देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) चंद्ररेखा जाखोटिया (वय ६१ वर्षे) यांच्याविषयीच्या हृद्य आठवणी

‘देवद येथील आश्रमात टंकलेखनाची सेवा करणार्‍या ६४ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या सौ. चंद्ररेखा (जिजी) जाखोटिया (वय ६१ वर्षे) यांचे १६.६.२०२१ या दिवशी निधन झाले. त्यांच्याविषयीच्या आठवणी पुढे दिल्या आहेत.

सौ. चंद्ररेखा जाखोटिया

१. जिजींशी परिचय आणि त्यांचे लक्षात आलेले गुण

माझी आणि सौ. जिजी यांची ओळख वर्ष १९९८ पासून होती. त्या वेळी त्या सांगली जिल्ह्यात प्रसाराची सेवा पहात असत. काही प्रासंगिक सेवांच्या वेळी त्यांना जवळून पहायला मिळाले.

सौ. आनंदी पांगुळ

१ अ. तडफदार व्यक्तीमत्त्व आणि स्वीकारण्याची वृत्ती असणे : त्यांचे व्यक्तीमत्त्व तडफदार आणि निर्भय होते. कोणतीही सेवा त्यांना सांगितल्यावर ती सेवा त्या सहजपणे स्वीकारत आणि पूर्णत्वास नेत. त्यामुळे त्यांना पुढे वेगवेगळ्या गावांमध्ये प्रसाराची सेवाही दिली होती.

१ आ. स्वतःच्या आणि मुलाच्या साधनेविषयीची तळमळ : मी वर्ष २००० मध्ये मिरज आश्रमात पूर्णवेळ साधना करू लागल्यावर ३ – ४ वर्षांनी एकदा सौ. जिजी आश्रमात आल्या होत्या. त्या वेळी त्यांचा धाकटा मुलगा श्री. आनंद जाखोटिया याने नुकतेच दहावीचे शिक्षण पूर्ण केले होते. त्या वेळी त्या मला म्हणाल्या होत्या, ‘‘परात्पर गुरु डॉक्टरांनी माझ्या या मुलाला त्यांच्या चरणसेवेसाठी आणि साधना करण्यासाठी त्यांच्या आश्रमात ठेवून घ्यावे. माझ्या मोठ्या मुलाचे अजून साधनेविषयी काही निश्चित नाही. वेळ आल्यावर तोही पूर्णवेळ साधना करू लागेल.’’ त्या वेळी त्यांची स्वतःच्या साधनेविषयीची आणि ‘मुलांनी साधना करावी’ याविषयीची तळमळ दिसून आली. त्यांच्या त्या तळमळीमुळे मी फार प्रभावित झाले.

१ इ. निर्भयता आणि स्वावलंबित्व : वर्ष २००४ मध्ये सौ. जिजींच्या पाठीवरील गाठ काढण्याचे शस्त्रकर्म करायचे होते. त्या वेळी त्या घरून शस्त्रकर्म करण्यासाठी एकट्याच मिरज येथील रुग्णालयात भरती होण्यासाठी आल्या होत्या. तेव्हा त्यांच्या समवेत थांबण्यासाठी माझे नियोजन झाले होते. तेव्हा मला त्यांच्यातील निर्भयता लक्षात आली. त्या वेळी त्यांनी माझ्याकडून कुठलेच साहाय्य घेतले नव्हते. त्या त्यांच्या सर्व कृती स्वतःच करत होत्या.

१ ई. सवलत न घेणे : त्यांच्या पायांतून शक्ती निघून गेल्याने त्या शेवटपर्यंत अंथरूणाला खिळून होत्या, तरीही त्यांनी तशा स्थितीतही सेवा आणि साधना यांमध्ये कुठलीही सवलत घेतली नाही. त्या झोपून संगणकीय सेवा करत होत्या. त्यांनी सनातनच्या ग्रंथांच्या अनुषंगाने अनेक सेवा केल्या आहेत. सध्या देवद आश्रमात त्या ‘सनातन हेल्पलाईन’, तसेच अनुभूती टंकलेखन आणि हिंदी भाषांतराची सेवा करत होत्या. त्यांच्याकडे वेळ असल्यावर त्या सनातनच्या सात्त्विक जपमाळा बनवण्याचीही सेवा करीत. प्रत्येक दिवशी त्या किमान २ – ३ घंटे बसून सेवा करीत. त्या म्हणायच्या, ‘‘सेवेत असले, म्हणजे मला वेदनांचा विसर पडतो.’’

