पोर्तुगिजांच्या सालाझारशाहीची साक्ष असलेले सत्तरी तालुक्यातील ‘कादय’च्या (कारागृहाच्या) जतनासंदर्भात सरकारची अनास्था !

गोमंतकियांच्या संघर्षाची ज्वलंत प्रतिके नामशेष होण्याच्या मार्गावर !

प्रशासन पोर्तुगिजांच्या गोव्यातील स्मृती जपण्यासाठी अनेक प्रयत्न करते; मात्र गोमंतकाचा इतिहास जतन करण्यासाठी अशी मागणी करावी लागते !

पोर्तुगीज काळात गोमंतकियांचा झालेला छळ

वाळपई, २८ जून (वार्ता.) – पोर्तुगिजांनी गोमंतकावर ४५० वर्षे राज्य केले. या जुलमी राजवटीत गोमंतकियांचे अतोनात हाल करण्यात आले. या अत्याचारांच्या विरोधात सत्तरीतील नागरिकांनी सुमारे २५ ते ३० वेळा प्रखर झुंज दिली. यामुळे पोर्तुगिजांना सत्तरी तालुक्यावर अधिक काळ शासन करता आले नाही. पोर्तुगिजांनी सत्तरीतील स्वातंत्र्यसैनिकांना पकडून त्यांचा छळ करण्यासाठी तालुक्यात अनेक ठिकाणी ‘कादय’ची (कारागृहांची) उभारणी केली होती. हे ‘कादय’ (कारागृह) म्हणजे पोर्तुगिजांच्या सालाझारशाहीची (सालाझार नावाच्या क्रूरतेने वागणार्‍या राज्यकर्त्याची हुकूमशाही) साक्ष आहे. भावी पिढीसाठी त्यांचे जतन होणे आवश्यक आहे; मात्र सरकारच्या अनास्थेमुळे ही कारागृहे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.