कोरोना विषयक नियमांचा भंग करून राष्ट्रवादीच्या आमदारांचा वाढदिवस साजरा !
सामाजिक सुरक्षित अंतराचा फज्जा !
लोकप्रतिनिधींची मजा आणि सामान्यांना सजा असेच समीकरण बहुदा सगळीकडे पहायला मिळते. कायदा सर्वांनाच समान असणे आवश्यक !
नगर – येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी राज्य सरकारने घालून दिलेल्या कोरोना विषयक नियमांचे उल्लंघन करत वाढदिवस साजरा केला. त्यामुळे जगताप यांच्यावर कारवाई करून त्यांची आमदारकी रहित करावी, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते संदीप भांबरकर यांनी राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांकडे केली असल्याचे त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले.
कोविड नियम मोडून वाढदिवस; राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप गोत्यात#COVID19 #MaharashtraLockdown #coronainmaharashtra #ahmednagar #SangramJagtaphttps://t.co/nqPr4RrFmX
— Maharashtra Times (@mataonline) June 26, 2021
मे मासामध्ये आमदार जगताप आणि महापालिका आयुक्त यांनी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शहरातील नागरिकांवर एक मासाचे कडक निर्बंध लादले होते; मात्र स्वतःचा वाढदिवस साजरा करतांना नियमांकडे दुर्लक्ष झाल्याने सामान्यांसाठी नियम आणि लोकप्रतिनिधींना सूट, असा चुकीचा संदेश समाजामध्ये पसरला जाऊ शकेल. त्यामुळे लोकप्रतिनिधींनाही नियमांची जाणीव करून द्यायला हवी, अशी मागणी भांबरकर यांनी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास न्यायालयात जाऊ, अशी चेतावणीही त्यांनी दिली. भांबरकर यांनी माहितीचा अधिकार वापरून विविध अधिकारी आणि व्यक्ती यांच्याविरुद्ध अनेक तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे ‘माझे काही बरेवाईट झाल्यास ज्यांच्याविरुद्ध तक्रारी केल्या आहेत त्यांना उत्तरदायी धरावे’, असे शपथपत्रही त्यांनी करून ठेवले आहे.