सदैव आनंदी आणि उत्साही राहून तळमळीने सेवा करणार्या पुणे येथील सनातनच्या १०८ व्या संत पू. (सौ.) सरिता पाळंदे (वय ७६ वर्षे) !
‘पुणे येथील पू. (सौ.) सरिता पाळंदे (वय ७६ वर्षे) यांनी ३१.५.२०२१ या दिवशी देहत्याग केला. त्यांना देहत्यागानंतरच्या तेराव्या दिवशी (१२.६.२०२१ या दिवशी) संत म्हणून घोषित केले. ३०.६.२०२१ या दिवशी त्यांचे मासिक श्राद्ध आहे. त्या निमित्त त्यांच्या समवेत सेवा करतांना सातारा मार्ग, पुणे येथील साधकांना शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.
१. सौ. अर्चना चांदोरकर
१ अ. आनंदी आणि उत्साही : पू. (सौ.) पाळंदेकाकू नेहमी उत्साही आणि आनंदी असत. मी त्यांना कधीही थकलेले पाहिले नाही. परिस्थिती कोणतीही असो, त्यांच्या तोंडवळ्यावरील आनंद आणि उत्साह अल्प होत नसे.
१ आ. त्या प्रत्येक साधकाशी अतिशय प्रेमाने आणि आपलेपणाने बोलत असत.
१ इ. गुरुसेवेची तळमळ : वर्ष २०१२ आणि २०१३ मध्ये गुरुपौर्णिमेच्या वेळी मी अन् पू. काकू एकत्र प्रसार करत होतो. त्या वेळी संपर्क करतांना पू. काकूंच्या मनात ‘समाजातील लोकांना सनातन संस्थेची माहिती कशी सांगावी ? समाजात कसे बोलावे ?’, असे कोणतेच विचार नसायचे. त्यांना समाजात अर्पणाविषयी सांगतांना संकोच वाटत नसे. त्या अतिशय उत्साहाने आणि आनंदाने प्रत्येकाच्या घरी जाऊन गुरुकार्य अन् अर्पणाचे महत्त्व सांगायच्या आणि अर्पण घ्यायच्या. त्यांच्यातील सकारात्मकता या गुणामुळे समोरच्या व्यक्तीकडूनही त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळायचा.
१ ई. अनुभूती
१ ई १. पू. काकूंच्या छायाचित्राशी संबंधित सेवा करतांना नामजप आपोआप चालू होऊन त्या संत होणार असल्याची पूर्वसूचना मिळणे : पू. काकूंच्या देहत्यागानंतर त्यांच्या लेखासह त्यांचे छायाचित्र पाठवायचे होते. ९.६.२०२१ या दिवशी मला त्यांच्या छायाचित्राशी संबंधित सेवा मिळाली होती. ती सेवा चालू केल्यावर माझा नामजप आपोआप चालू झाला. माझे मन निर्विचार होऊन मला आतून आनंद जाणवू लागला. ‘उद्या पाळंदेकाकू संतपदी विराजमान झाल्याची आनंदवार्ता मिळेल’, असे जाणवून मी दुसर्या दिवशीच्या दैनिक ‘सनातन प्रभात’ची आतुरतेने वाट पाहू लागले.
पू. पाळंदेकाकू संतपदी विराजमान झाल्याचे कळल्यावर ‘देवाने मला त्यांचा सहवास दिला’, यासाठी कृतज्ञता वाटली. तसेच त्यांच्याकडून शिकायला मिळालेले त्यांचे गुण आठवून मला पुढील कविता सुचली. ती गुरुचरणी अर्पण करते.
२. कु. रेणू गोपलानी
२ अ. उत्साही आणि प्रसन्न असणे : ‘दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये पू. पाळंदेकाकूंनी देहत्याग केल्याचे वाचल्यावर मला त्यांची पुष्कळ आठवण आली. त्या कधीही भेटल्या, तरी उत्साही आणि प्रसन्न असायच्या. त्यांचा उत्साह पाहून ‘त्यांच्या उत्साहात आपणही सहभागी व्हावे’, असे मला वाटायचे.
२ आ. सकारात्मक विचार आणि अडचणींमधून शिकणे : पू. पाळंदेकाकू नेहमी सकारात्मक आणि उपायात्मक विचार करत असत. सेवेत कधीही कोणतीही अडचण आली, तरी त्यांच्याकडून प्रतिक्रिया व्यक्त होत नसे. त्या वेळी ‘अडचणीतून आपल्याला काय शिकता येईल ?’, असा त्यांचा भाव असायचा.
२ इ. कुटुंबियांशीही प्रेमाने वागणे : पू. काकूंच्या नातवाने (श्री. प्रथमेश पाळंदे याने) काकूंविषयी लिहिलेले लिखाण वाचून मला ‘त्या लिखाणातील प्रत्येक शब्द, प्रत्येक वाक्य अंतर्मनात कोरले जात आहे’, असे वाटले. तेव्हा ‘पू. काकू त्यांच्या कुटुंबियांशीही प्रेमाने वागत असतील’, हे लक्षात आले. ते लिखाण वाचून माझी भावजागृती झाली. पू. काकूंकडून शिकण्याची संधी मिळाली, त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करते.’
३. सौ. नेहा आणि निरंजन दाते (१५.६.२०२१)
अ. त्या नियमित दुपारी ४ वाजता सेवेला बाहेर पडत असत. त्या सेवा आणि घरातील कामे यांच्या वेळेचे नियोजन करत असत. त्या सात्त्विक वस्तूंच्या प्रदर्शनासाठी लागणार्या लहान लहान वस्तूंची सूची लिहून काढत असत. ‘सात्त्विक वस्तूंचे प्रदर्शन आदर्शच लागले पाहिजे’, अशी त्यांची तळमळ असे.
आ. पू. काकूंकडे सनातनच्या सात्त्विक उत्पादनांचा साठा असायचा. त्यांच्याकडे कुणीही आणि कधीही भ्रमणभाष करून सात्त्विक उत्पादने मागितली, तरी त्या आनंदाने काढून देत असत.
इ. पू. काकू दुपारच्या वेळात दैनिक ‘सनातन प्रभात’मधील कात्रणे कापून वहीमध्ये चिकटवून ठेवत आणि ती वेळ मिळेल, तेव्हा वाचत असत.
ई. त्या कोणताही कठीण प्रसंग शांतपणे स्वीकारत असत.
‘पू. पाळंदेकाकूंकडून शिकण्याची संधी मिळाली, यासाठी गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता !’
उत्साह आणि आनंद यांचा धबधबा म्हणजे पू. काकू ।पू. पाळंदेकाकूंनी अपार कष्ट केले । गुरुकार्य प्रत्येकापर्यंत पोचवण्या । उत्साह आणि आनंद यांचा धबधबा म्हणजे पू. काकू । हे सर्व गुण प्रत्यक्ष शिकण्यासाठी । – सौ. अर्चना चांदोरकर |
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |