पत्नीची सर्वतोपरी काळजी घेणारे आणि दृढ श्रद्धेने प्रतिकूल प्रसंग सकारात्मकतेने स्वीकारणारे संभाजीनगर येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे अधिवक्ता कै. चारुदत्त जोशी (वय ३९ वर्षे) !

१ जुलै या दिवशीच्या दैनिकात आपण ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे अधिवक्ता कै. चारुदत्त जोशी यांच्यातील गुण, निवृत्त जिल्हा न्यायाधीश पू. सुधाकर चपळगावकर यांच्या सत्संगाचा त्यांना साधनेसाठी झालेला लाभ आणि त्यांच्यात झालेले पालट यांविषयीची सूत्रे पाहिली. आज आपण कै. चारुदत्त जोशी यांना झालेला कोरोनाचा संसर्ग, रुग्णालयात त्यांच्याकडून झालेली साधना, त्यांच्या निधनानंतर अनुभवलेली देवाची कृपा आणि त्यांच्याविषयी त्यांच्या पत्नीला आलेल्या अनुभूती यांविषयीची सूत्रे पहाणार आहोत.

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/491242.html


(भाग ३)

अधिवक्ता चारुदत्त जोशी

११. यजमानांना झालेला कोरोनाचा संसर्ग

११ अ. ‘स्वतः कोरोनाबाधित आहे’, हे समजूनही शांत राहून ‘पत्नीला कोरोना होऊ नये’, यासाठी गुरुदेवांना प्रार्थना करणे : ५.४.२०२१ या दिवशी यजमान आजारी पडले. त्यामुळे आम्ही दोघांनी आमची कोरोनाची चाचणी केली. आधी यजमानांच्या भ्रमणभाषवर त्यांच्या चाचणीचा अहवाल प्राप्त झाला. तेव्हा ते डोळे बंद करून शांत बसले. नंतर माझ्या चाचणीचा अहवाल मिळाला. तो ‘निगेटिव्ह’ होता. ते पाहून त्यांनी झोपलेल्या ठिकाणीच पुष्कळ आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, ‘‘मी गुरुदेवांना पुष्कळ आळवत होतो, ‘ती (पत्नी) तुमची इतकी चांगली साधक आहे ना ! मग तिला एवढा त्रास कशाला व्हायला हवा ? तिला कोरोनाचा त्रास व्हायला नको.’ गुरुदेवांनी माझी प्रार्थना ऐकली.’’ तेव्हा मी त्यांना त्यांच्या चाचणीच्या अहवालाविषयी विचारले. त्यांनी ‘तो ‘पॉझिटिव्ह’ आहे’, असे मला सांगितले; मात्र त्यांना त्याचे काहीही दुःख वाटत नव्हते. ते त्यांनी सहजतेने स्वीकारले होते.

श्रीमती अनिता जोशी

११ आ. ‘स्वतःचे त्रास यजमानांना भोगावे लागत आहेत’, असे वाटणे : स्वतःला एवढा त्रास होत असतांनाही त्यांना माझ्यासाठी झालेला आनंद त्यांच्या तोंडवळ्यावर जाणवत होता. तेव्हा क्षणभर मला वाटले, ‘मी सतत एवढी रुग्णाईत असते. माझी प्रतिकारशक्ती पुष्कळ अल्प आहे, तरी ‘मी सुरक्षित आहे’, ही देवाची कृपा आहेच; पण कदाचित् माझा त्रास यजमानांना भोगायला लागत आहे. त्यामुळे मी सुरक्षित आहे.’

११ इ. यजमानांना रुग्णालयात भरती केल्यानंतर योग्य उपचारांच्या अभावी त्यांचा त्रास वाढणे : ५ व्या दिवशी यजमानांना रुग्णालयात भरती करण्यात आले; पण आरंभीचे ५ दिवस आधुनिक वैद्यांचे त्यांच्या उपचारांकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे त्यांच्या त्रासांत पुष्कळ वाढ झाली. एक दिवस त्यांना पुष्कळ ताप आला. त्यांची प्राणवायूची पातळीही खूप खाली जायची. नंतर शेवटपर्यंत ती वाढलीच नाही. त्यामुळे त्यांना सतत धाप लागायची; पण त्यांच्या बोलण्यातून ‘ते रुग्णाईत आहेत’, असे कधी जाणवायचे नाही. त्याही स्थितीत ते स्थिर असायचे.

११ ई. यजमानांनी अखंड नामजप करणे आणि स्वतःच्या सेवेचे नियोजन करण्याची साधिकेला आठवण करून देणे : रुग्णालयात भरती केल्यावर भ्रमणभाषवर स्तोत्रे किंवा नामजप लावून ठेवणे, भावजागृतीचे प्रयत्न करणे आदी नामजपादी उपाय अखंड चालू होते. ते अखंड नामजपही करायचे. रुग्णालयात एवढ्या त्रासातही त्यांचे त्यांच्या सेवेकडे लक्ष होते. त्यांनी त्यांच्या सेवेचे नियोजन करण्याविषयी उत्तरदायी साधिकेला निरोपही दिला.

११ उ. यजमानांच्या मनाची चांगली स्थिती पाहून गुरुदेवांप्रती कृतज्ञता वाटणे आणि ‘यजमानांची साधना चांगली चालू आहे’, असे जाणवणे : निधनापूर्वी २ दिवस यजमान म्हणाले, ‘‘माझा अखंड नामजप चालू आहे. गुरुदेवांचा धावाही अखंड चालू आहे.’’ त्या वेळी त्यांना ‘‘आता तुम्हाला ‘व्हेंटिलेटर’ लावावा लागेल’’, असे सांगितल्यावर त्यांनी ते अगदी सहजतेने स्वीकारले. ते म्हणाले, ‘‘ठीक आहे. लावू देत. देवाची इच्छा !’’ त्या वेळी ‘यजमान वाचण्याची शक्यता नाही’, असे आधुनिक वैद्यांनी आम्हाला आधीच सांगितले होते. अशा वेळी त्यांच्या मनाची एवढी चांगली स्थिती पाहून मला गुरुदेवांप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली आणि ‘त्यांची साधना चांगली चालू आहे’, असे जाणवले.

११ ऊ. ‘व्हेंटिलेटर’वर असलेल्या यजमानांकडे पाहून पुष्कळ चैतन्य जाणवणे : ‘अतीदक्षता विभागात ठेवलेल्या रुग्णांना त्यांचे नातेवाइक बाहेरील एका ‘स्क्रीन’वर विशिष्ट वेळेत पाहू शकतात’, अशी रुग्णालयाकडून व्यवस्था केली होती. यजमानांना ‘व्हेंटिलेटर’ लावल्यावर आम्ही ‘स्क्रीन’वर त्यांना पाहिले. तेव्हा बरे होत असलेल्या अन्य रुग्णांकडे पाहून चांगले वाटत नव्हते; मात्र यजमानांकडे पाहून पुष्कळ चैतन्य जाणवत होते. ‘ते देवाच्या अनुसंधानात आहेत’, असे जाणवत होते.

१२. ‘व्हेंटिलेटर’ लावलेल्या दिवशी आलेल्या अनुभूती

१२ अ. यजमानांसाठी पू. अधिवक्ता सुरेश कुलकर्णी नामजप करत असतांना त्यांना यजमानांच्या समवेत परात्पर गुरुदेव, श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ असल्याचे दिसून ‘परात्पर गुरुदेवांकडून यजमानांना चैतन्य मिळत आहे’, असे जाणवणे : यजमानांसाठी पू. अधिवक्ता सुरेश कुलकर्णी नामजप करत. यजमानांना ‘व्हेंटिलेटर’ लावलेल्या दिवशी नामजप करतांना पू. कुलकर्णीकाकांना पुढील अनुभूती आली, ‘परात्पर गुरुदेव यजमानांच्या डोक्याच्या मागे उभे आहेत आणि त्यांच्याकडून उगवत्या सूर्याच्या प्रकाशाप्रमाणे पिवळसर प्रकाशरूपी चैतन्य यजमानांना मिळत आहे. यजमानांच्या दोन्ही बाजूंना श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ बसल्या आहेत. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यजमानांना प्राणवायू पुरवत आहेत आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यजमानांच्या शरिरातील कोरोनाचे सर्व जंतू नष्ट करत आहेत.’

१२ आ. साधिकेला आणि तिच्या भावाला आलेली अनुभूती : त्या दिवशी यजमानांकडे पहातांना मला आणि माझ्या भावाला ‘परात्पर गुरुमाऊली आणि श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यजमानांच्या समवेत आहेत अन् ते त्यांना चैतन्य आणि शक्ती देत आहेत’, असे जाणवले.

१३. यजमानांच्या निधनानंतर

१३ अ. आधुनिक वैद्यांना रुग्णालयाकडून झालेल्या चुकीची परखडपणे जाणीव करून देणे : २८.४.२०२१ या दिवशी यजमानांचे निधन झाले. आधुनिक वैद्यांनी त्यांच्या निधनाविषयी आम्हाला सांगितले. त्या वेळी मला रडू आले नाही. उलट क्षात्रवृत्तीने ‘रुग्णालयाकडून उपचारांच्या वेळी झालेल्या हलगर्जीपणामुळे यजमानांना जीव गमवावा लागला. इतर रुग्णांच्या संदर्भात असे होऊ नये’, याची जाणीव मला आधुनिक वैद्यांना करून देता आली. त्यांनीही त्यांची चूक मान्य केली. माझ्या या कृतीचे माझ्या दिरांना पुष्कळ आश्चर्य वाटले. यजमानांच्या निधनानंतरही देवाने मला पुष्कळ स्थिर ठेवले. त्या वेळी माझा ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप आणि प्रार्थना चालू होती.

१३ आ. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व उत्तरकार्य व्यवस्थित पार पडणे : देवाच्या कृपेने यजमानांचे पुढील सर्व विधी व्यवस्थित पार पडले. येथील जवळपासचे नदीकिनारे काट्याचे कुंपण टाकून बंद केले आहेत. त्यामुळे अस्थीविसर्जन करण्यात अडचण येते; मात्र तेथेही देवाने साहाय्य केले. एका व्यक्तीने नदीपात्राच्या मध्यभागापर्यंत नावेने जाण्याची सोय केली. त्यामुळे आम्हाला व्यवस्थित अस्थीविसर्जन करता आले. सध्या सर्वत्र अस्थीविसर्जनाची अडचण झाल्याने लोकांनी एक नवीन प्रथा चालू केली आहे, ‘शेतात खड्डा करून त्यामध्ये अस्थी पुरायच्या आणि त्यावर झाड लावून ते झाड जोपासायचे.’ (धर्मशिक्षणाच्या अभावी हिंदूंकडून केली जाणारी अयोग्य कृती ! यावरून हिंदूंना धर्मशिक्षणाची किती आवश्यकता आहे, हेच यातून दिसून येते. – संपादक) आम्ही मात्र पदोपदी देवाची कृपा अनुभवत होतो. आम्हाला पुढचे सर्व विधी करण्यासाठी देवाचे साहाय्य मिळून सर्व व्यवस्थित पार पडले. सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विधी करण्यासाठी गुरुजी भेटणे, नदीच्या काठावर पोचण्यासाठी प्रशासनाची अनुमती मिळणे, हे सर्व शक्य नसल्याने अनेकांचे हाल होत आहेत; मात्र आम्हाला हे सर्व सहजतेने उपलब्ध झाले. विधीच्या ठिकाणी एकच कावळा होता. तो कावळा लगेच पिंड शिवला.

१३ इ. घरी पुष्कळ चैतन्य जाणवणे : यजमान गेल्यानंतर आम्हाला रुग्णालयात किंवा घरी कधी त्यांचे अस्तित्व जाणवले नाही. घरात चैतन्य जाणवत आहे. इतरांनाही आमच्या घरात चैतन्य जाणवते.

१३ ई. सुगंधाची अनुभूती येणे : यजमानांच्या मृत्यूनंतर ३ दिवस मला घरात सुगंधाची अनुभूती येत होती. पहिल्या दिवशी चंदनाचे अत्तर सांडल्याप्रमाणे चंदनाचा सुगंध येत होता. दुसर्‍या दिवशीचा सुगंध वेगळा होता; पण ‘तो कशाचा होता ?’, हे मला कळले नाही. तिसर्‍या दिवशीही तोच सुगंध मंद प्रमाणात येत होता.

१४. यजमानांविषयी सासूबाईंनी आणि इतरांनी व्यक्त केलेले कौतुक

१४ अ. सासूबाईंनी यजमानांचे केलेले कौतुक ! : यजमानांच्या निधनानंतर माझ्या सासूबाई म्हणाल्या, ‘‘तो नक्की कुणीतरी देवमाणूस होता. तो आयुष्यभर आहे, त्यात समाधानी आणि आनंदी राहिला. त्याने कधीही हट्ट केला नाही कि कुणावर अधिकार गाजवला नाही. तो नेहमी इतरांचा विचार करून परेच्छेने वागायचा.’’