१ उ. व्यष्टी साधनेतील चिकाटी : काही वर्षांपूर्वी त्यांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्क्यांपेक्षा उणावली होती. तेव्हा त्यांनी चिकाटीने प्रयत्न करून काही काळातच ती पुन्हा प्राप्त केली.

२. मृत्यू जवळ आल्याचे लक्षण न जाणवणे

मे २०२० पासून जिजींना बरे वाटत नसल्याने त्या सेवा करू शकल्या नाहीत. याच काळात मी त्यांना दोन वेळा भेटायला गेले होते. तेव्हा त्या मला म्हणाल्या, ‘‘मला काय होत आहे, हे मलाच कळत नाही.’’ इतके बोलून त्या शून्यात पाहू लागल्या. तेव्हाही मला ‘त्यांचा मृत्यू जवळ आला आहे’, याचे वेगळे असे कुठलेच लक्षण जाणवले नव्हते.

३. मृत्यूच्या २ दिवस आधी संकलनाची सेवा करणार्‍या दोन साधिकांना एकाच वेळी जिजींना भेटायला जाण्याचा विचार येणे

१४.६.२०२१ या दिवशी मी आणि सहसाधिका श्रीमती मनीषा गाडगीळकाकू आम्ही रात्रीच्या जेवणानंतर एकत्रितच त्यांना भेटायला गेलो होतो. साधारण अर्धा घंटा आम्ही जिजींच्या समवेत होतो. त्या वेळी देवाने आम्हा दोघींच्या मनात त्यांना भेटण्याचा विचार एकाच वेळी दिला, याचे मला आश्चर्य वाटले.

४. रुग्णाईत असूनही जिजीच्या खोलीत नेहमीपेक्षा अधिक चैतन्य जाणवणे आणि त्यांचा तोंडवळाही अधिक तेजस्वी दिसणे अन् त्यांनी याचे श्रेय परात्पर गुरु डॉ. आठवले यांना देणे

जिजींकडे गेल्यावर काकू जिजींशी बोलतांना लहान बाळाशी बोलल्याप्रमाणे बोलत होत्या. जिजीही त्यांना लहान बालकाप्रमाणे प्रतिसाद देत होत्या. तेव्हा मला आश्चर्य वाटत होते. मी जिजींना म्हणाले, ‘‘जिजी, नेहमीपेक्षा खोलीत चैतन्य अधिक जाणवत आहे. तसेच तुमचा तोंडवळाही अधिक तेजस्वी दिसत आहे.’’ तेव्हा जिजी म्हणाल्या, ‘‘अहो, मी आजारी आहे. तुम्हाला असे वाटणे, ही परम पूज्य डॉक्टरांचीच कृपा आहे.’’ त्या वेळी खोलीतील वातावरण पुष्कळ हलके वाटत होते.

५. सहसाधिका मऊभात भरवत असतांना जिजींचा स्थूलदेह आणि त्यांच्यातील आत्मा एवढेच असून त्यांच्यातील कुठल्याही विकार किंवा त्यांच्या सूक्ष्म देहांचा लवलेश नसल्याचे जाणवणे

काकू जिजींना मऊभात भरवत असतांना मला ‘हे काहीतरी वेगळेच चालू आहे’, असे मला जाणवत होते. ‘जणू जिजींचा स्थूलदेह आणि त्यांच्यातील आत्मा एवढेच तिथे आहे’, असे मला जाणवत होते. जिजींच्या कुठल्याही विकारांचा किंवा त्यांच्या सूक्ष्म देहांचा तिथे लवलेशही जाणवत नव्हता. जेवतांना त्या एका बाजूला घसरत होत्या.

६. ‘एखाद्या व्यक्तीच्या जीवनाच्या अखेरच्या क्षणी त्याची हालचाल कशी मालवत जाते’, हे देवाने शिकवणे

तिथून बाहेर पडल्यावर मी काकूंना विचारले, ‘‘जिजींची स्थिती काहीतरी वेगळीच वाटत आहे ना !’’ त्या वेळी काकू म्हणाल्या, ‘‘हो, शेवटी शेवटी असे होते.’’ त्या वेळी माझा त्यांच्या बोलण्यावर विश्वासच बसत नव्हता; कारण स्थुलातून ‘जिजींचा शेवट आला आहे’, असे काही वेगळे लक्षण मला दिसत नव्हते; मात्र माझ्या अंतर्मनाला निराळे जाणवत होते. ‘एखाद्या व्यक्तीच्या जीवनाच्या अखेरच्या क्षणी त्याची हालचाल कशी मालवत जाते’, हे देवाने मला या प्रसंगातून शिकवले.

७. ‘जिजींचे प्राण त्यांच्या देहापासून  मुक्त होण्यासाठी देवानेच काकूंच्या  माध्यमातून संतांच्या नावाचे चैतन्याचे गोळे भरवले असावेत’, असे लक्षात येणे

काकूंनी जिजींना भरवत असतांना सनातनच्या निरनिराळ्या संतांचे नाव घेऊन एक एक घास भरवला होता आणि ते अन्न त्यांचे शेवटचे ठरले. त्यांच्या मृत्यूचे वृत्त समजल्यावर ‘जिजींचे प्राण त्यांच्या देहापासून मुक्त होण्यासाठी देवानेच काकूंच्या माध्यमातून त्यांना संतांच्या नावाचे चैतन्याचे गोळे भरवले असावेत’, असे माझ्या लक्षात आले.

८. परात्पर गुरु पांडे महाराजांच्या चैतन्याने बहरलेल्या सदाफुलीच्या झाडाने ‘जिजींमधील चैतन्य वाढत चालले असून त्यांचीही इहलोकीची यात्रा शीघ्रच संपणार आहे’, याची जाणीव करून देणे

१५.६.२०२१ या दिवशी सकाळी मी आश्रमाच्या उत्तरेकडील भागातून जात असतांना परात्पर गुरु पांडे महाराज आणि जिजी यांच्या खोलीच्या बाहेरील भागात सदाफुलीचे वन सिद्ध झाल्याचे दिसले. तेव्हा परात्पर गुरु पांडे महाराजांच्या चैतन्याने बहरलेल्या सदाफुलीच्या झाडामुळे ‘जिजींमधील चैतन्य वाढत चालले असून त्यांचीही इहलोकीची यात्रा शीघ्रच संपणार आहे’, याची जाणीव झाली. (देवद आश्रमात परात्पर गुरु पांडे महाराज रहात होते, ती खोली आणि जिजी रहात असलेली खोली शेजारीशेजारी आहे. – संकलक)

९. कोटीशः नमन !

आज, १६.६.२०२१ या दिवशी दुपारी जिजींनी त्यांची इहलोकीची यात्रा संपवली. जिजींसारख्या तडफदार साधकाच्या चरणी कोटीशः प्रणाम ! आणि अशा साधकांना ज्यांनी निर्माण केले, त्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः नमन !’

– सौ. आनंदी रामचंद्र पांगुळ, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१६.६.२०२१)


कै. (सौ.) जीजींची सौ. सुलोचना जाधवआजी यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

सौ. सुलोचना जाधव

१. सेवेची तळमळ

‘कै. (सौ.) चंद्ररेखा जाखोटिया (जीजी) संगणकावर सेवा करत असतांना त्यांना टंकलेखनासाठी कुणी कागद आणून दिल्यावर सेवा मिळाल्यामुळे त्यांना पुष्कळ आनंद होत असे. मी कधी त्यांना माझे लिखाण नेऊन दिले, तर माझ्या लिखाणातील उणिवा त्या मला सांगत असत. माझ्या लिखाणात काही शब्द त्यांनी पालटले, तर त्या मला बोलावून तसे केल्याचे सांगत असत.

२. कृतज्ञताभाव

जाखोटियाकाका आश्रमसेवेनिमित्त गेले असतांना मी जीजींना सोबत म्हणून त्यांच्या खोलीत बसायला गेल्यावर त्यांना फार आनंद होत असे. तेव्हा त्या म्हणायच्या, ‘‘प्रतिदिन थोडा वेळ तरी येत जा. मला तेवढाच सत्संग मिळतो. देवाने मला चांगले पती दिले आहेत. देवाने मला गुरुदेवांची भेट घालून दिली. त्यामुळे या आजारपणातही मी आनंदात राहू शकते. त्यासाठी मी कृतज्ञ आहे.’’ असे म्हणतांना त्यांचा कृतज्ञताभाव जाणवत असे.

३. प्रार्थना

‘ईश्वर त्यांची पुढील प्रगतीही अशीच करून घेवो’, अशी प्रार्थना करते.’

– सौ. सुलोचना जाधव, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१६.६.२०२१)