आंबिल-ओढ्यातील नागरिकांचे ठिय्या आंदोलन !

सुप्रिया सुळे यांच्यासमोरच ‘अजित पवार मुर्दाबाद’च्या घोषणा

आंदोलनकर्ते , आंदोलन स्थळी उपस्थित सुप्रिया सुळे (मध्यभागी)

पुणे, २८ जून – येथील आंबिल ओढा कारवाईविरोधात २८ जून या दिवशी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने स्थानिकांच्या साहाय्याने पुणे महापालिकेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करण्यात आले. १३० घरांवर कारवाई केली जाणार असल्याने नागरिक आक्रमक झाले. पाडलेली घरे बांधून देण्याची, तसेच विकासकाला शिक्षा व्हावी अशा मागण्या आंदोलकांनी या वेळी केल्या. वंचित बहुजन आघाडी आणि आंबिल ओढ्यातील महिला आंदोलनात सहभागी झाल्या. महापालिकेविरोधात नागरिकांनी घोषणा दिल्या. या वेळी आंदोलक महिलांना भेट देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे घटनास्थळी पोहोचल्या असता वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या समोरच ‘अजित पवार मुर्दाबाद’, ‘महाविकास आघाडी सरकार मुर्दाबाद’ अशा घोषणा दिल्या. अजित पवारांनी ही कारवाई करण्यास सांगितले. ‘विकासकसुद्धा अजित पवार यांच्या जवळचा आहे’, असे सांगत वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि आंदोलक यांनी न्याय देण्याची मागणी केली. ‘दलितांची मते चालतात; मात्र आमचे प्रश्न का सोडवता येत नाहीत ?’, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि आंदोलक यांच्या आरोपांनंतर सुप्रिया सुळे यांना माध्यमांनी प्रश्न विचारले. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, हा विषय संवेदनशीलपणे सोडवणे आवश्यक आहे. त्यामुळे या प्रकरणात कोणतेही राजकारण करू नये. ही माहिती कुठून मिळाली त्याचा काही पुरावा आहे का ? मला सगळे पुरावे द्या, ऑडिओ क्लिप द्या. मी स्वतः तक्रार करीन.

आंबिल ओढ्यावरील घरांवर पुणे महापालिकेने २४ जून या दिवशी अतिक्रमण हटवण्याची कारवाई केली होती. या कारवाईला स्थानिकांनी विरोध केला होता. तसेच या वेळी आंदोलनाच्या वेळी आत्मदहनाचा प्रयत्न झाला होता. त्यानंतर काही घरे पाडल्यानंतर या पाडकामाला न्यायालयाने स्थगिती दिली. शिवाय नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनीही पुढील आदेशापर्यंत पाडकाम थांबवण्याचे निर्देश दिले.