कोरोना प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्यांना गोव्यात कोणत्याही निर्बंधांशिवाय प्रवेश ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

पणजी, २८ जून (वार्ता.) – कोरोना लसीच्या दोन्ही मात्रा (डोस) घेतलेल्यांना गोव्यात कोणत्याही निर्बंधांशिवाय प्रवेश दिला जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी २८ जून या दिवशी केली.

मुख्यमंत्री डॉ. सावंत पुढे म्हणाले, ‘‘कोरोना प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्यांना गोव्यात प्रवेश दिला जाणार आहे. त्यांनी ‘कोरोना ‘निगेटिव्ह’ प्रमाणपत्र समवेत बाळगणे आवश्यक नाही.’’ शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ज्या व्यक्तीकडे प्रवासाच्या ७२ घंट्यांच्या आत केलेल्या कोरोना चाचणीचे कोरोना ‘निगेटिव्ह’ प्रमाणपत्र आहे, अशांनाच गोव्यात प्रवेश दिला जात होता. राज्यशासनाने आता राज्याच्या सीमांवर कोरोनाची चाचणी करण्यासाठी प्रयोगशाळा उभारल्या आहेत. रेल्वेप्रवाशांचीही कोरोना चाचणी करण्यासाठी रेल्वेस्थानकांवर खासगी प्रयोगशाळा उभारण्याचा शासनाचा विचार आहे.  गोव्यात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आला आहे.