सलग चौथ्या दिवशी जम्मूच्या सैन्यतळांवर आढळले ड्रोन !
गेल्या ४ दिवसांत आढळले ७ ड्रोन !
|
जम्मू – येथे सलग चौथ्या दिवशी सुरक्षादलांना ड्रोन आढळून आले. येथील मीरान साहिब, कालुचक आणि कुंजवानी भागांत ३० जूनच्या पहाटे ४ ते ५ च्या कालावधीत सुमारास आकाशात २ ड्रोन दिसले. कुंजवानी भागात वायूदलाच्या ‘स्टेशन सिग्नल’जवळ एक ड्रोन आढळून आल्याचे सुरक्षादलाने सांगितले. गेल्या ४ दिवसांत जम्मूमध्ये सैन्य आणि वायू दल यांच्या तळांच्या परिसरामध्ये न्यूनतम ७ ड्रोन आढळून आले आहेत.
जम्मूमध्ये ड्रोनद्वारे झालेल्या आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २९ जून या दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथसिंह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासमवेत तातडीची बैठक बोलावली होती. यात अशा आव्हानांचा सामना करण्यासाठी लवकरच एक धोरण आखले जाण्याविषयी ठरल्याचे सांगण्यात आले. सध्या ड्रोनद्वारे होणारी आक्रमणे रोखण्यासाठी ज्या त्रूटी आहेत, त्या दूर करण्यावर प्रामुख्याने भर द्यावा आणि त्यासाठी लागणारी सामग्री खरेदी करावी, असे तीनही सैन्य दलांना सांगण्यात आले आहे.