विशाळगडावर वसीम हबीब शहा यांचे अनधिकृतपणे चालू असलेले विंधन विहीरीचे (‘बोअरवेल’चे) खोदकाम तात्काळ थांबवा ! – शाहूवाडी तहसीलदारांची आंबा मंडल अधिकार्यांना नोटीस
‘विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती’च्या आंदोलनाचा परिणाम !
अनधिकृत बांधकाम चालू असल्याचे स्थानिक प्रशासनाच्या लक्षात कसे आले नाही ?
कोल्हापूर, १ जुलै (वार्ता.) – विशाळगड हा ‘संरक्षित स्मारक क्षेत्रा’त येतो. या क्षेत्रात वसीम हबीब शहा (पो. गजापूर, ता. शाहूवाडी) यांचे अनधिकृतपणे विंधन विहीरीचे (‘बोअरवेल’चे)चे खोदकाम चालू असून ते तात्काळ थांबवण्यात यावे, अशी नोटीस शाहूवाडीच्या तहसीलदारांनी आंबा मंडल अधिकार्यांना पाठवली.
तहसीलदारांनी आंबा मंडल अधिकार्यांना दिलेल्या नोटिसीत म्हटले आहे की, सदरच्या अनधिकृत बांधकामाविषयी पुणे येथील पुरातत्व विभागाच्या साहाय्यक संचालकांकडून नोटीस प्राप्त झाली असून सदरचे बांधकाम तात्काळ थांबवण्यात यावे आणि कार्यवाहीचा अहवाल सादर करावा.
गेल्या मासात विशाळगडावरील झालेल्या अतिक्रमणाच्या संदर्भात पुणे येथील पुरातत्व खात्याचे साहाय्यक संचालक विलास वहाणे यांनी विशाळगड येथे भेट देऊन पहाणी केली. वहाणे यांनी गडावरील १२ अतिक्रमण धारकांना १५ दिवसांची नोटीस दिली. विशाळगडावरील अतिक्रमणे, समाधींची दुरवस्था, तसेच अन्य मागण्यांसाठी ‘विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती’ने आवाज उठवला आहे. त्याचच परिणाम म्हणून प्रशासनाकडून आता पुढील कारवाई केली जात आहे.