५५ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला बांदिवडे, फोंडा, गोवा येथील चि. प्रथमेश विष्णु राठीवडेकर (वय २ वर्षे) !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. प्रथमेश विष्णु राठीवडेकर एक आहे !
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना सिद्ध केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
ज्येष्ठ कृष्ण पक्ष चतुर्थी (२८.६.२०२१) या दिवशी चि. प्रथमेश विष्णु राठीवडेकर याचा दुसरा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याचे आई-वडील आणि कुटुंबीय यांना जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
चि. प्रथमेश विष्णु राठीवडेकर याला द्वितीय वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
१. जन्मापूर्वी
१ अ. गर्भधारणेनंतर झालेले त्रास
१. ‘मला ५ वा मास चालू असतांना रक्तस्राव झाल्यामुळे २ दिवस रुग्णालयात भरती व्हावे लागले. त्यानंतर आधुनिक वैद्यांनी मला पूर्ण विश्रांती घेण्यास सांगितली. नंतरही ‘गर्भपात होऊ नये’, यासाठी मला ८ मास पूर्ण होईपर्यंत प्रत्येक आठवड्याला एक इंजेक्शन घ्यावे लागले.
२. मला गरोदरपणी मध्यरात्री २ – ३ वाजेपर्यंत झोप लागत नव्हती.
३. बाळाविषयी माझ्या मनात नकारात्मक विचार येत असत.
४. रक्तदाब वाढल्यामुळे ७ व्या मासापासून मला रक्तदाबाची गोळी घ्यावी लागली.’
– सौ. वसुधा विष्णु राठीवडेकर (चि. प्रथमेशची आई)
१ आ. गर्भधारणेनंतर आलेल्या अनुभूती
१. ‘पत्नीला तिसरा मास चालू असतांना पुरोहित दामोदर वझेकाकांनी गर्भसंस्कार विधी केला. तेव्हा श्री गणेशाला वाहिलेले फूल आपोआप खाली पडले.
२. तिसर्या, सहाव्या आणि आठव्या मासांत गर्भसंस्कार विधीच्या वेळी करण्यात आलेल्या होमात आहुती देतांना ‘देवता आहुती स्वीकारत आहेत’, असे मला जाणवत होते.’
– श्री. विष्णु राठीवडेकर (चि. प्रथमेशचे वडील)
३. ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करतांना आणि पू. अशोक पात्रीकरकाका यांनी सांगितलेले मंत्रजप म्हणतांना ‘बाळ शांतपणे ऐकत आहे आणि प्रतिसाद देत आहे’, असे मला जाणवत असे.
४. मला ‘प्रतिदिन रामनाथी आश्रमात जावे’, असे वाटत होते. तिथे जाण्यासाठी कितीही अडचणी आल्या, तरी त्यावर मात करून माझी आश्रमात जाण्याची सिद्धता असायची. मला सतत परात्पर गुरु डॉ. आठवले यांना ‘बघावे आणि भेटावे’, अशी इच्छा होत असे.
५. मला आश्रमातील महाप्रसाद ग्रहण करायला आवडत होता. घरातील किंवा बाहेरून आणलेले अन्न खाल्ल्यावर मला उलट्या होत असत.
६. मला ८ वा मास चालू असतांना संतांचा सत्संग लाभला. या सत्संगाच्या ४ घंट्यांच्या कालावधीत गर्भाने काहीच हालचाल केली नाही. त्या वेळी ‘बाळ ध्यान लावून चैतन्य ग्रहण करत आहे’, असे मला वाटले.’
– सौ. वसुधा विष्णु राठीवडेकर
१ इ. ‘वहिनी गरोदर असतांना माझ्याकडून बर्याच वेळा आपोआप बाळाभोवती संरक्षककवच निर्माण होण्यासाठी प्रार्थना व्हायची.’ – कु. कविता राठीवडेकर, सनातन आश्रम, रामनाथी गोवा. (प्रथमेशची आत्या)
२. प्रसुती
‘रक्तदाब सतत उच्च रहात असल्यामुळे आधुनिक वैद्यांनी माझी प्रसुती लवकर करण्याचे ठरवले. मला ८ मास पूर्ण होऊन १० दिवस झाल्यावर माझी प्रसुती झाली. नऊ मास पूर्ण न होता प्रसुती झाली असूनही बाळ एकदम व्यवस्थित होते. मला मुलगा झाला.’
– सौ. वसुधा विष्णु राठीवडेकर
३. जन्मानंतर
३ अ. वय जन्म ते ३ मास
३ अ १. काचेच्या पेटीत असतांनाही बाळाच्या हातांची मुद्रा केलेली असणे : ‘बाळाचा जन्म झाल्यावर काही दिवस त्याला काचेच्या पेटीत ठेवण्यास सांगितले होते. काचेच्या पेटीत असतांनाही त्याच्या हातांची मुद्रा (तर्जनीचे टोक आणि अंगठ्याचे टोक जुळलेले) केलेली असायची.’ – सौ. सुमन दुसे आणि श्री. दत्तात्रेय दुसे (प्रथमेशचे आजी-आजोबा (आईचे आई-वडील)), बडनेरा, अमरावती.
३ अ २. बाळ सात्त्विक असल्यामुळे रुग्णालयातील वातावरणही आश्रमाप्रमाणे चांगले जाणवणे : ‘बाळाचा जन्म झाल्यावर काही वेळा वहिनीला सोबत करण्यासाठी मी रुग्णालयात थांबले होते. इतर वेळी रुग्णालयात गेल्यावर माझे डोके जड होते; मात्र या वेळी मला तेथील वातावरण आश्रमाप्रमाणेच वाटले. बाळाला जवळ घेतल्यावर ‘बाळ सात्त्विक आहे’, असे मला जाणवले.’ – कु. कविता राठीवडेकर
३ अ ३. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी ‘बाळ सात्त्विक आहे’, आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ ‘बाळ दैवी आहे’, असे सांगणे : ‘बाळ २ मासांचे असतांना आम्ही रामनाथी आश्रमात गेलो होतो. तेव्हा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी बाळाला घेतले आणि ‘बाळ सात्त्विक आहे’, असे आम्हाला सांगितले. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी भ्रमणभाषवर बाळाचे छायाचित्र बघून ‘बाळाच्या गालावर खळी पडते. बाळ दैवी आहे’, असे सांगितले.’
– सौ. वसुधा विष्णु राठीवडेकर
(क्रमशः)
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/490830.html |
|