१४ आ. समाजातील लोकांनी व्यक्त केलेले कौतुक : यजमानांनी समाजातील अनेकांना साहाय्य केले होते. त्यांच्या निधनाने सर्वांना पुष्कळ दुःख झाले. ‘इतक्या अल्प वयात त्यांनी सर्वांची मने जिंकली होती’, अशा प्रकारचे कौतुक अनेकांनी व्यक्त केले. ‘जो आवडतो सर्वांना, तोचि आवडे देवाला ।’, ही उक्ती यजमानांसाठी शब्दशः खरी आहे’, असे मला वाटले.

१५. नातेवाइकांनी ‘किती वाईट प्रारब्ध घेऊन जन्माला आली’, असे टोचून बोलणे; परंतु ‘गुरुमाऊली याच जन्मात प्रारब्ध संपवत आहेत’, या विचाराने स्थिर आणि शांत रहाता येणे

आमच्या नातेवाइकांनी लहानपणापासून माझ्या आयुष्यातील कठीण प्रसंग आणि माझे सततचे आजारपण पाहिले आहे. या प्रसंगात १ – २ नातेवाईक मला म्हणाले, ‘‘आधी तुझे बाबा गेले. तुला अपत्य नाही आणि आता एवढ्या लहान वयात तुझ्यावर एवढा मोठा प्रसंग आला. किती वाईट प्रारब्ध आहे तुझे !’’ त्यांच्या या वाक्याने मला वाईट वाटले नाही. उलट ‘जन्मोजन्मीचा उद्धार करणारी गुरुमाऊली मला लाभली आहे. इतके चांगले प्रारब्ध फार थोड्या जणांना मिळते. त्या थोड्या जणांतील मी एक आहे’, असे विचार माझ्या मनात आले. मी साधनेत आल्यापासून गुरुदेवांना प्रार्थना करत आहे, ‘मला याच जन्मात मोक्षाला घेऊन चला. आता मला पुढचा जन्म नको.’ त्यामुळे ‘गुरुदेव माझे प्रारब्ध लवकर संपवत आहेत’, असे वाटून मला गुरुदेवांप्रती कृतज्ञता वाटते. खरेतर ‘यजमान नाहीत’, हा विचारही मला सहन होणार नाही’, अशी माझी स्थिती होती; परंतु या संपूर्ण कालावधीत गुरुमाऊलीने मला पुष्कळ स्थिर ठेवले आहे. प्रत्येक प्रसंगात परात्पर गुरुदेव सतत माझ्यासमवेत आहेत’, असे मला जाणवत आहे.

१६. यजमानांविषयी आलेल्या अनुभूती

अ. काही दिवसांपूर्वी माझा खांदा पुष्कळ दुखत होता. त्यामुळे मला हात हालवता येत नव्हता. तेव्हा यजमानांनी माझ्या खांद्याला कापूर लावला आणि काही क्षणांतच माझे दुखणे पूर्णपणे थांबले.

आ. मला या मासात २ वेळा यजमानांच्या भोवती काही क्षण पांढरी आभा दिसली. त्याकडे पाहून मला चांगले वाटत होते.

इ. त्यांनी लिहून ठेवलेल्या कवितांच्या वहीला सुगंध येत आहे.

‘हे नारायणस्वरूप कृपाळू गुरुमाऊली, आपल्या कृपेनेच मला इतके चांगले साधक ‘पती’ म्हणून लाभले. यासाठी मी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे. ‘त्यांच्यातील गुण मला शिकता येऊन आमची जलद आध्यात्मिक उन्नती होऊ दे’, अशी आपल्या चरणी भावपूर्ण प्रार्थना आहे.’

(समाप्त)

– श्रीमती अनिता चारुदत्त जोशी (पत्नी), संभाजीनगर (१८.५.२०२१)

कोरोनाच्या काळात रुग्णालयांविषयी आलेले कटू अनुभव त्वरित कळवा !

आरोग्य साहाय्य समिती

पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, आरोग्य साहाय्य समिती, ‘मधु स्मृती’, सत्यनारायण मंदिराच्या शेजारी, फोंडा, गोवा. ४०३ ४०१.

संपर्क क्रमांक : ७०५८८८५६१०

ई-मेल पत्ता : arogya.sahayya@hindujagruti.org

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक