ख्रिस्ती शाळांची कुकृत्ये !

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी रोमन कॅथॉलिक चर्चविषयी घेतलेली भूमिका हा सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरला आहे. गेल्या शतकात कॅनडातील रोमन कॅथॉलिक चर्च संचालित शाळांत झालेल्या सहस्रावधी आदिवासी मुलांच्या मृत्यूसाठी ट्रूडो यांनी थेट ख्रिस्त्यांचे सर्वाेच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनाच उत्तरदायी ठरवले आहे. यासह ट्रूडो यांनी ‘पोप यांनी कॅनडाच्या भूमीवर येऊन येथील जनतेची क्षमा मागावी’, अशी मागणी केली आहे. पोप यांच्याकडे क्षमा मागण्याची मागणी केलेले हे पहिले प्रकरण नव्हे. यापूर्वीही अनेकदा कुणी ना कुणी अशा मागण्या केल्या आहेत आणि वेगवेगळ्या पोपनी त्यानुसार क्षमायाचनाही केलेली आहे. ट्रूडो यांनी थेट पोप यांनाच क्षमा मागण्याचे आव्हान करण्यामागे कारणही तसेच गंभीर आहे. १९ व्या शतकाच्या आरंभीपासून ते १९७० च्या दशकापर्यंत, म्हणजे अनुमाने ७० वर्षे कॅनडातील तत्कालीन विविध सरकारांनी दीड लाख आदिवासी मुलांना चर्च संचालित ‘कॉन्व्हेंट बोर्डिंग शाळां’मध्येच शिक्षण घेण्यासाठी बाध्य केले होते. यामागे ‘सदर मुलांना कॅनडाच्या मुख्य प्रवाहात येता यावे’, हा उद्देश होता. या धोरणामुळे सहस्रावधी मुले स्वतःची संस्कृती आणि भाषा यांपासून दुरावली, ही खंत ट्रूडो यांना कमालीची भेडसावत आहे.

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो

७० वर्षांतील विविध सरकारांच्या या चुकीसाठी ट्रूडो यांनी स्वतः दिलगिरी व्यक्त केली, यावरून त्यांच्या मनावर या घटनेचा किती आघात झाला आहे, हे लक्षात येते. रोमन कॅथॉलिक चर्च संस्थेची ही कुकृत्ये येथेच थांबत नाहीत. कॅनडातील आदिवासी नेत्यांनी चर्च संस्थेच्या कुकृत्यांचा पाढाच वाचून दाखवला. या नेत्यांनी केलेल्या आरोपांनुसार रोमन कॅथॉलिक शाळांनी या मुलांचा ‘सांस्कृतिक वंशसंहार’ केला.

वर्ष १८९९ ते १९९७ या कालावधीत ‘सॅस्कॅचेवान’ प्रांतातील एका शाळेतून ६०० थडगी, तर ब्रिटीश कोलंबिया प्रांतातील एका शाळेतून २१५ थडगी मिळाली. ‘राष्ट्रीय सत्य आणि सलोखा समिती’ने वर्ष २०१५ मध्ये घोषित केलेल्या अहवालानुसार या शाळांमध्ये किमान ३ सहस्र २०० मुलांचा मृत्यू झाला असून त्यांतील अर्ध्याहून अधिक मुलांच्या मृत्यूंच्या नोंदीच करण्यात आलेल्या नाहीत. थोडक्यात ‘कॅनडातील रोमन कॅथॉलिक चर्च संस्थेने आतापर्यंत सहस्रो मुलांचा बळी घेतला आहे आणि तिला या कृत्याविषयी जराही पश्चात्ताप होत नाही’, असा याचा सरळ अर्थ होतो. जसे कायद्याच्या दृष्टीने गुन्हा कधीही उघड झाला, तरी शिक्षा ही ठरलेलीच असते, त्याप्रमाणे ट्रूडो हे आता चर्च संस्थेला तिच्या गुन्ह्याची जाणीव करून देऊन क्षमायाचना करण्यास सांगत आहेत. अशी क्षमायाचना करून गेलेल्या मुलांचा जीव काही परत येणार नाही. ही क्षमायाचना केवळ एक औपचारिकता ठरेल. त्यामुळे चर्च संस्थेने तिच्या अमानवीय कृत्याचे आत्मपरीक्षण केले पाहिजे. अशी अमानवीय कृत्ये करणारे आज भारतात हिंदूंना मानवता शिकवत आहेत ! हिंसक वन्य प्राण्यांना लाजवतील, अशी कृत्ये करणारे हेच लोक आज भारतातील हिंदूंना असहिष्णुही ठरवत आहेत ! अशा संस्था कधीही आत्मपरीक्षण करणार नाहीत, हेही उघड आहे. त्यामुळे त्यांनी हा प्रचंड नरसंहार कुणाच्या सांगण्यावरून केला ? त्यातून काय साध्य केले ? त्यात कोण कोण सहभागी होते ? आदींची सखोल चौकशी होऊन सत्य लोकांसमोर मांडले पाहिजे. त्यामुळे इतक्या प्रचंड संख्येने मुलांचा संहार होत असतांना धर्मसत्ता काय करत होती ? हेच ट्रूडो यांना सूचित करायचे आहे. आज ५० वर्षांनंतर तरी चर्च संस्था संचालित शाळांची काय अवस्था आहे ? याचीही वस्तूनिष्ठ पडताळणी झाली पाहिजे.

भारतानेही क्षमा मागायला सांगावे !

विदेशात वरीलप्रमाणे अपकृत्ये केल्यानंतर अशा किंवा तत्सम ख्रिस्ती संस्थांनी भारतात त्यांचे हात-पाय पसरवले. भारतामध्ये इंग्रजांच्या राजवटीत याचा सर्वप्रथम शिरकाव आणि सर्वाधिक फैलाव झाला. ख्रिस्त्यांनी येथील प्राचीन गुरुकुल पद्धती मोडून ख्रिस्तीधार्जिणी मेकॉले शिक्षणपद्धत लागू केली. ज्या ‘कॉन्व्हेंट’ शिक्षणपद्धतीने कॅनडातील सहस्रो मुलांचा जीव घेतला, त्या ‘कॉन्व्हेंट’ शाळांत शिकणे भारतात आजही प्रतिष्ठेचे समजले जाते ! या शाळांमध्ये हिंदु मुलींना कुंकू अथवा टिकली लावू न देणे, बांगड्या घालू न देणे, मुलांना स्वतःच्या कपाळावर टिळा लावू न देणे आदी हिंदु संस्कृतीपासून दूर नेणार्‍या गोष्टी सर्रास होतांना आढळतात. ही शिक्षणव्यवस्था म्हणजे जणू हिंदूंचे धर्मांतर करणारी केंद्रे आहेत. त्यामुळे भारतानेही अशा ‘कॉन्व्हेंट’ शाळांविषयी आता ठोस भूमिका घेण्याची वेळ आली आहे.

धर्मांध ख्रिस्त्यांच्या भारतातील उन्मादाचे सर्वांत मोठे उदाहरण, म्हणजे त्यांनी गोव्यातील हिंदूंचा केलेला धर्मच्छल अर्थात् ‘इन्क्विझिशन’ ! धर्मांध ख्रिस्त्यांनी गोव्यातील हिंदूंना बलपूर्वक बाटवले, मंदिरे पाडली, हिंदूंच्या घरांसमोरील तुळशीवृंदावने उद्ध्वस्त केली. जे हिंदू ख्रिस्ती बनले; परंतु तरीही हिंदु धर्मानुसार आचरण चालूच ठेवले, त्यांच्या वाट्याला हे ‘इन्क्विझिशन’ आले. अशा हिंदूंनी पूर्णपणे ख्रिस्ती पंथच अंगीकारावा, यासाठी हे ‘इन्क्विझिशन’ करण्यात आले. यामध्ये सर्वांत पुढे सेंट फ्रान्सिस झेवियर होते. या ‘इन्क्विझिशन’मध्ये हिंदूंचे हातपाय तोडणे, त्यांची कातडी सोलून त्यावर मिठाचे पाणी टाकणे, नखे कुरतडणे, लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण करणे, कारागृहात डांबणे, असे अत्यंत अमानवीय प्रकार केले गेले. यामध्ये किती हिंदू मारले गेले असतील, त्याची तर गणतीच नाही. धर्मांध ख्रिस्त्यांच्या या अत्याचारांचे स्मारक ‘ओल्ड गोवा’ येथे ‘हातकातरो खांबा’च्या रूपाने आजही आपल्याला पहायला मिळते. हा खांब धर्मांधांच्या क्रूर अत्याचारांचा आजच्या घडीला एकमेव साक्षीदार आहे. अशी ही अमानवीय कृत्ये धर्माच्या नावाखाली उघडउघड चालू असतांना ख्रिस्त्यांचे त्या वेळचे पोप काय करत होते ? चर्च संस्थेचे पदाधिकारी काय करत होते ? निष्पाप हिंदूंचे दमन करणार्‍या स्वतःच्या गुंडांना कुणीही रोखण्याचा प्रयत्न का केला नाही ? याची उत्तरे खरेतर भारताने उशिरा का होईना; पण पोप यांच्याकडे मागितली पाहिजेत. इतकेच नव्हे, तर ‘सेंट फ्रान्सिस झेवियर’ने गोव्यातील सहस्रावधी हिंदूंवर केलेल्या अमानुष अत्याचारांच्या संदर्भातही पोप यांनी हिंदूंची जाहीर क्षमा मागायला हवी’, अशीही मागणी भारतीय शासनकर्त्यांनी केली पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !