अस्मानी जिहादी !
काश्मीरमधील जिहादी आतंकवाद्यांचा नायनाट केला जात आहे, असे सांगितले जाते. प्रतिवर्षी २०० आतंकवादी ठार केले जात आहेत. काही आतंकवाद्यांना अटकही करण्यात आली आहे. काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम ३७० रहितही करण्यात आले आहे. पाक सीमेवर भारत आणि पाक यांच्या झालेल्या संमतीनंतर शस्त्रसंधी लागू झालेली आहे. असे असले, तरी जिहादी आतंकवाद्यांच्या कारवाया थांबलेल्या नाहीत, ही वस्तूस्थिती आहे. उलट ते अधिक घातक होत चालले आहेत, हे जम्मू येथील भारतीय वायूदलाच्या तळावर ड्रोनद्वारे बॉम्बस्फोट घडवून आणल्याच्या घटनेवरून दिसून येत आहे. जिहादी आतंकवाद्यांमध्ये अद्याप जीव शेष आहे, हे ते वेळोवेळी दाखवून देत आहेत. ‘आम्ही संपलेलो नाही आणि तुम्ही आम्हाला संपवू शकत नाही’, हे ते अशा आक्रमणांद्वारे दाखवत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरमधील सर्व पक्षांच्या नेत्यांची नुकतीच बैठक आयोजित करून काश्मीरमधील विकास आणि निवडणुका यांविषयी चर्चा केली. चर्चा सकारात्मक झाल्याचे सर्व पक्षांच्या प्रतिनिधींनी सांगितले. या बैठकीमुळेच जिहादी आतंकवाद्यांचा निर्माता आणि काश्मीरच्या समस्येचा मुख्य सूत्रधार पाक बिथरल्याने त्याने आतंकवाद्यांना मोठी आक्रमणे करण्याचा आदेश दिला असणार, हे वायूदलाच्या तळावरील आक्रमणातून लक्षात येते. या आक्रमणासाठी वापरण्यात आलेले ड्रोन पाकच्या सैन्याला चीनने दिलेले होते. याचाच अर्थ जोपर्यंत पाकला कायमस्वरूपी धडा शिकवला जात नाही, तोपर्यंत काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट होणार नाही. जिहादी आतंकवाद हा एक भस्मासुर आहे. त्याचा जीव पाकमध्ये आहे. एकेक जिहादी आतंकवाद्यांना शोधून ठार केल्याने जिहादी आतंकवाद मुळासकट कधीच नष्ट होणार नाही.
आक्रमणे चालूच !
आता ड्रोन द्वारे केलेल्या आक्रमणामागील आतंकवाद्यांचा शोध घेतला जाईल. कदाचित् त्यांना चकमकीत ठारही केले जाईल; मात्र त्यांची जागा नवीन आतंकवादी घेतील आणि ते आणखी वेगळ्या पद्धतीने आक्रमण करतील. कालपर्यंत आतंकवादी भूमीवरून आक्रमण करत होते. आता ते आकाशमार्गे (अस्मानी) आक्रमण करू लागले आहेत, हे अधिक चिंताजनक आहे. याच्याशी कसा सामना करणार ? हा प्रश्न आहे. यापूर्वीही पाकने पंजाबमध्ये खलिस्तानी आतंकवाद्यांसाठी ड्रोनद्वारे शस्त्रे पाठवली होती. अमली पदार्थांचीही तस्करी ड्रोनद्वारे केली जात आहे. यावर नियंत्रण मिळवण्यास भारतीय सुरक्षादलांना यश आलेले नाही. भविष्यात अशी आक्रमणे होऊ लागली, तर काश्मीरमध्ये अपेक्षित शांतता कशी निर्माण होणार ? वायूदलाच्या तळावर झालेल्या आक्रमणाच्या दुसर्या दिवशी पुन्हा आतंकवाद्यांनी ड्रोनद्वारे आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न सतर्क सैनिकांनी उधळून लावला. जम्मूच्याच कालूचक येथील सैन्यतळावर रात्री दिसलेले ड्रोन सैनिकांनी त्यांच्यावर गोळीबार करून हाकलून लावले. यातून स्पष्ट होते की, आता जिहादी आतंकवादी थेट आक्रमण न करता अशा प्रकारे आक्रमण करणार आहेत. हे असतांनाच भूमीवरून आक्रमणे चालूच रहातील. हे आजच विशेष पोलीस अधिकारी अहमद यांच्या घरात घुसून त्यांना ठार करण्यात आल्याच्या घटनेवरून आतंकवाद्यांनी दाखवून दिले आहे. त्यामुळे आकाश आणि भूमी या दोन्ही मार्गांनी आघात होत आहेत. आता सैन्याला आतंकवाद्यांच्या विरोधातील कारवाईचा वेगळा विचार करावा लागणार आहे.
