रिक्शाचालकाची आमदार दानवे यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार !
संभाजीनगर येथे आमदार दानवे यांनी रिक्शाचालकाला कानशिलात लगावल्याचे प्रकरण
संभाजीनगर – वाहतूक खोळंबा झाल्याने वाहतूक सुरळीत करण्यासाठी शिवसेनेचे आमदार डॉ. अंबादास दानवे रस्त्यावर उतरले. त्या वेळी नियम तोडणारा रिक्शाचालक अजय जाधव यांचा बेशिस्तपणा पाहून त्यांनी त्यांच्या कानशिलात लगावली. आमदार अंबादास दानवे यांनी मारहाण केल्याप्रकरणी रिक्शाचालक अजय जाधव यांनी २९ जून या दिवशी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, मित्राची रिक्शा घेऊन शहागंज, मोंढा येथे किराणा साहित्य आणि भाजीपाला आणण्यासाठी जात होतो; मात्र आमदार दानवे यांनी काही चूक नसतांना मला शिवीगाळ करून मारहाण केली. ‘माझी चूक काय ?’ असे विचारत होतो. त्या वेळी त्यांच्यासमवेत पोलीस होते. त्यांच्या कार्यकर्त्यांनीही मला शिवीगाळ केली. मारहाणीचा व्हिडिओ प्रसारित करून समाजात स्वतःची अपर्कीती केल्यामुळे माझी मानहानी झाली आहे. काही चूक नसतांना आमदाराने पोलिसांसमोर आपल्याला मारहाण केली. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करून मला न्याय मिळवून द्यावा, अशी तक्रार पोलीस महासंचालक संजय पांडे, पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता आणि क्रांतीचौक पोलीस ठाण्यात केली आहे.