शेतकर्याच्या पत्नीची तहसीलदारांविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार
शेतकर्याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे प्रकरण
भ्रष्टाचाराने पोखरलेले महसूल खाते !
शासकीय कार्यालयातील कामे शुल्क भरून पूर्ण करता येतात; मात्र पैशाची चटक लागलेले प्रशासकीय अधिकारी लाच मागून गरीब शेतकर्यांना नाहक त्रास देत आहेत. असे प्रकार सतत घडत असल्याने सरकारने याकडे लक्ष देऊन शेतकर्यांना न्याय आणि दोषी अधिकार्यांना कठोर शिक्षा केली पाहिजे !
अमरावती – शेतातील वहिवाटीचा रस्ता मोकळा करून देण्यासाठी शेतकरी सचिन वाटाणे यांनी २८ जून या दिवशी नायब तहसीलदारांच्या दालनात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या प्रकरणात त्यांच्या पत्नी प्रियंका यांनी तहसीलदार धीरज स्थूल आणि नायब तहसीलदार सवई यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. हे प्रकरण निकाली काढण्यासाठी संबंधित अधिकार्यांनी २० सहस्र रुपयांची मागणी करून मानसिक त्रास दिला, असा गंभीर आरोप त्यांनी तक्रारीतून केला आहे.
१. प्रियंका वाटाणे यांनी तक्रारीत म्हटले आहे की, पती सचिन यांनी धीरज स्थूल आणि सवई यांच्याकडे विनंती करून न्यायाची मागणी केली. त्यावर ‘तुमच्याकडे २० सहस्र रुपये असतील, तर द्या. त्यानंतरच अर्ज संमत करून तुमच्या बाजूने निकाल देतो’, असे त्यांना सांगण्यात आले; मात्र घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे आम्ही मागणी पूर्ण करू शकलो नाही. त्यामुळे सदर प्रकरण आदेशासाठी प्रलंबित ठेवण्यात आले.
२. २८ जून या दिवशी सकाळी पुन्हा २० सहस्र रुपयांची मागणी करण्यात आली. पैसे न दिल्यास अर्ज निकाली काढण्याची धमकी देण्यात आली.
३. संबंधित अधिकार्यांच्या आर्थिक आणि मानसिक त्रासाला कंटाळूनच पती सचिन वाटाणे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला.
४. याला सर्वस्वी तहसीलदार आणि नायब तहसीलदार उत्तरदायी असून त्यांनीच माझ्या पतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करून कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.
५. तक्रारीच्या अनुषंगाने साहाय्यक पोलीस निरीक्षक चौकशी करत आहेत.