पुण्यातील श्री शिवछत्रपती क्रीडानगरात नेते आणि अधिकारी यांनी गाड्या आणल्या थेट ‘ॲथलेटिक्स ट्रॅक’वरून !
खेळाडूंच्या सुविधेसाठी कोट्यवधी रुपये व्यय करून बनवलेल्या ॲथलेटिक्सच्या सिंथेटिक ट्रॅकवर गाडी घालतांना नेते आणि मान्यवर यांनी जराही विचार केला नाही का ? स्वार्थासाठी क्रीडासुविधांची हानी करू धजावणार्या अनिर्बंध लोकांना काय म्हणावे ? ट्रॅकची झालेली हानी संबंधितांकडून वसूल करणार का ?
पुणे, २८ जून – म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडानगरीमध्ये कोट्यवधी रुपये खर्च करून मुख्य स्टेडियममध्ये ॲथलेटिक्सचा सिंथेटिक ट्रॅक उभारण्यात आला आहे. क्रीडा विद्यापिठाच्या सिद्धतेसाठी या इमारतीमध्ये २६ जूनला आढावा बैठक आयोजित केली होती. मुख्य इमारतीमध्ये दुसर्या मजल्यावरील बैठक कक्षामध्ये जाण्यासाठी उद्वाहन असूनही मंत्री आणि इतर मान्यवर यांना २ मजले चढावे लागू नयेत; म्हणून त्यांची वाहने थेट ॲथलेटिक्सच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कृत्रिम धावपट्टीवरून गेली. या बैठकीला ऑलिंपिक संघटनेचे माजी अध्यक्ष असलेल्या शरद पवारांपासून क्रीडामंत्री सुनील केदार, राज्यमंत्री अदिती तटकरे यांच्यासह क्रीडा सचिव, महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त उपस्थित होते.
यानिमित्ताने क्रीडामंत्र्यांची मर्जी राखण्यासाठी क्रीडा विभागातील अधिकारी प्रसंगी कोट्यवधी रुपयांच्या सुविधांचा कसा बळी देऊ शकतात, हे बघायला मिळाले. ही छायाचित्रे वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाल्यावर क्रीडा क्षेत्रातून त्याविषयी दुःख व्यक्त करण्यात आले.
सिंथेटिक धावपट्टीसाठी ५ कोटींहून अधिक व्यय येतो. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या वेळी ही धावपट्टी सिद्ध करण्यात आली होती. या धावपट्टीवर जड वस्तू ठेवल्यास तिची हानी होऊ शकते, तसेच धावपटूंना दुखापत होऊ शकते. ते टाळण्यासाठी धावपट्टीची काळजी घेतली जाते. सर्व मान्यवर बैठकीसाठी आल्यानंतर ही वाहने बैठक संपेपर्यंत तेथेच उभी होती. स्टेडियमचा वापर खेळाविना दुसर्या कोणत्याही कारणासाठी करण्यात येणार नाही, अशा घोषणा करणार्या क्रीडामंत्र्यांच्या लक्षात ही गोष्ट आणून दिल्यावर त्यांनी हसून त्याकडे दुर्लक्ष केले.
या पार्श्वभूमीवर क्रीडा आणि युवक सेवा संचलनालयाचे उपसंचालक सुहास पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या खुलाशात म्हटले आहे की, ॲथलेटिक्स ट्रॅक शेजारील सिमेंट काँक्रीटवरून एकच गाडी जाण्याचे नियोजन करण्यात आले होते; परंतु ताफ्यातील काही गाड्या अचानक ट्रॅकवर गेल्या. या प्रकारामुळे ट्रॅकची हानी झालेली नाही. तसेच झालेल्या प्रकाराविषयी आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहोत. भविष्यात अशा घटना पुन्हा घडणार नाही, याचे काटेकोर नियोजन आम्ही केले आहे.
क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनीही या घटनेची गंभीर दखल घेतली असून यापुढे असे प्रकार होणार नाहीत, यासाठी त्यांनी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत आणि दिलगीरी व्यक्त केली आहे.