बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर हिंसाचाराच्या १५ सहस्र घटना ! – माजी न्यायाधिशांच्या समितीचा अहवाल
२५ जणांचा मृत्यू, तर ७ सहस्र महिलांशी छेडछाड !
एवढ्या मोठ्या प्रमाणात जर हिंसाचार झाला असेल, तर अद्याप बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट का लागू करण्यात आली नाही ? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनात येणारच !
नवी देहली – बंगालमधील विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात हिंसाचाराच्या १५ सहस्र घटना घडल्या आणि त्यात २५ लोकांचा मृत्यू झाला, असा एक अहवाल केंद्रशासनासमोर सादर करण्यात आला आहे. या हिंसाचाराच्या वेळी ७ सहस्र महिलांची छेडही काढण्यात आल्याचे या अहवालात म्हटले आहे.
केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी सांगितले की, सिक्किम उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश प्रमोद कोहली यांच्या नेतृत्वाखाली ५ सदस्यीय ‘नागरिक समाज समुहा’कडून ‘कॉल फॉर जस्टिस’ नावाचा अहवाल सादर करण्यात आला आहे. यात स्पष्टपणे म्हटले आहे की, हिंसाचाराच्या घटना पूर्वनियोजित होत्या. हे एक योजनाबद्ध षड्यंत्र होते. हिंसाचारानंतर अनेकांनी त्यांची घरे सोडून आसाम, झारखंड आणि ओडिशा येथे आश्रय घेतला. गृहमंत्रालय या अहवालाचा अभ्यास करून त्यात करण्यात आलेल्या शिफारसी लागू करण्याचा प्रयत्न करील.