खासगी रुग्णालयांची तपासणी करणारा अधिकारीच भ्रष्टाचारी असेल, तर जनतेला न्याय कसा मिळणार ? – माजी आमदार परशुराम उपरकर, मनसे

खासगी कोविड सेंटर रुग्णालयात रुग्णांना अवाजवी देयके दिली जात असल्याचा आरोप

एक राजकीय व्यक्ती शासकीय अधिकार्‍यांवर करत असलेले आरोप गंभीर असून शासनाला याविषयी काय म्हणायचे आहे ? हे आरोप खरे असल्यास संबंधितांवर त्वरित कारवाई होऊन जनतेची लूट रोखणे अपेक्षित आहे !

प्रतिकात्मक छायाचित्र

कणकवली – कोरोनाबाधितांच्या खासगी रुग्णालयात होणार्‍या लुटीच्या विरोधात कणकवली प्रांत कार्यालयाच्या बाहेर घंटानाद आंदोलन केले होते. त्या वेळी संबंधित महिला प्रांताधिकार्‍याची असंवेदनशीलता दिसून आली. चाकोरीबद्ध बोलणारा अधिकारी जिल्ह्यात प्रथमच पाहिला आहे. जनतेच्या प्रश्‍नांवर त्या महिला अधिकार्‍याची भूमिका संशयास्पद होती. त्याचप्रमाणे कणकवली तालुक्यात खासगी कोविड सेंटर असलेल्या रुग्णालयांची तपासणी करण्याचे दायित्व असलेल्या अधिकार्‍याने यापूर्वी भ्रष्टाचार केलेला आहे. असा अधिकारी जनतेला न्याय काय देणार ? या अधिकार्‍याच्या विरोधात मुख्यमंत्री आणि महसूलमंत्री यांच्याकडे तक्रार करणार आहोत, अशी माहिती मनसेचे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दिली. माजी आमदार उपरकर यांनी ‘ऑनलाईन’ पद्धतीने पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी मनसेचे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री उपस्थित होते.

या वेळी उपरकर म्हणाले, 

१. लोकांची गार्‍हाणी सांगायला गेलो, तेव्हा त्या महिला प्रांताधिकार्‍यांनी दिलेली वागणूक चुकीची आहे. त्यांच्या वागणुकीचा आम्ही निषेध करतो.

२. खासगी कोविड सेंटरमध्ये रुग्णांना लुटले जात असल्यासंदर्भात आम्ही प्रश्‍न मांडत असतांना त्या महिला अधिकार्‍यांची सहनशीलता दिसली नाही. या अधिकारी जनतेच्या सेवक असतांना असंवेदनशीलता कशी दाखवतात ? अधिकार्‍यांना कोणतीही माहिती नव्हती.

३. सध्या कोरोनाबाधित रुग्णांना खासगी रुग्णालयांतून देण्यात आलेली देयके तपासण्यासाठीच्या समितीच्या प्रमुख श्रीमती पाटील सुटीवर आहेत. त्यामुळे त्यांचा पदभार कणकवलीचे नायब तहसीलदार यांच्याकडे दिलेला आहे. हा अधिकारी भ्रष्टाचारी आहे. त्या अधिकार्‍याने यापूर्वी वैभववाडी आणि राजापूर या तालुक्यांत मोठे भ्रष्टाचार केले आहेत.

४. अधिकच्या रकमेच्या देयकांची चौकशी अशा भ्रष्टाचारी अधिकार्‍याकडे असल्यास गोरगरीब जनतेला न्याय कसा मिळणार ? पूर्वीपासूनची जी अतिरिक्त देयके घेतली आहेत, ती परत केली पाहिजेत.

५. त्या ६ रुग्णांच्या नातेवाईकांना अद्याप पैसे मिळालेले नाहीत. पालकमंत्री जनतेच्या प्रश्‍नांकडे दुर्लक्ष करत आहेत. खासगी कोविड रुग्णालयात रुग्णांवर उपचार काय केले ? तपासणी काय केली ? त्या खासगी रुग्णालयांत उपचारपद्धत काय आहे ? याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडून घेणार आहे.

६. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना काही रुग्णालयांत लागू असूनही त्याचा रुग्णांना लाभ दिला जात नाही. याविषयी मुख्यकार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करणार आहे.