के आधुनिक वैद्य एखाद्याच्या उपचाराला योग्य ठरवतात, तेव्हाच तो उपचार मान्य केला पाहिजे. चीनमध्ये फेसबूक किंवा ट्विटर यांना अजिबात महत्त्व दिले जात नाही. तेथे त्यांनीच बनवलेली माध्यमे चालतात.
४. लोकांनी सकारात्मक गोष्टी प्रसारित केल्यास देशाला महामारीवर विजय मिळवणे सोपे होईल !
अनेक वेळा भारतातील काही लोक विदेशातील माध्यमांमध्ये चुकीची माहिती प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अन्य भारतियांना ती बातमी खरी वाटते. न्यूयॉर्क टाइम्स, वॉशिंग्टन पोस्ट किंवा गार्डीयन इत्यादी माध्यमांमध्ये जरी महामारीविषयी चुकीची माहिती प्रसारित होत असेल, तर त्यांच्यावरही कारवाई करण्याची आवश्यकता आहे. यासंदर्भात सरकारचे प्रयत्न फारच तोकडे पडतात. भारतविरोधी तत्त्वे असणारेच अशा प्रकारच्या चुकीच्या बातम्या पोचवतात. देशाच्या विरोधात एकही खोटी बातमी प्रसारित होऊ नये, यासाठी राजकीय इच्छाशक्ती दाखवणे आवश्यक आहे. भारतात सामाजिक माध्यमांविषयी शिक्षितपणा अल्प आहे. सामाजिक माध्यमे कशी वापरायची, याचे ज्ञान लोकांना असायला हवे. कोणतीही चुकीची बातमी दिसली, तर ती थेट सायबर पोलिसांकडे पाठवली पाहिजे. अशा संकटाच्या वेळी जर देश एकत्र झाला नाही, तर तो कधी होणार ? संपूर्ण देशाने एकत्र येऊन या महामारीचे रूपांतर एका संधीत करायला पाहिजे. लोकांनी सकारात्मक विचार करून चांगल्या गोष्टी प्रसारित कराव्यात. त्यामुळे चिनी विषाणूच्या महामारीवर आपल्या देशाला विजय मिळवणे सोपे होईल.’
– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे