गोवा येथील श्री. महादेव बापूराव जगताप (वय ८९ वर्षे) यांची त्यांच्या सुनेला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये…
गोवा येथील श्री. महादेव बापूराव जगताप (वय ८९ वर्षे) यांची त्यांच्या सुनेला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या आजारपणात त्यांची सेवा करतांना साधनेचे दृष्टीकोन ठेवल्याने झालेला लाभ
१. वडिलांचे निधन झाल्यावर कुटुंबाचे दायित्व चांगल्या प्रकारे पार पाडणे
‘माझे सासरे श्री. महादेव जगताप (बाबा) यांचे मूळ गाव शिगवण (तालुका मंडणगड, जिल्हा रत्नागिरी) आहे. त्यांचे जीवन पहिल्यापासूनच पुष्कळ कष्टात गेले. लहानपणीच त्यांचे वडील वारले. त्यामुळे घराचे सर्व दायित्व त्यांच्यावर आले. दोन भाऊ आणि एक बहीण असे त्यांचे कुटुंब आहे. ‘त्यांचे लग्न करून देणे, त्यांना घर घेऊन देणे’, असे सर्व दायित्व बाबांनी पार पाडले.
२. पत्नीशी नेहमी संयमाने, शांतपणे आणि नम्रपणे बोलणे
माझ्या सासूबाईंना (त्यांच्या पत्नीला) व्यवहारातील ज्ञान अल्प होते. त्यांच्याकडून ‘पुष्कळ प्रमाणात जेवण बनवणे किंवा वाया घालवणे’, असे व्हायचे. बाबा प्रत्येक वेळी त्यांना शांतपणे आणि स्थिरतेने सांगायचे, ‘‘अगं, एवढं जेवण बनवू नकोस. जेवढे पाहिजे तेवढेच जेवण बनवायला हवे.’’ त्या ऐकण्याच्या स्थितीत नसायच्या; पण प्रत्येक दिवशी बाबा त्यांना तेवढ्याच शांतपणे सांगायचे. बाबा त्यांना ‘तुला काही कळत नाही’, असे कधीच बोलले नाहीत. कधी कधी सासूबाई मोठ्या आवाजात बोलायच्या; पण बाबा कधीच त्यांच्याशी मोठ्याने बोलले नाहीत किंवा भांडले नाहीत. ते त्यांच्याशी नम्रपणे बोलायचे. ‘आपल्यात किती संयम असायला हवा ?’, हे मला त्यांच्याकडून शिकायला मिळाला.
३. आर्थिक स्थिती हलाखीची असतांनाही कुणाकडूनही पैशाची अपेक्षा न करणे
आधी ते मुंबई येथे कपड्याच्या कारखान्यात काम करायचे. तिथे त्यांना फार पैसे मिळाले, असे नाही. नंतर कारखाना बंद पडला आणि त्यांची आर्थिक परिस्थिती पुष्कळ हलाखीची झाली. त्यानंतर त्यांनी चौकीदाराची नोकरीही केली. ‘आपल्या भावंडांनी किंवा अधिकोषात कामाला असलेल्या मुलाने आपल्याला पैसे द्यावेत’, अशी अपेक्षा त्यांनी कधीच केली नाही.
४. आयुर्वेदाविषयी ज्ञान असणे आणि लोकांवर आयुर्वेदाचे उपचार विनामूल्य करून त्यांना बरे करणे
आयुर्वेदाविषयी त्यांना पुष्कळ ज्ञान आहे. पूर्वी ते काही आजारांवर घरगुती औषधे बनवून द्यायचे. सर्दी आणि खोकला झाला, तर ते अडुळशाचा काढा करून द्यायचे. काढा बनवण्याची त्यांची पद्धत वेगळी आहे. ते अडुळशाच्या पानांची मुळी बांधून ती तव्यावर शेकायचे. नंतर त्याचा रस काढून मुलांना द्यायचे. या उपायाने कित्येक मुलांची सर्दी लगेच बरी झाली आहे. बाबा नागीण आणि कावीळ यांसारख्या आजारांवरही विनामूल्य उपचार करायचे.
ते जेथे कामाला जायचे, तेथील त्यांच्या मालकांची कंबर एकदा फार दुखायला लागली. तेव्हा बाबांनी अडुळशाची पाने, तिळाचे तेल आणि महाभृंगराज तेल, हे सर्व एका मोठ्या डब्यामध्ये घातले अन् त्या खाली शेकोटी सिद्ध केली. त्यांनी मालकाला तेलाने मर्दन केले आणि नंतर नळीद्वारे डब्यामध्ये बनलेल्या वाफेचा शेक दिला. त्यानंतर मालक चालायला लागले.
५. सून रुग्णाईत असतांना तिची वडिलांप्रमाणे काळजी घेणे
वर्ष १९९२ मध्ये माझे लग्न झाले. त्यानंतर सहा मासांनी मी पडल्यामुळे माझ्या हाताचा अस्थिभंग झाला. तेव्हा त्यांनी वडिलांप्रमाणे माझी काळजी घेतली. ‘माझ्या हाताला मर्दन करणे, रुग्णालयात जेवण घेऊन येणे’, असे सर्व त्यांनी केले. हातामुळे घरातील काम करता येत नसल्याने सासूबाई मला ओरडायच्या. त्या ओरडू नयेत; म्हणून ते ‘पीठ मळून देणे, पाणी भरणे’, अशी सगळी कामे करायचे.
६. पत्नीचा मृत्यू झाल्यावर स्थिर रहाणे
काही कारणांमुळे सासूबाईंना बरे वाटत नव्हते; म्हणून वर्ष २०१२ मध्ये बाबा गावाहून डोंबिवलीला आले. तेव्हापासून आम्ही सर्व जण डोंबिवलीला रहायला लागलो. त्याच वर्षी सासूबाईंचा मृत्यू झाला. तेव्हा बाबा स्थिर होते.
७. निरपेक्षता
सहा मासांनंतर बाबांना हृदयविकाराचा झटका आला. शस्त्रकर्म करण्यासाठी आम्ही त्यांना रुग्णालयात घेऊन गेलो. वैद्यांनी ‘सहा ते साडेसहा लक्ष रुपये व्यय येईल’, असे सांगितले होते. तेव्हा ते म्हणाले, ‘‘शस्त्रकर्म करू नका. माझ्या नशिबात जेव्हा मृत्यू असेल, तेव्हा मी जाणारच आहे. एवढे पैसे आपल्याकडे नाहीत.’’ ती परिस्थितीही त्यांनी स्वीकारली. ‘मुलाने माझ्यासाठी काहीतरी करायला पाहिजे’, अशी अपेक्षा त्यांनी केली नाही. देवाच्या कृपेने आणि त्यांच्या पुण्याईने आम्हाला पैसे मिळाले अन् त्यांचे शस्त्रकर्म केले.
८. शस्त्रकर्मासाठी रुग्णालयात भरती केल्यावर प.पू. भक्तराज महाराज सूक्ष्मातून आल्याची अनुभूती येणे
त्यांना रुग्णालयात भरती केले. त्या दिवशी ‘प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) त्यांच्याजवळ सूक्ष्मातून येऊन बसले आणि त्यांच्या समवेत बोलले’, अशी अनुभूती त्यांना आली. नंतर त्यांनी मुलाला सांगितले, ‘‘प.पू. बाबा आले होते. तू घाबरू नकोस.’’
९. त्यानंतर त्यांना रुग्णालयातून घरी आणल्यावर मी सकाळी जेवण बनवून सेवेला जायचे. तेव्हा त्याविषयी त्यांनी मला कधीच काही म्हटले नाही. ते स्वतः जेवण वाढून घ्यायचे.
१०. बाबा कुणालाही न सांगता खार येथील जुन्या घरी जाणे आणि ते हरवल्याची तक्रार करण्यासाठी कुटुंबीय पोलीस ठाण्यात गेल्यावर पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ करणे
१२.५.२०१७ या दिवशी बाबा घराच्या खालील परिसरात बसायला गेले होते. तेव्हा पूर्वी रहात असलेल्या ठिकाणी, म्हणजे खार (मुंबई) येथे जाण्याचा विचार त्यांच्या मनात आला. ते कुणाला काहीही न सांगता घराच्या खालून अंगावरील कपड्यांनिशी रिक्शाने डोंबिवली आगगाडी स्थानकावर गेले. तिकीट काढून ते आगगाडीने दादरला गेले आणि तेथून खारला पोचले. ते आम्हाला शोधूनही सापडत नव्हते; म्हणून दुसर्या दिवशी आम्ही पोलीस ठाण्यात गेलो. तेव्हा मोठे साहेब आले नसल्यामुळे आमची तक्रार लिहून घेतली नाही आणि त्यांनी आम्हाला तिथेच ताटकळत बसायला लावले.
१० अ. सद्गुरु गाडगीळकाकांनी ‘बाबा पूर्वेच्या दिशेला गेले असून ते सुरक्षित आहेत’, असे सांगणे, प्रार्थना केल्यावर बाबा ४ दिवसांनी सापडणे आणि त्यांच्याभोवती सुरक्षेची वलये दिसणे : १४.५.२०१७ या दिवशी मी बाबा हरवल्याचे रामनाथी आश्रमात रहात असलेल्या माझ्या मुलांना सांगितले. त्यांनी सद्गुरु गाडगीळकाकांना याविषयी विचारले. तेव्हा त्यांनी ‘बाबा पूर्वेच्या दिशेला गेले असून ते सुरक्षित आहेत’, असे सांगितले. त्यानंतर आम्ही दोघांनी प्रार्थना केली आणि त्याच सेकंदाला श्री. जगताप यांच्या मित्राचा भ्रमणभाष आला. ते म्हणाले, ‘‘बाबा हरवले आहेत का ? ते इथे आहेत.’’ आम्ही त्यांना आणायला गेलो. तेव्हा मला बाबांभोवती सुरक्षेची वलये अनुभवता आली आणि पिवळा प्रकाश दिसला. ‘कुणीतरी त्यांच्या समवेत होते’, असे मला दिसले. त्यांच्याकडे दीडशे रुपये आणि सोन्याची अंगठी होती; पण त्याला कुणीच हात लावला नाही. १५.५.२०१७ या दिवशी, म्हणजे ४ दिवसांनी आम्हाला बाबा सापडले.
११. बाबांचे आजारपण आणि त्यांची सेवा करतांना साधनेचा दृष्टीकोन ठेवल्याने झालेला लाभ
११ अ. गोवा येथे रहायला आल्यावर बाबांना लघुशंकेचे भान न रहाणे आणि त्याविषयी स्वयंसूचना दिल्यानंतर लघुशंका लागल्यावर त्यांनी सांगणे : २७.७.२०१७ या दिवशी आम्ही गोव्यात आलो. त्या वेळी आम्ही बाबांना विचारले, ‘‘आता आपण सगळे गोव्याला जातोय. तुम्हाला चालेल ना ?’’ तेव्हा त्यांनी ते स्वीकारले. ‘तुम्ही जसे ठेवाल, तसे मी रहाणार’, असे ते म्हणाले आणि त्याप्रमाणे ते रहात आहेत. इथे आल्यानंतर घराला अनेक दरवाजे असल्यामुळे ‘शौचालय कुठे आहे ?’, हे त्यांना कळत नव्हते. त्यामुळे ते कुठेही लघुशंका करायचे. कु. प्रियांका आणि श्री. शुभम् (त्यांची नातवंडे) यांनी त्यांना ‘मला लघवीला लागल्यावर तसे मी सांगीन’, अशी स्वयंसूचना द्यायला सांगितली. ५ दिवसांतच या सूचनेचा त्यांच्यावर परिणाम झाला आणि ते लघवीला लागल्यावर सांगू लागले.
११ आ. एका संतांना भेटल्यावर त्यांनी सासर्यांची सेवा संत म्हणून करण्यास सांगणे आणि त्यांच्या संकल्पाने सेवा करू शकत असल्याचे जाणवणे : गोव्याला आल्यानंतर २ मासांनी आम्ही एका संतांना भेटायला गेलो. तेव्हा बाबांची स्मरणशक्ती अल्प झाली होती. ते संत बाबांना म्हणाले, ‘‘तुम्ही कशाला आलात ? मीच तुम्हाला भेटायला आलो असतो.’’ त्या वेळी ते संत मला म्हणाले, ‘‘आता तुम्ही संत म्हणून त्यांची सेवा करा. त्यातच तुमची प्रगती आहे.’’ ‘त्यांच्याच संकल्पामुळे मी बाबांची सेवा करू शकते’, असे मला तीव्रतेने जाणवते.
११ इ. स्मृतीभ्रंशाचा त्रास वाढल्याने बाबांना शौच किंवा लघुशंका यांचे भान न रहाणे, त्यामुळे चिडचिड होणे आणि ‘परिस्थिती स्वीकारायला हवी’, याची जाणीव होणे : गोव्यात आल्यानंतर त्यांचा स्मृतीभ्रंशाचा त्रास वाढला. त्यामुळे ते आता काहीच करू शकत नाहीत. त्यांना शौच किंवा लघुशंका झालेलीही लक्षात येत नाही. या गोष्टीमुळे आधी माझी पुष्कळ चिडचिड व्हायची. एक मास या संघर्षातच गेला. ‘देव यातून काहीतरी शिकवत आहे’, असा विचार देवच आतून देत होता. ‘जोपर्यंत आपण परिस्थिती स्वीकारत नाही, तोपर्यंत असे प्रसंग येतच रहाणार’, हे मला शिकायला मिळाले.
११ ई. स्मृतीभ्रंश झालेला असूनही परात्पर गुरुदेवांना ओळखणे : एकदा मी, श्री. जगताप आणि बाबा जेवायला बसलो होतो. तेव्हा दूरचित्रवाणीवर सनातन संस्थेविषयी अपप्रचार करणारी वृत्ते चालू होती. त्यामध्ये आधी एका तथाकथित अंधश्रद्धा निर्मूलनवाल्याचे आणि नंतर परात्पर गुरुदेवांचे छायाचित्र दाखवत होते. तेवढ्यात बाबा म्हणाले, ‘‘हे बघ साहेब, हे बघ साहेब.’’ आम्हाला ‘कोण साहेब ?’, हे कळलेच नाही. नंतर लक्षात आले की, बाबा परात्पर गुरुदेवांच्या छायाचित्राकडे पाहून त्यांना ‘साहेब’ म्हणाले. तेव्हा मला आधी आश्चर्य वाटले आणि नंतर पुष्कळ कृतज्ञता वाटली.
११ उ. आरंभी बाबांची स्थिती समजून न घेतल्याने प्रतिक्रिया येणे, भावाच्या स्तरावर सेवा केल्याने बाबांचे मल-मूत्र स्वच्छ करतांना दुर्गंध न येणे आणि आंतरिक भाव अनुभवता येणे : मी नामजप करत त्यांची सेवा करायचे; पण ते नामजप करत नसल्याने मला त्यांना सांगावे लागायचे, ‘‘बाबा, नामजप करा. नामजप केल्याने आनंद मिळेल.’’ यातून ‘आपल्या मनावर नामजप करण्याचे संस्कार होणे किती आवश्यक आहे ?’, हे मला शिकायला मिळाले. आरंभी देवाचे साहाय्य न घेता ‘मला सर्व करावे लागते’, असा माझा विचार असायचा. बाबांच्या स्थितीला जाऊन त्यांना समजून घेण्याचा भाग माझ्याकडून होत नव्हता. आधी समोरच्याची परिस्थिती समजून न घेता माझ्याकडून पटकन प्रतिक्रिया व्यक्त व्हायच्या. ‘बाबांना ‘डायपर’ (मल-मूल शोषून घेणारे वस्त्र) दिल्यास ते त्यात शौच आणि लघुशंका करत नाहीत. त्यांना पुनःपुन्हा स्वच्छ करावे लागते’, अशा प्रतिक्रिया मला यायच्या. हे करत असतांना आधी पुष्कळ दुर्गंध यायचा. आता तो बंद झाला आहे आणि आता मला त्याचे काही वाटत नाही. आता मला आंतरिक भाव अनुभवता येत आहे.
‘गुरुदेवा, बाबांची अंतर्गत साधना चालू असेलही; परंतु ती माझ्यासारख्या जिवाला कळत नाही. ‘आपणच त्यांना आणि आम्हाला सद्बुद्धी देऊन अन् आमच्यावर कृपा करून आमचा उद्धार करावा’, ही प्रार्थना ! या सेवेची संधी देऊन माझ्यावर केलेल्या कृपेसाठी आपल्या चरणी अनंत कृतज्ञता !’
– सौ. ज्योत्स्ना जगताप, फोंडा, गोवा. (८.१०.२०२०)
|