बी.एस्.एन्.एल्.ला इंटरनेट जोडणी संदर्भातील अडचणी तातडीने सोडवण्यास सांगितले आहे ! – विश्वजीत राणे आरोग्यमंत्री
|
वाळपई – सत्तरी तालुक्यातील विद्यार्थ्यांनी मंगळवार, २९ जून या दिवशी येथील बी.एस्.एन्.एल्.च्या कार्यालयावर मोर्चा नेऊन ऑनलाईन वर्गांसाठी इंटरनेट जोडणी व्यवस्थित चालू रहावी, अशी मागणी केली होती. यावर १ जुलैला सत्तरीचे आमदार आणि गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना ऑनलाईन वर्गांसाठी भ्रमणभाषवर आवश्यक असलेल्या इंटरनेट जोडणीविषयी बी.एस्.एन्.एल्.च्या मुख्य व्यवस्थापकांकडे सूत्र उपस्थित केले असून त्यांना तातडीने कार्यवाही करण्यास सांगितले आहे.
ते पुढे म्हणाले, ‘‘बी.एस्.एन्.एल्.चे सर्व प्रतिनिधी आणि सर्व पंचसदस्य यांच्यासमवेत लवकरच एक बैठक घेणार आहे. इंटरनेट जोडणी मिळत नसल्याची अडचण गोव्यातील विविध भागांत आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना बी.एस्.एन्.एल्.कडे स्वतंत्रपणे हे सूत्र मांडण्यास सांगणार आहे.’’