निवडणुकांतून काय साध्य होणार ?
गेल्या काही मासांमध्ये भाजपच्याच काही नेत्यांच्या हत्या आतंकवाद्यांनी केल्या आहेत. त्यावर भाजपच्या केंद्रशासनाने कठोर होऊन कारवाई करणे आवश्यक आहे, असेच हिंदूंना वाटते. कलम ३७० रहित करून २ वर्षे उलटल्यानंतरही काश्मीरमध्ये हिंदू जाऊ शकत नाहीत. ज्यांनी जाण्याचा प्रयत्न केला, त्यांना लक्ष्य करून ठार करण्यात आले आहे. ‘अशा स्थितीत काश्मीरमध्ये निवडणुका घेऊन काय साध्य होणार ?’, असा प्रश्न उपस्थित होतो. येथे निवडणुकीद्वारे पुन्हा पाकप्रेमी पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्स यांच्यासारखे पक्ष निवडून येऊन सत्तेवर बसले, तर ‘पुन्हा येरे माझ्या मागल्या’, अशीच स्थिती निर्माण होऊ शकते. जम्मू-काश्मीरचे विभाजन केल्याने येथील मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यावर जम्मूमध्ये अधिक मतदारसंघ निर्माण होतील, तर काश्मीरमधील अल्प होतील. त्यामुळे भाजपची सत्ता येऊ शकते आणि हिंदु मुख्यमंत्री होऊ शकतो, अशी शक्यता गृहीत धरून पाहिले, तरी आतंकवादाचे नियंत्रण पाकमध्येच होत असल्याने ते थांबवण्यासाठी राज्यशासन काय करणार ? हा प्रश्न उरतोच.
काश्मीरमधील धर्मांतर !
काश्मीरमधील आतंकवादी कारवाया चालूच असतांना आता तेथे जे काही शिल्लक शीख आहेत, त्यांच्यापैकी २ मुलींचे अपहरण करून बलपूर्वक त्यांचे इस्लाममध्ये धर्मांतर करण्यात आल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. जे पाकमध्ये चालते, तेच भारतात होते, हे हिंदूंना आणि शिखांनाही लज्जास्पद आहे. या लव्ह जिहादच्या घटना असल्याचे सांगण्यात येत आहे. एकीकडे काश्मीरमध्ये पुन्हा हिंदूंना वसवण्याचा प्रयत्न करत असतांना दुसरीकडे अशा घटना घडणे म्हणजे काश्मीरमध्ये केवळ जिहादी आतंकवादच नव्हे, तर अन्य जिहादी संकटे आहेत आणि त्यांच्याशीही लढावे लागणार आहे, हे लक्षात येते.
आक्रमक होणे आवश्यक !
पंतप्रधान मोदी यांनी आयोजित केलेल्या काश्मीरमधील नेत्यांच्या बैठकीनंतर आतंकवाद्यांचा हा आक्रमकपणा रोखण्यासाठी आता भारतानेही दुपटीने आक्रमक होण्याची आवश्यकता आहे. असे असले, तरी सरकारी स्तरावरून काश्मीरमधील या घटनांना प्रत्युत्तर देण्याविषयी अद्यापतरी कोणतेही विधान करण्यात आलेले नाही. कदाचित् यात मोठी हानी न झाल्याने सरकार त्याकडे गांभीर्याने पहात नाही का ? असा प्रश्न उपस्थित होतो. अशामुळे कधीतरी काश्मीरमधील आतंकवाद नष्ट होईल का ? कदाचित् यानंतर एखादे सर्जिकल किंवा एअर स्ट्राईक केले जाईल; मात्र त्यातूनही जिहादी आतंकवाद नष्ट होणार नाही. ते करण्यासाठी पाकला नष्ट केले पाहिजे !