घरोघरी आयुर्वेद
सुवर्णप्राशन
लहान मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी उपयुक्त असलेला आयुर्वेदाचा संस्कार म्हणजे सुवर्णप्राशन ! नवजात अर्भकापासून ते १४ वर्षांपर्यंतच्या सर्व मुला-मुलींसाठी सुवर्णप्राशन उपयुक्त आहे. हे औषध सिद्ध करण्याचे विविध पाठ आयुर्वेदाच्या ग्रंथांत नमूद आहेत. बहुतेक वैद्य स्वतःचा अनुभव, प्रदेश, आवश्यकता, ऋतू यांनुसार सुवर्णप्राश सिद्ध करत असतात.
सुवर्णप्राशनाचे ग्रंथोक्त लाभ :
सुवर्णप्राशनं ह्येतन्मेधाग्निबलवर्धनम् ।
आयुष्यं मङ्गलं पुण्यं वृष्यं वर्ण्यं ग्रहापहम् ।।
– काश्यपसंहिता, सूत्रस्थान
अर्थ : सुवर्णप्राशनामुळे बालकांची बुद्धी वाढते, पचनशक्ती सुधारते, त्यांच्या अंगी बळ येते, आयुष्य उत्तम रहाण्यास साहाय्य होते, वर्ण उत्तम रहातो, शुक्रधातूचे पोषण होते, लहान मुलांचे विविध विकारांपासून संरक्षण होते, असे आयुर्वेद सांगतो.
संपूर्ण भारतभरातील नामांकित आयुर्वेदाच्या संशोधन केंद्रांतील संशोधनांनुसार
- अभ्यासातील एकाग्रता वाढणे.
- धारणाशक्ती, आकलनशक्ती आणि स्मरणशक्ती वाढणे.
- वारंवार सर्दी-खोकला वा ताप येत असल्यास त्यावर आराम पडणे.
- रोगप्रतिकारकशक्ती वाढणे.
एकूणच लहान मुला-मुलींच्या सर्वांगीण विकासास हातभार लागणे.
अशी विविध निरीक्षणे आजवर नोंदवली गेली आहेत. बालकांचे नियमित लसीकरण आपण जितके लक्षपूर्वक करतो, तितकेच लक्ष सुवर्णप्राशनाकडे देण्याची आवश्यकता आहे.
– वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पती, डोंबिवली.