गोव्यात आतापर्यंत १९ सहस्र मुलांना कोरोनाचा संसर्ग
कोरोनाच्या दुसर्या लाटेचा फटका
पणजी, ३० जून (वार्ता.) – गोवा राज्यात २३ जून २०२१ पर्यंत १७ वर्षांखालील १९ सहस्र १५ मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला असून यांपैकी ८ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाबाधित झालेल्या बहुतांश मुलांनी कोरोनावर मात केली असून अजूनही काही जणांवर उपचार चालू आहेत.
कोरोनाची दुसरी लाट आता ओसरत असून राज्यात गेल्या काही दिवसांत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अल्प झाली आहे, तसेच मृतांची संख्याही अल्प होत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी १७ वर्षांखालील मुलांना कोरोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण अल्प होते; परंतु गोव्यासह संपूर्ण देशात लवकरच तिसरी लाट येईल आणि त्याचा लहान मुलांना फटका बसेल, अशी शक्यता देशभरातील वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांकडून वर्तवली जात आहे. राज्य सरकारने तिसर्या लाटेला थोपवण्यासाठी सर्व सिद्धता केली आहेे. राज्यातील बालरोग तज्ञांना संघटित करून कोरोनाबाधित बालकांवर त्वरित उपचार करण्याचे निर्देश दिले आहेत. तिसर्या लाटेसंदर्भात स्थापन करण्यात आलेली तज्ञ आधुनिक वैद्यांची समिती आणि कृती दल यांवर बारीक लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे ‘गोवा तिसर्या लाटेवर तात्काळ मात करू शकेल’, असा विश्वास राज्यातील वैद्यकीय तज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.