सोलापूर येथे मुलांची विशेष तपासणी मोहीम; २ लाख मुलांची पडताळणी पूर्ण !
३१ मुलांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळले
सोलापूर – जिल्हा परिषद आरोग्य विभागाने मागील सप्ताहापासून ‘माझे मूल माझी जबाबदारी’ आणि ‘माझे विद्यार्थी माझी जबाबदारी’ या मोहिमा राबवण्यास प्रारंभ केला आहे. यामध्ये १८ वर्षांपर्यंतच्या मुलांची आरोग्य पडताळणी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र आणि शाळा या ठिकाणी केली जात आहे. आतापर्यंत २ लाख मुलांची पडताळणी झाली असून ३१ मुलांना कोरोना संसर्ग झाल्याचे आढळले आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसर्या लाटेमध्ये मुलांना असलेला धोका लक्षात घेऊन त्यातून मुलांचे पूर्णपणे संरक्षण व्हावे, यासाठी ही पडताळणी करण्यात येत आहे.
‘कोरोना काळात पालकांनी मुलांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी ?’ याची माहिती असलेले माहितीपत्रक जिल्हा परिषद आरोग्य विभागाने मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून सिद्ध केले आहे. जिल्ह्यातील सर्व पालकांपर्यंत हे माहितीपत्रक पोचवले जाणार आहे. या माहितीपत्रकाचे अनावरण २५ जून या दिवशी येथील नियोजन भवन येथे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
१० दिवसांपासून पडताळणी मोहीम चालू !
मागील १० दिवसांत २ लाख १५ सहस्र ९८० मुलांची पडताळणी करण्यात आली आहे. त्यामध्ये ३१ सहस्र ७९२ मुलांची पडताळणी करून त्यांना जागीच औषधोपचार देण्यात आला, तर कोरोनासदृश लक्षणे असलेली मुले १९१ आढळून आलेली आहेत.