‘ऑनलाईन’ वर्ग चालू असतांना विद्यार्थी भ्रमणभाषवरील खेळांत (ऑनलाईन गेम्स) व्यस्त असल्याचे उघडकीस !
|
मडगाव, ३० जून (वार्ता.) – राज्यात सध्या कोरोना महामारीमुळे सर्व शैक्षणिक संस्थांचे वर्ग ‘ऑनलाईन’ स्वरूपात चालू आहेत. ज्या मुलांना ‘इंटरनेट’ची अडचण नाही, अशी मुले या ‘ऑनलाईन’ वर्गात सहभागी होतात; मात्र अनेक मुले ‘ऑनलाईन’ वर्ग चालू असतांना भ्रमणभाषवरील खेळ (ऑनलाईन गेम्स) खेळत असल्याचे उघड झाले आहे. मडगाव येथील एका विद्यार्थ्याने अशाच एका खेळामध्ये १ लक्ष रुपये गमावल्याचे उघड झाले आहे. भ्रमणभाषवरील अशा खेळांवर नियंत्रण आणण्याची मागणी जोर धरत आहे.
सविस्तर माहितीनुसार,
१. मडगाव येथील एका विद्यार्थ्याला गेल्या २ वर्षांपासून भ्रमणभाषवरील खेळाचे (ऑनलाईन गेम्स) वेड लागले आहे. भ्रमणभाषवर खेळणे आणि तो जिंकणे, हा या मुलासाठी प्रतिष्ठेचा प्रश्न बनला. या मुलाने स्वत:च्या भ्रमणभाषवर ‘फ्री फायर’ हा खेळ (गेम) ‘डाऊनलोड’ करून घेतला.
२. ‘ऑनलाईन’ वर्ग चालू असतांना भ्रमणभाषवर ‘फ्री फायर’ खेळणार्या विद्यार्थ्याने पुढील धक्कादायक माहिती प्रसारमाध्यमांना दिली आहे. तो म्हणाला, ‘‘ऑनलाईन’ वर्ग चालू असतांना मी आणि इतर काही विद्यार्थी भ्रमणभाषवर ‘फ्री फायर’ हा खेळ खेळायचो. यामुळे ‘ऑनलाईन’ वर्गात शिक्षक काय शिकवतात ? याची कोणतीही कल्पना आम्हाला नव्हती. शिक्षक जेव्हा ‘ऑनलाईन’ वर्ग घेतात, तेव्हा भ्रमणभाषवर ‘गेम’ खेळणे सोपे आहे. भ्रमणभाषवरील ‘फीचर्स’मुळे हे शक्य आहे. हा खेळ केवळ शाळेतील विद्यार्थ्यांसमवेत नव्हे, तर कुणासमवेतही खेळता येतो. या खेळात मुलींचाही मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. १० वर्षे वयापासून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंतची सर्व मुले या ‘ऑनलाईन गेम्स’ खेळण्यात व्यस्त असतात.’’
३. सध्या विद्यार्थ्यांमध्ये ‘फ्री फायर’ हा खेळ लोकप्रिय झाला आहे. दिवसभर मुले या खेळात व्यस्त असतात. एकमेकांचा पराभव करणे आणि विजय मिळवणे, यांसाठी चुरस लागलेली असते. या ‘गेम्स’ खेळण्यासाठी अत्याधुनिक शस्त्रे आणि दारूगोळा खरेदी करावा लागतो. यासाठी ‘ऑनलाईन’ पैसे खेळ चालवणार्या आस्थापनाकडे भरावे लागतात. मडगाव येथील संबंधित विद्यार्थ्याने आतापर्यंत सुमारे १ लक्ष रुपये ‘फ्री फायर’ या खेळावर खर्च केले आहेत. मडगाव येथील संबंधित विद्यार्थी पुढे म्हणाला, ‘‘माझे इतर मित्रही अशाच प्रकारे पैसे खर्च करून ‘ऑनलाईन गेम्स’ खेळतात. या खेळामध्ये जो ‘प्रो प्लेयर’ होतो, त्याला या खेळातील ‘मास्टर’ मानले जाते. त्याला मुलीही पुढे पसंत करतात. मुली स्वत:हून मैत्री करतात. दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत मी या ‘ऑनलाईन गेम्स’ खेळत बसायचो.’’
४. हा विद्यार्थी एकदा खेळतांना त्याने मडगाव परिसरातील ४ मुलांचा पराभव केला. त्या ४ मुलांनी या विद्यार्थ्याशी संपर्क साधून ‘तो कुठे रहातो ?’ याची विचारपूस केली आणि त्याला भेटण्यासाठी बोलावले. विद्यार्थी भेटायला गेल्यावर या ४ मुलांनी त्याने खेळात त्यांना हरवल्याविषयी त्याला मारहाण केली.
५. त्याच काळात कोरोना महामारी काही अंशी आटोक्यात आल्याने मुले वर्गात जात होती. हा विद्यार्थी ४-५ दिवस वर्गात न आल्याने शिक्षकांनी विद्यार्थ्याच्या पालकांशी संपर्क साधून त्यांना शाळेत बोलावून घेतले. या वेळी विद्यार्थ्यानेे ही धक्कादायक माहिती शिक्षकांना दिली.