‘इग्नू’च्या ज्योतिष अभ्यासक्रमाला ब्राह्मण महासंघाचा पाठिंबा !
विरोध करणार्या अंनिसला खुल्या चर्चेचे आवाहन
पुणे – इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापिठाने (इग्नू) २०२१-२२ या शैक्षणिक वर्षापासून ज्योतिष विषयातील २ वर्षांचा पदव्युत्तर अभ्यासक्रम चालू करण्याचा निर्णय घेतला. ग्रह-तार्यांचा मानवी जीवनावर कसा परिणाम होतो ? यावर हा अभ्यासक्रम अवलंबून असेल. प्राचीन ऋषींची मते काय होती ? याचा आधार घेऊन घटकांची मांडणी करण्यात आल्याचे ‘इग्नू’चे म्हणणे आहे. ‘ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासातून तरुणाई अंधश्रद्धेच्या खाईत लोटली जाणार’, असा आरोप करत तो मागे घेण्याची मागणी अंनिसने केली आहे. या प्रकरणी ब्राह्मण महासंघाने अंनिसला खुल्या चर्चेचे आवाहन केले आहे.
ब्राह्मण महासंघाने ३० जून या दिवशी महाराष्ट्रातील ७० ज्योतिष शिक्षण संस्थाचालकांच्या पाठिंब्याचे पत्र ‘इग्नू’ला दिले. ब्राह्मण महासंघाने या सर्वांचे आभार मानले आहेत. ‘या अभ्यासक्रमामुळे या सहस्रो वर्षे जुन्या शास्त्राचा वैज्ञानिक आधार वाढण्यास साहाय्याच होणार आहे. त्यामुळे कोणत्याही दबावाला बळी पडू नका’, अशी विनंतीही ब्राह्मण महासंघाने केली आहे. ‘इग्नू’च्या वतीने हा अभ्यासक्रम चालू रहाणार असल्याचे आश्वासन दिल्याचे ब्राह्मण महासंघाने सांगितले.
हिंदु धर्माच्या विरोधातील आवाजाविरुद्ध ब्राह्मण महासंघाकडून पूर्ण शक्तीनिशी प्रयत्न ! – आनंद दवे, ब्राह्मण महासंघ
हिंदु धर्म विरोधातील आवाज मग तो बेंगळुरूमधील शिवछत्रपतींच्या पुतळ्याच्या अपमानाचा असो, शिर्डीतील असो कि अंनिसचा असो, ब्राह्मण महासंघ पूर्ण शक्तीनिशी असे विषय हाताळतो आणि त्याला प्रचंड प्रतिसादही मिळतो, अशी प्रतिक्रिया ब्राह्मण महासंघाचे श्री. आनंद दवे यांनी दिली आहे.