‘देवावर अढळ श्रद्धा असेल, तर तो भक्ताच्या हाकेला धावून येतो’, याची अनुभूती घेणार्या पू. (सौ.) केवळबाई पाटीलआजी (वय ७९ वर्षे)!
‘देवावर अढळ श्रद्धा असेल, तर तो भक्ताच्या हाकेला धावून येतो’, याची अनुभूती घेणार्या जळगाव येथील सनातनच्या ६८ व्या संत पू. (सौ.) केवळबाई पाटीलआजी (वय ७९ वर्षे)!
२३ जुलै २०२१ या दिवशी आषाढ पौर्णिमा अर्थात् गुरुपौर्णिमा आहे. गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करणार्या या दिवशी गुरुतत्त्व सहस्र पटीने कार्यरत असते. या गुरुपौर्णिमेचा साधकांना अधिकाधिक लाभ व्हावा, या दृष्टीने गुरुकृपायोगाच्या माध्यमातून जलद आध्यात्मिक उन्नती करून संतपद गाठलेल्या संतांविषयी लिखाण प्रकाशित करत आहोत.
२९ जून २०२१ या दिवशी आपण सनातनच्या ६८ व्या संत पू. (सौ.) केवळबाई पाटीलआजी यांचा साधनाप्रवास आणि त्यांची गुणवैशिष्ट्ये पाहिली. आज आपण महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. प्रियांका लोटलीकर यांनी पू. (सौ.) पाटीलआजी यांची घेतलेली मुलाखत पाहूया.
(भाग २)
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/490717.html |
‘सनातन प्रभात’ नियतकालिकांमध्ये सनातन आणि एस्.एस्.आर्.एफ्. यांच्या संतांच्या संदर्भात येत असलेल्या लेखांमुळे ‘पुढे मी नसेन, तेव्हा साधकांना मार्गदर्शन कोण करणार ?’, ही माझी काळजी पूर्णपणे दूर होऊन मी निश्चिंत झालो !‘सनातन प्रभात’ नियतकालिकांमध्ये सनातन आणि एस्.एस्.आर्.एफ्.च्या अनेक संतांच्या संदर्भात साधकांनी लिहिलेले लेख काही वर्षे प्रसिद्ध होत आहेत. त्यांत संत आणि साधक यांनी लिहिलेली संतांची गुणवैशिष्ट्ये, शिकवण, त्यांच्याविषयी साधकांना आलेल्या अनुभूती इत्यादी विषय वाचून ‘पुढे मी नसेन तेव्हा साधकांना मार्गदर्शन कोण करणार ?’, ही माझी काळजी पूर्णपणे दूर झाली आहे. उलट मला वाटले, ‘मी प्रकृती अस्वास्थ्यामुळे कुठेच जाऊन साधकांना भेटू शकत नाही. याउलट सनातनचे संत साधकांना नियमितपणे भेटतात. या भेटींमुळे साधकांची प्रगती जलद होत आहे, तसेच संस्थेचे कार्यही झपाट्याने वाढत आहे.’ यामुळे मला आनंद झाला ! या आपत्काळातही सनातनच्या साधकांना संतांच्या अमूल्य मार्गदर्शनामुळे साधनेत लाभ होत आहे. सनातनची शिकवण अशीच पुढे वृद्धींगत होऊन साधक साधनेत पुढे पुढे जाणार आहेत आणि हिंदु राष्ट्राची धुरा सांभाळणार आहेत. त्यामुळे मला काळजी वाटत नाही. यासाठी मी माझे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांच्या आणि देवाच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
पू. (सौ.) केवळबाई पाटीलआजी यांचा परिचयपू. (सौ.) केवळबाई पाटीलआजी यांनी साधनेला आरंभ केल्यानंतर त्यांच्या गावात पारतखेडा (जिल्हा जळगाव) येथे त्यांनी सनातनच्या सत्संगाचा प्रसार केला. तसेच त्यांनी साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ आणि सनातनची सात्त्विक उत्पादने यांचेही वितरण केले. जळगाव सेवाकेंद्रात जाऊन त्या सेवाही करायच्या. आता त्या समष्टीसाठी नामजप करतात. |
‘देव भक्ताच्या हाकेला धावून येतो’, याची अनेक उदाहरणे आपण पाहिली आहेत. त्याविषयीच्या कथाही आपण ऐकल्या आहेत. संत सखूबाई, संत जनाबाई, संत गोरा कुंभार अशी अनेक उदाहरणे पूर्वी होऊन गेली आणि आजही पहायला मिळतात. त्यांतील एक उदाहरण म्हणजे जळगाव येथील सनातनच्या ६८ व्या संत पू. (सौ.) केवळबाई पाटीलआजी ! ‘देवावर दृढ श्रद्धा असेल, तर देव भक्ताचे बोल खरे करतोच’, याची अनुभूती पू. आजींच्या संदर्भात त्यांच्या गावातल्या लोकांना आली.
१५.५.२०१८ या दिवशी पू. (सौ.) पाटीलआजी त्यांच्या कुटुंबियांच्या समवेत रामनाथी आश्रमात आल्या होत्या. त्यांच्या समवेत पू. आजींचे यजमान श्री. जामराव पाटील, मुलगा श्री. वसंत पाटील, सून सौ. वनिता पाटील आणि नातू कु. जयेश पाटील आले होते. त्या वेळी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. प्रियांका लोटलीकर यांनी पू. (सौ.) पाटीलआजींची मुलाखत घेतली. तेव्हा त्यांच्याशी झालेल्या संवादातून पू. आजींची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर असलेली अपार श्रद्धा जाणवते.
पू. आजींची परात्पर गुरु डॉक्टर आणि श्रीकृष्ण यांच्यावर दृढ श्रद्धा असल्यामुळे गावातल्या लोकांना त्यांच्याविषयी पुष्कळ चांगल्या अनुभूती आल्या. ‘पू. (सौ.) पाटीलआजींच्या श्रद्धेमुळे देव कसा धावून आला ?’, हे आपण या लेखातून पाहूया.
१. पू. आजींनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्याने गावातील लोकांना आलेल्या अनुभूती
१ अ. गरीब परिस्थितीमुळे शस्त्रकर्म करू न शकणार्या महिलेला पू. (सौ.) पाटीलआजींनी नामजपादी उपाय करायला सांगणे आणि ते केल्यावर एका मासात तिला बरे वाटणे
कु. प्रियांका लोटलीकर : पू. आजी, तुम्हाला काही अनुभूती सांगायच्या आहेत का ?
पू. (सौ.) पाटीलआजी : एक गरीब महिला होती. ती रुग्णालयात गेल्यावर तिच्याकडे पैसे नसल्याने आधुनिक वैद्यांनी ‘तुमची शस्त्रक्रिया होऊ शकणार नाही’, असे सांगून तिला परत पाठवले. ती घरी आल्यावर रडायला लागली. तेव्हा तेथील एका दुकानातील बाईने तिला सांगितले, ‘‘तू पाटीलआजींकडे जा. त्यांच्याकडे देवाचे काहीतरी औषध आहे. ते घेतल्याने तुला पालट जाणवेल.’’ मग ती महिला मला भेटायला आली आणि तिने मला विचारले, ‘‘आमच्याजवळ पैसे नाहीत. मग काय करायचे ?’’ त्यावर मी तिला म्हणाले, ‘‘नामजप करशील का ? मी माझ्या गुरूंचे औषध देते. ते घेऊन जा. त्याबरोबर इतर वैद्यकीय उपायही कर.’’ मी तिला गोमूत्रात विभूती घालून दिली आणि दत्त अन् कुलदेवता यांचा नामजप करायला सांगितला. ‘तुला पालट जाणवला, तर माझ्याकडे येऊन हे औषध घेऊन जा’, असे सांगितले. तिने ते औषध (विभूती) लावली आणि मला म्हणाली, ‘‘मला आताच ते औषध द्या. मी घेऊन जाते. इतक्यातच मला बरे वाटले.’’ मग ती माझ्याकडून उदबत्तीचा पुडा, गोमूत्र आणि कापराची डबी घेऊन गेली. मी तिला सांगितले, ‘‘देवासमोर बसून उदबत्ती लाव.’’ त्यानंतर तिला हा उपाय करायची ओढ लागली आणि ती एका मासात बरी झाली.
१ अ १. बरी झालेली महिला आणि तिचे यजमान यांनी पू. आजींना भेटणे आणि महिलेच्या यजमानांनी ‘तुम्ही माझ्या बायकोला जीवदान दिले’, असे पू. आजींना म्हटल्यावर पू. आजींनी कर्तेपणा गुरुचरणी अर्पण करणे : त्यानंतर ती आणि तिचे यजमान मला भेटायला आले. तिचे यजमान मला म्हणाले, ‘‘तुम्ही माझ्या बायकोला जीवदान दिले.’’ ते मला नमस्कार करायला लागले. मी त्यांना म्हणाले, ‘‘मला नमस्कार करू नका. मी काय केले ? (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र दाखवून) यांनीच केले. यांना नमस्कार करा. हे डॉक्टर आहेत. त्यांनी हे औषध दिले. ते मी तुम्हाला दिले. मी काहीच केले नाही. माझ्या डॉक्टरांच्या औषधाने तुम्हाला पालट जाणवला आणि तुम्ही जिवंत राहिलात. मी नव्हे, तर त्यांनीच तुम्हाला जीवदान दिले.’’
कु. प्रियांका लोटलीकर : पू. आजी, तुमच्या श्रद्धेमुळे झाले ना !
पू. (सौ.) पाटीलआजी : परात्पर गुरु डॉक्टरांनी मला सुचवले.
१ आ. त्वचेला खाज येणार्या लोकांनी पू. आजींनी सांगितल्याप्रमाणे सनातनचा तुलसी आणि नीम साबण वापरल्यावर त्यांना पालट जाणवणे
पू. (सौ.) पाटीलआजी : गावातील पुष्कळ जणांच्या त्वचेला खाज यायची. मी त्यांना सनातनचा तुलसी आणि नीम साबण वापरून पहाण्यास सांगितले. तेव्हा त्यांना पुष्कळ पालट जाणवला. मग ते माझ्याकडे यायचे आणि २ – ३ साबण घेऊन जायचे. त्यांना वाटायचे, ‘आपण रुग्णालयात पैसे घालवले. त्यापेक्षा आता आजींकडून साबण घेऊया.’ त्यामुळे साबण कधी शिल्लक रहात नसत.
श्री. वसंत पाटील (पू. (सौ.) पाटीलआजींचा मुलगा) : ‘पू. आजींकडे गेल्यावर सात्त्विक उत्पादने मिळतात’, असे गावातील सर्व लोकांना समजले. पू. आजी प.पू. गुरुदेवांना भावपूर्ण प्रार्थना करूनच सात्त्विक उत्पादने देतात. त्यांच्या भावामुळे देवाला सगळे करावे लागते. त्यामुळे गावात मोठ्या प्रमाणात सनातनचा प्रसार होऊ लागला.
कु. प्रियांका लोटलीकर : एरव्ही साधकांना घरोघरी जाऊन प्रसार करावा लागतो; पण इथे सगळे जण स्वतःहूनच पू. आजींकडे उत्पादने घ्यायला येतात.
१ इ. एका गावकर्याच्या शेतात आलेला नाग त्यांना शेतात येऊ देत नसणे आणि पू. (सौ.) आजींनी सांगितलेले उपाय केल्यावर तो शेतातून निघून जाणे
पू. (सौ.) पाटीलआजी : एकदा एका गावकर्याच्या शेतात एक मोठा नाग आला होता. तो त्यांना शेतात येऊ देत नसे. त्यावर उपाय म्हणून त्यांनी ‘नारायण नागबळी’ हा विधी केला. त्यांना एका ज्योतिषाने सांगितले, ‘‘जेव्हा तुमच्या घरातून एक जीव (एकाचा प्राण) जाईल, तेव्हाच तो नाग तुमच्या शेतातून जाईल.’’
कु. प्रियांका लोटलीकर : म्हणजे त्यांच्या घरातील कुणीतरी वारल्यानंतरच तो शेतातून जाईल !
पू. (सौ.) पाटीलआजी : त्यांनी एक दिवस १० ते १२ जणांना बोलावले आणि नागाला मारायला सांगितले; पण ते लोक त्यांना म्हणाले, ‘‘आम्ही कशाला मारू ? आम्ही मारणार नाही आणि याला कोण मारेल ? हा तर एवढे वेटोळे करून बसला आहे. तो कुणाला जिवंत ठेवील का ?’’ त्याला कुणीही हात लावला नाही. मग ते आमच्याकडे आले. आमच्या घरी येऊन बसल्यावर त्यांना पुष्कळ रडू आले. ते म्हणाले, ‘‘तो नाग माझ्या म्हशीला चावला. ती मेली. माझी ५० ते ६० सहस्र रुपयांची हानी झाली. आता काय करायचे ? तो माझ्या घरातील एक जीव घेणार.’’ मी म्हणाले, ‘‘काही जीव घेणार नाही. तुम्ही बसा.’’ मी त्यांना सरबत करून दिले आणि नंतर माझ्याकडील शिवाची ३ पदके त्यांना दिली आणि ती गळ्यात घालायला सांगितली. आपल्या गुरुदेवांचे औषध म्हणून विभूती दिली आणि सांगितले, ‘‘तुम्ही शिवाचा नामजप करत ही विभूती सगळ्या शेतात टाका.’’ त्यावर ते म्हणाले, ‘‘तो नाग आम्हाला शेतात येऊ देत नाही.’’ मी म्हणाले, ‘‘तुम्ही ही पदके गळ्यात घाला आणि शेतात जा. तुम्हाला तो नाग दिसतो का, ते पहा.’’ दुसर्या दिवशी त्यांनी ‘ॐ नमः शिवाय ।’ हा नामजप करत शेतात विभूती फुंकरली. त्या दिवसापासून त्यांना तो नाग दिसला नाही. त्यानंतर दुसर्या दिवशी ते आनंदाने आमच्या घरी आले आणि म्हणाले, ‘‘मी आधीच तुमच्याकडे आलो असतो, तर माझी हानी झाली नसती.’’ प.पू. गुरुदेव किती महान आहेत ना !
१ ई. साधकांना त्रास झाल्यास पू. आजींनी श्री गुरूंचे औषध म्हणून त्यांना विभूती देणे आणि साधकांना त्या संदर्भात अनुभूती येणे
कु. प्रियांका लोटलीकर : पू. आजींच्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील अपार श्रद्धेमुळे सनातनच्या कुठल्याही उत्पादनाच्या संदर्भात, म्हणजे उदबत्ती, पदक किंवा साबण यांच्या संदर्भात इतरांना अनुभूती येते.
श्री. वसंत पाटील (पू. आजींचा मुलगा) : हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या किंवा प्रसाराच्या वेळी जळगाव सेवाकेंद्रात साधकांना थोडा त्रास जाणवायला लागला की, पू. आजी श्री गुरूंचे औषध म्हणून साधकांना विभूती द्यायच्या. बर्याच साधकांना त्या संदर्भात अनुभूती आली. पू. आजी प्रत्येक वेळी श्रद्धापूर्वक विभूती द्यायच्या आणि कर्तेपण स्वतःकडे घ्यायच्या नाहीत. ‘श्री गुरूंनीच सगळे केले’, असा त्यांचा भाव असायचा.
१ उ. गावातील मुलीला प्राणी चावल्याने आधुनिक वैद्यांनी ‘ती जगणार नाही’, असे सांगणे, पू. आजींनी सांगितलेले उपाय केल्यावर एका मासाने ती मुलगी पूर्णपणे बरी होणे आणि त्यामुळे गावातील लोक पू. आजींना ‘सनातनच्या डॉक्टर’ म्हणू लागणे
कु. जयेश पाटील (पू. आजींचा नातू) : आमच्या घराजवळ एक मुलगी होती. खेळतांना तिला कोणतातरी प्राणी चावला. घरातील लोक तिला आधुनिक वैद्यांकडे घेऊन गेले; पण त्यांनी स्पष्ट सांगितले, ‘‘आता काही उपयोग नाही. मुलगी असेपर्यंत तिचा सांभाळ करा. ती जगणार नाही.’’ त्या मुलीची आई पुष्कळ रडायला लागली. ती पू. आजींकडे आली. पू. आजींनी त्यांना सांगितले, ‘‘तुम्ही काळजी करू नका.’’ पू. आजींनी विभूती, गोमूत्र आणि कापूर एकत्र करून त्यांचा लेप त्या मुलीला जेथे प्राणी लावला होता, तेथे लावला. त्यानंतर पू. आजींनी त्यांना सांगितले, ‘‘मुलगी लहान आहे. तिच्या डोक्यावर हात ठेवून ‘श्री गुरुदेव दत्त ।’ आणि तुमची कुलदेवता यांचा नामजप करा.’’ असे केल्यावर एका मासाने त्या मुलीची जखम पूर्णपणे बरी झाली. तेव्हा आधुनिक वैद्यांनाही आश्चर्य वाटले. ते म्हणाले, ‘‘हे कसे शक्य झाले ?’’ पू. आजींच्या या औषधामुळे गावात सगळे त्यांना ‘सनातनच्या डॉक्टर’ म्हणायला लागले.
१ ऊ. मुलगा लहान असतांना त्याला ताप आल्यावर पू. आजींनी श्रीकृष्णाला प्रार्थना करून चुलीतली राख लावल्यावर मुलाला बरे वाटणे
श्री. वसंत पाटील (पू. आजींचा मुलगा) : मला अजूनही आठवते, ‘मी लहान असतांना मला ताप आला की, पू. आजी चुलीतली चिमूटभर राख घ्यायच्या आणि ती हातात घेऊन देवाशी काहीतरी बोलायच्या. त्यानंतर मला ती लावून झोपायला सांगायच्या. त्यानंतर तापही उतरायचा आणि मला बरे वाटायचे.’
कु. प्रियांका लोटलीकर : पू. आजी, त्या वेळी राख हातात घेऊन तुम्ही काय बोलायचात ?
पू. (सौ.) पाटीलआजी : मी कृष्णाला हाक मारून सांगायचे, ‘कृष्णा, तू आहेस. मी तुझेेच औषध लावते’ आणि मी चुलीतली राख मुलाला लावायला सांगायचे. मी आधीपासून असाच भाव ठेवायचे.’
(जुलै २०१८)
(क्रमशः)
पू. आजींची सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता‘माझी परीक्षा चालू असतांना ‘पू. आजींशी बोलायला हवे’, असे मला वाटायचे आणि त्याच क्षणी पू. आजी भ्रमणभाष करून मला विचारायच्या, ‘‘तुझा अभ्यास कसा चालू आहे ? पेपर कसे गेले ?’’ तेव्हा मला आश्चर्य वाटायचेे, ‘मी तर आता भ्रमणभाष करणार होतो; पण पू. आजींचाच भ्रमणभाष कसा काय आला ?’ त्या संत होण्यापूर्वी ३ – ४ वेळा आणि संत झाल्यानंतर २ वेळा मला अशी अनुभूती आली आहे.’ – कु. जयेश पाटील (नातू), चाळीसगाव (जुलै २०१८) |
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/491212.html |
|