अयोध्येतील श्रीराममंदिर भूमी संपादनात घोटाळा नाहीच ! – डॉ. विश्वंभरनाथ अरोरा, वरिष्ठ पत्रकार, ‘टाइम्स’ समूह
हिंदूसंघटन आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी हिंदु जनजागृती समिती
‘चर्चा हिंदु राष्ट्र की’ या ‘ऑनलाईन’ परिसंवादांतर्गत ‘श्रीराममंदिराच्या दुष्प्रचाराचे षड्यंत्र’ या विषयावर विशेष ‘ऑनलाईन’ चर्चासत्र
पुणे – अयोध्येत आयताकृती श्रीराममंदिराची उभारणी करण्यात अडचण येत असल्याने जवळपासची भूमी खरेदी करण्यात आली. ही भूमी २ कोटी रुपयांची असून ती १८ कोटी ५० लाख रुपयांना खरेदी केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या भूमीचे मूल्य वर्ष २०११ मध्ये २ कोटी रुपये होते आणि प्रतिवर्षी ती रक्कम वाढत गेली. वर्ष २०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय श्रीराममंदिराच्या बाजूने लागल्यावर तेथील सर्व भूमींचे दर दुप्पट झाले. सरकारने ती भूमी बाजारभावाने खरेदी केली असती, तर सरकारला ३४ कोटी रुपये द्यावे लागले असते; मात्र रामजन्मभूमी ट्रस्टने केलेल्या विनंतीवरून ती रक्कम न्यून करून १८ कोटी ५० लाख रुपये करण्यात आली. त्यामुळे या भूमी खरेदीमध्ये कोणताही घोटाळा झालेला नाही, असे स्पष्ट प्रतिपादन ‘टाइम्स’ समूहाचे वरिष्ठ पत्रकार डॉ. विश्वंभरनाथ अरोरा यांनी केले. ते हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘श्रीराममंदिराच्या दुष्प्रचाराचे षड्यंत्र’ या विषयावरील ‘ऑनलाईन’ विशेष चर्चासत्रात बोलत होते. या कार्यक्रमात विश्व हिंदु परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. विनोद बन्सल, सांस्कृतिक गौरव संस्थानचे केंद्रीय कार्यालय प्रमुख श्री. संजीव पुंडिर आणि हिंदु जनजागृती समितीचे देहली राज्य समन्वयक श्री. कार्तिक साळुंके यांनी त्यांचे विचार मांडले. समितीचे श्री. नरेंद्र सुर्वे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. हा ‘ऑनलाईन’ कार्यक्रम यू ट्यूब आणि ट्विटर या माध्यमांतून ३ सहस्र ७०५ जिज्ञासू धर्मप्रेमींनी पाहिला.
देशाला अपकीर्त करण्यासाठी राष्ट्रविरोधी टोळी विदेशी शक्तींचा उपयोग करत आहे ! – विनोद बन्सल, राष्ट्रीय प्रवक्ते, विश्व हिंदु परिषद
डॉ. विश्वंभरनाथ अरोरा यांनी मांडलेले वास्तव स्थानिक जनतेला पूर्णत: ज्ञात आहे. त्यामुळेच भूमी खरेदी घोटाळ्याचा आरोप ३ दिवसांत फोल ठरला. जर आरोप खरे असते, तर आरोप करणारे सर्वोच्च न्यायालयात का गेले नाहीत ? या प्रकरणी त्यांनी तक्रार का केली नाही ? मुळात श्रीरामाला काल्पनिक ठरवणारे लोकच श्रीराममंदिराच्या उभारणीला विकृत मानसिकतेतून विरोध करत आहेत. या माध्यमातून राष्ट्रविरोधी ‘टूल किट’ आता उघड होत आहे. त्यामुळे केवळ श्रीराममंदिर किंवा श्रीरामजन्मभूमी यांचा हा प्रश्न नसून देशाच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे. ६० कोटी भारतियांनी ज्यासाठी ३ सहस्र ५०० कोटी रुपयांची देणगी दिली, ते श्रीराममंदिर श्रीरामाच्या कृपेने होणारच आहे. सध्या राष्ट्रविरोधी टोळी सक्रीय असून ती देशाला अपकीर्त करण्यासाठी विदेशी शक्तींचा वापर करत आहे. बहुसंख्य हिंदू असलेल्या देशात ‘श्रीरामाचे अस्तित्व होते’, हे पटवून देण्यासाठी, तसेच त्याच्या जन्मभूमीच्या मुक्तीसाठी संघर्ष करावा लागला, यातूनच हे अपकीर्ती करण्याचे षड्यंत्र असल्याचे लक्षात येते.
भारतीय बनावटीचे ‘सामाजिक प्रसारमाध्यम’ सिद्ध करून हिंदु धर्माचा प्रचार करायला हवा ! – संजीव पुंडिर, केंद्रीय कार्यालय प्रमुख, सांस्कृतिक गौरव संस्थान, उत्तरप्रदेश
१. सध्या सामाजिक माध्यमांद्वारे हिंदु धर्म आणि श्रीराममंदिर यांच्याविषयी दुष्प्रचार करण्यात येत आहे. हा दुष्प्रचार थांबवण्यासाठी संपूर्ण भारतीय बनावटीचे सामाजिक माध्यम ‘प्लॅटफॉर्म’ (व्यासपीठ) म्हणून सिद्ध करायला हवा. याद्वारे भारतीय धर्म आणि संस्कृती यांचा प्रचार करायला हवा.
२. पुढील वर्षी उत्तरप्रदेशात विधानसभेच्या निवडणुका आहेत. अशा वेळी ज्या ‘आम आदमी पक्षा’चे उत्तरप्रदेशात अस्तित्व नाही, त्या पक्षाच्या खासदाराने श्रीरामजन्मभूमी खरेदीच्या व्यवहारात घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. रामजन्मभूमी ट्रस्टचे आदरणीय चंपत राय यांच्यावर खोटे आरोप करणार्यांना कधीही क्षमा करता येणार नाही. त्याविरोधात न्यायालयात मानहानीचा खटला चालवायला हवा.
३. हिंदु समाजाचे खच्चीकरण करण्याचा काहींचा भ्रामक प्रयत्न आहे; मात्र हिंदू आता जागृत होत असून त्यांचे मनोबल कमी होणार नाही.
घोटाळ्याचा आरोप हे केवळ निमित्त असून त्याद्वारे मंदिर उभारणीचे कार्य थांबवणे, हाच समाजकंटकांचा उद्देश ! – कार्तिक साळुंके, देहली राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती
१. न्यायालयाचा निर्णय हिंदूंच्या बाजूने लागल्यानंतर मंदिर उभारणीचे कार्य चांगल्या प्रकारे चालले होते; मात्र त्यात बाधा आणण्याचा काही समाजकंटकांचा अजेंडा (धोरण) आहे. हा हिंदुविरोधी प्रचाराचा एक भाग आहे. घोटाळ्याचा आरोप हे केवळ निमित्त असून मंदिर उभारणीचे कार्य थांबवणे हाच समाजकंटकांचा उद्देश आहे.
२. मंदिर उभारणीचे कार्य अडकवणारे आणि जनतेला भरकटवणारे यांची एक टोळीच सध्या कार्यरत आहे. ज्यांनी आयुष्यभर श्रीराममंदिराच्या उभारणीला विरोध करत अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण केले, अशांना श्रीराममंदिराविषयी आरोप करण्याचा काय अधिकार ?
३. अयोध्येतील तपस्वी छावणीचे परमहंसदास महाराज यांना श्रीराममंदिर उभारणीच्या कार्यावर आरोप आणि विरोध करण्यासाठी १०० कोटी रुपये देऊ केल्याचे म्हटले आहे. याची सखोल चौकशी व्हायला हवी.
४. देश स्वतंत्र झाल्यानंतर ‘देशातील बहुसंख्य हिंदूंना न्याय मिळेल आणि मंदिरे सुरक्षित राहून नवीन मंदिरे उभारली जातील’, असा विश्वास हिंदूंना वाटत होता; मात्र एका मंदिराच्या उभारणीसाठी ७० ते ८० वर्षे लागत आहेत, हे दुर्दैवी आहे. हा प्रयत्न म्हणजे अल्पसंख्यांकांच्या तुष्टीकरणासाठीचाच एक भाग आहे, असे वाटल्यास चुकीचे ते काय ?
५. केवळ हिंदूंनाच नाही, तर हिंदु देवतांना अपकीर्त करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. त्यामुळे श्रीराममंदिरासह उद्ध्वस्त केलेल्या ३ सहस्र ५०० मंदिरांच्या पुनर्उभारणीसाठी संघटित होण्याविना पर्याय नाही.
टूलकीट म्हणजे काय ?टूलकीट शेतकरी आंदोलनासाठी समर्थकांची संख्या कशा प्रकारे वाढवता येईल ? या मार्गदर्शक तत्त्वांची सूची आहे. आंदोलन करत असतांना काही अडचण आल्यास कुणाशी संपर्क करावा ? आंदोलनात काय करावे आणि काय करू नये ? या सर्व गोष्टी त्यात समजावून सांगण्यात आल्या आहेत. |
कार्यक्रमात सहभागी झालेल्या जिज्ञासूंच्या निवडक प्रतिक्रिया
१. देवराज राका – श्रीराममंदिर उभारणीच्या कार्यात विघ्न आणणार्यांवर कायदेशीर कारवाई व्हायला हवी. हिंदु समाजाने एकत्र येऊन षड्यंत्राविरुद्ध आवाज उठवायला हवा.
२. सुफला देसाई – हिंदुस्थानात राहून हिंदूंवर आघात करणार्यांना कठोर शिक्षा व्हायला हवी.
३. जयंती चोप्रा – सर्व हिंदूंनी संकल्प केला, तर श्रीराममंदिराची उभारणी निर्विघ्नपणे होईल.