जळगाव येथील पू. (सौ.) केवळबाई पाटीलआजी यांच्या संदर्भात साधकांना आलेल्या अनुभूती
१. श्रीमती विजया पाटील, बिल्लीमोरा, गुजरात.
१ अ. पू. आजींना भेटायला गेल्यावर त्यांनी पूर्वजांच्या त्रासाच्या निवारणासाठी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करण्यास सांगणे आणि घरी गेल्याक्षणी तो नामजप आपोआप चालू होणे : ‘मी माझ्या बहिणीच्या समवेत तिच्या सासूबाईंना, म्हणजेच पू. (सौ.) पाटीलआजींना भेटायला गेले होते. माझ्या सासरी पूर्वजांचा त्रास आहे. माझ्या यजमानांचा अल्प वयातच मृत्यू झाला. माझ्या दिराचा विवाह जमत नाही. पू. (सौ.) पाटीलआजींनी आम्हाला ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करायला सांगितला. घरी जातांना प्रवासात मी हे पूर्णपणे विसरले होते; मात्र घरी गेल्याक्षणी माझा ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप आपोआप चालू झाला.’
२. श्रीमती दीपा डाफळे, सातारा
२ अ. पुष्कळ ताप येऊन पोटात दुखत असतांना पू. आजींनी दिलेले विभूतीचे पाणी प्यायल्यावर बरे वाटणे : ‘एकदा मला पुष्कळ ताप आला होता आणि माझ्या पोटातही दुखत होते. आधुनिक वैद्यांचे औषध घेऊनही काही परिणाम झाला नाही. पू. पाटीलआजी सेवाकेंद्रात आल्यावर त्यांनी मला विभूतीचे पाणी प्यायला दिले. सायंकाळपर्यंत मला पूर्ण बरे वाटायला लागले.
२ आ. प्रकृती बिघडल्यावर मनात नकारात्मक विचार येणे आणि पू. आजींशी बोलल्यावर मनातील नकारात्मक विचार न्यून होऊन बरे वाटणे : एकदा माझी प्रकृती बिघडली होती. मी २ दिवस झोपून होते. माझ्या मनातील नकारात्मक विचार वाढले होते. तेव्हा माझ्या मनात ‘पू. आजींशी बोलावे’, असा विचार आला; मात्र एक मासापासून पू. आजींचा भ्रमणभाष बंद होता. त्यानंतर एक घंट्याने सेवाकेंद्रात पू. आजींचा भ्रमणभाष आला. मीच त्यांचा भ्रमणभाष घेतला. पू. आजी म्हणाल्या, ‘‘एक मासापासून बंद असलेला भ्रमणभाष चालू झाल्यावर ‘प्रथम सेवाकेंद्रातील साधकांशी बोलावे’, असे मला वाटले.’’ पू. आजींशी बोलल्यामुळे माझ्या मनातील नकारात्मकता दूर होऊन मला बरे वाटू लागले.
२ इ. प्रकृती बिघडल्यावर थोड्या वेळाने बरे वाटू लागणे, त्या वेळी पू. आजींना ‘साधिकेचा त्रास वाढला असून तिच्यासाठी प्रार्थना अन् नामजप करावा’, असे वाटणे आणि त्यांनी प्रार्थना अन् नामजप केल्याने बरे वाटत असल्याचे साधिकेच्या लक्षात येणे : मी नंदुरबार येथे सेवेनिमित्त गेले असतांना माझी प्रकृती बिघडली; मात्र नंतर थोड्या वेळाने मला बरे वाटू लागले. तेव्हा पू. पाटीलआजी चाळीसगावला होत्या. त्यांनी मला सकाळी भ्रमणभाष करून विचारले, ‘‘दीपा, आता बरे वाटते का ?’’ मी त्यांना विचारले, ‘‘मी रुग्णाईत आहे’, हे तुम्हाला कसे समजले ?’’ त्या म्हणाल्या, ‘‘मी नामजप करत असतांना मला तुझी आठवण झाली आणि ‘तुझा त्रास वाढला आहे. तुझ्यासाठी प्रार्थना अन् नामजप करावा’, असे मला वाटले. आता बरे वाटत आहे ना ?’’ त्यांचे बोलणे ऐकून माझ्या डोळ्यांत पाणी आले. तेव्हा ‘मला लगेच बरे का वाटले ?’, हे माझ्या लक्षात आले. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले संतांच्या माध्यमातून साधकांची किती काळजी घेत आहेत !’, असे वाटून मी कृतज्ञता व्यक्त केली.’
३. सौ. मीनाक्षी प्रमोद पाटील, जामनेर, जळगाव
३ अ. पू. आजींनी दिलेले औषध लावल्यावर तळहातावरील कुरूप एकाच दिवसात नाहीसे होणे : ‘वर्ष २०१० मध्ये माझ्या तळहाताला कुरूप झाले होते. तळहातावरील कुरूप कापून काढणेही शक्य नव्हते. मला सतत वेदना व्हायच्या. याविषयी मी पू. आजींना सांगितल्यावर त्यांनी मला औषध सिद्ध करून दिले आणि प्रार्थना करून औषध लावण्यास सांगितले. मी त्या दिवशी दिवसातून २ वेळा ते औषध लावले. दुसर्याच दिवशी कुरूप नाहीसे झाले. ते पाहून मला आनंद झाला. मला परात्पर गुरुदेव आणि पू. आजी यांच्याप्रती कृतज्ञता वाटली.
३ आ. पू. आजींनी दिलेले विभूतीचे पाणी प्यायल्यावर ४ – ५ वर्षांपासून होणारा खांदे दुखण्याचा त्रास दूर होणे : मला ४ – ५ वर्षे खांदे आणि दंड यांत तीव्र वेदना व्हायच्या. वर्ष २०१७ च्या गुरुपौर्णिमेला पू. पाटीलआजी जळगावला आल्या होत्या. तेव्हा मी त्यांना या त्रासाविषयी सांगितले. पू. आजींनी प्रार्थना करून मला एक पेला विभूतीचे पाणी प्यायला दिले. तेव्हापासून मला खांदे दुखण्याचा त्रास झाला नाही.’
४. सौ. भारती भरत पंडित, नंदुरबार
४ अ. आधुनिक वैद्यांनी गुडघ्यावर झालेली मोठी गाठ शस्त्रकर्म करून काढायला सांगणे आणि पू. आजींनी दिलेले औषध लावल्यावर दोनच दिवसांत गाठ नाहीशी होणे : ‘एकदा माझ्या गुडघ्यावर मोठी गाठ झाली होती. आधुनिक वैद्यांनी मला शस्त्रकर्म करून घ्यायला सांगितले होते. पू. पाटीलआजी नंदुरबार येथे आल्या असतांना मी त्यांना सर्व सांगितले. पू. आजींनी मला औषध सिद्ध करून दिले. पू. आजींनी दिलेले औषध लावल्यावर दोनच दिवसांत ती गाठ नाहीशी झाली.’
(जुलै २०१८)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |