सहनशील आणि गुरुदेवांप्रतीच्या भावाच्या बळावर तीव्र शारीरिक त्रासांतही आनंदी असणार्या ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) चंद्ररेखा जाखोटिया !
१६ जून २०२१ या दिवशी देवद आश्रमातील सौ. चंद्ररेखा जाखोटिया यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ६१ वर्षे होते. २८ जून २०२१ या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा तेरावा दिवस आहे. त्या निमित्ताने त्यांच्या कुटुंबियांना लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या मृत्यूविषयी मिळालेल्या पूर्वसूचना येथे देत आहोत.
(भाग २)
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/489751.html |
१. सौ. प्रीती आनंद जाखोटिया (सून), देहली
१ अ. सहनशील : ‘सासूबाईंना १३ वर्षांपासून पायांत अत्यंत तीव्र वेदना होत होत्या. त्या त्यांनी आनंदाने सहन केल्या. त्यांना वेदनेची तीव्र कळ आल्यावरच ‘त्यांना वेदना होत आहेत’, असे लक्षात यायचे.
१ आ. सुनेला मुलीप्रमाणे प्रेम देणे
१. मी देवदला आल्यावर त्या मला प्रेमाने जवळ घेत. त्या माझ्या पाठीवर मायेने हात फिरवून विचारपूस करत.
२. मी विवाहापूर्वी आणि विवाहानंतरही त्यांच्याशी दबून वागत होते. हे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी श्री. आनंद यांना विचारले, ‘‘मी माझ्या वागण्यात काय पालट करू ?’’ नंतर ‘माझ्यात सहजता यावी’, यासाठी त्यांनी मला बोलते केले.
३. एकदा माझ्याकडून श्री. आनंद यांचा एकेरी उल्लेख केला गेला. ते त्यांना आवडले नाही. त्यांनी तसे मला सांगितले. तेव्हा मला थोडा ताण आला होता. मी पुन्हा खोलीत येऊन त्यांची वेणी घालत असतांना त्या मला म्हणाल्या, ‘‘आपल्या पतीचे नाव घ्यायला बरे वाटत नाही ना; म्हणून तुला तसे सांगितले. तू आनंदला ‘अहो’ म्हणतेस, ते ऐकायला छान वाटते.’’ अशा प्रकारे त्यांनीच माझा ताण दूर केला.
४. मी बारीक असल्याने ‘मी व्यवस्थित जेवण करावे’, असे त्यांना वाटत असे. त्यांच्यासाठी भाकरी किंवा अन्य काही पदार्थ बनवलेले असतील, तर त्या मला खाण्यासाठी विचारीत.
१ इ. सुनेकडून कसलीही अपेक्षा नसणे
१. त्या इतकी वर्षे अंथरूणाला खिळून असूनही ‘सून आली; म्हणून स्वतःची सेवा सांगितली’, असे त्यांनी कधी केले नाही. त्यांची सेवा करण्याविषयी किंवा अन्य कुठल्याही व्यावहारिक अपेक्षा त्यांनी माझ्याकडून केल्या नाहीत.
२. मी विवाहापूर्वी रामनाथी आश्रमात सेवा करत होते. माझी विवाहानंतरही रामनाथी आश्रमात राहून सेवा करण्याची इच्छा होती. तेव्हा ‘मी त्यांच्या समवेत देवद आश्रमात रहावे’, असे त्यांनी मला सांगितले नाही. त्यांनी मला कुठेही राहून सेवा करण्याची अनुमती दिली.
३. आम्ही (मी आणि श्री. आनंद) काही कालावधीनंतर देहली सेवाकेंद्रात सेवेसाठी गेलो. तिथे जाण्यापूर्वी ‘आम्ही त्यांच्या समवेत रहावे’, असे त्यांना वाटत होते; परंतु केवळ गुर्वाज्ञा म्हणून त्यांनी ते स्वीकारले.
१ ई. अनुभूती – सासूबाईंची वेणी घालतांना परात्पर गुरु डॉक्टरांचे स्मरण होऊन प.पू. भक्तराज महाराज यांची भजने म्हटली जाणे : मी देवद आश्रमात आल्यावर त्यांची वेणी घालत असे. त्यांची वेणी घालतांना माझ्याकडून प.पू. भक्तराज महाराज यांची भजने आपोआप म्हटली जायची. त्या वेळी मला परात्पर गुरु डॉक्टरांचे स्मरण होत असे. सासूबाईंना याविषयी सांगितल्यावर त्या म्हणाल्या, ‘‘आश्रमातील साधिकांनीही त्यांना अशीच अनुभूती आल्याचे सांगितले; पण मला काही कळत नाही. मी काही करत नाही.’’
१ उ. सासूबाईंच्या निधनाविषयी मिळालेली पूर्वसूचना ! : सासूबाईंचा मृत्यू झाल्याच्या २ दिवस आधी माझ्या मनात ‘त्या आता जातील’, असा विचार आला. तेव्हा मी क्षमायाचना केली. त्यांचे निधन झाल्यावर ‘ती पूर्वसूचना होती’, हे माझ्या लक्षात आले.
१ ऊ. सासूबाईंच्या मृत्यूनंतर श्री. आनंद, श्री. संपतदादा (दीर) आणि सासरे यांच्याविषयी लक्षात आलेली सूत्रे
१ ऊ १. श्री. आनंद जाखोटिया (पती) : आईचे निधन झाल्याचे संपतदादांनी श्री. आनंद यांना भ्रमणभाष करून सांगितले. तेव्हा आम्ही दुपारचा महाप्रसाद घेत होतो. श्री. आनंद यांनी याविषयी सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांना शांतपणे सांगितले. काही वेळाने सद्गुरु पिंगळेकाकांनी श्री. आनंद यांना त्यांच्या मनाची स्थिती विचारली. तेव्हा त्यांनी पुढचे विधी आणि त्याचे नियोजन करण्याचे विचार करत असल्याचे सांगितले. आई गेल्यावर ते भावनिक न होता स्थिर होते. ‘देहली ते पनवेल’ या प्रवासाच्या वेळी ‘मला महान माऊली (आई) आणि गुरुमाऊली लाभली’, यासाठी ते कृतज्ञता व्यक्त करत होते.
१ ऊ २. श्री. संपत जाखोटिया (मोठे दीर) : सासूबाईंचे निधन झाल्यानंतर आम्ही (मी आणि श्री. आनंद) देवद आश्रमात पोचेपर्यंत मी २ – ३ वेळा संपतदादांशी बोलले. ते स्थिर राहून सर्व कृती करत होते. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी त्यांना भ्रमणभाषवर सांगितले, ‘‘आईचे देहप्रारब्ध संपले आणि तिला चांगली गती मिळाली आहे. त्यामुळे शोक न करता कृतज्ञताभावात रहा.’’ संपतदादांनी त्यांचे तंतोतंत पालन केले. ते शोक व्यक्त न करता कृतज्ञताभावात होते.
१ ऊ ३. श्री. नटवरलाल जाखोटिया (सासरे) : सासरे स्थिर होते. सासूबाई (पत्नी) वेदनांतून मुक्त झाल्या. त्यामुळे त्यांना कृतज्ञता वाटत होती. ते प्रतिदिन सासूबाईंची सेवा करीत. त्यांचा पूर्ण दिवस त्या सेवेतच जात असे. ते शेवटपर्यंत सासूबाईंच्या समवेत होते. सासूबाईंच्या निधनाच्या दुसर्या दिवशी त्यांना रिकामे वाटत असणार; म्हणून श्री. आनंद यांनी त्यांना त्यांच्या मनाच्या स्थितीविषयी विचारले. तेव्हा त्यांनी सांगितले, माझा दिनक्रम नेहमीप्रमाणे चालू आहे. त्यांनी नेहमीप्रमाणे विष्णुसहस्रनाम ऐकले आणि नामजपही केला. ते म्हणाले, ‘‘पत्नीच्या खोलीत शांत वाटत आहे.’’ यावरून ते स्थिर असल्याचे लक्षात आले.
१ ए. प्रवासात अनुभवलेली देवाची कृपा !
१ ए १. दुपारी ३.३० वाजता मुंबईला जाणार्या विमानात जागा उपलब्ध होणे : सासूबाईंचे निधन झाल्याचे आम्हाला दुपारी १२.४५ वाजता समजले. आम्ही पनवेल येथे जाण्याचे नियोजन करू लागलो. मुंबईला जाणारी सर्व विमाने सायंकाळी ५ वाजल्यानंतरची होती. आम्ही थोड्या वेळाने पुन्हा पाहिल्यावर दुपारी ३.३० वाजता सुटणार्या विमानात जागा उपलब्ध होत्या. आम्ही एका साधकाच्या साहाय्याने विमानाची तिकिटे काढली. आम्ही आश्रमातून २ वाजता निघालो आणि अर्ध्या घंट्यात विमानतळावर पोचलो.
१ ए २. विमानात केवळ २ जागाच शेष असणे : आम्हाला आत ‘बोर्डिंग पास’ घेण्यासाठी जाईपर्यंत ३ वाजले होते. तोपर्यंत अन्य प्रवाशांचे ‘बोर्डिंग’ झाले होते. आम्हाला उशीर झाल्याने ‘बोर्डिंग पास’ देणार्या व्यक्तीने तातडीने विमानात आम्ही येत असल्याचे कळवले आणि ‘चेक इन’ झालेले नसल्याने एका व्यक्तीला आमच्या समवेत पाठवले. विमान पूर्ण भरलेले होते. विमानात केवळ २ जागाच शेष होत्या. देवाने त्या जागा जणू आमच्यासाठीच ठेवल्या होत्या.
१ ए ३. विमान मुंबईला ठरलेल्या वेळेच्या आधी पोचणे आणि सासूबाईंचे अंत्यदर्शन घेऊ शकणे : मुंबईला विमान ५.४० वाजता पोचणार होते; पण देवाच्या कृपेने विमान ५ वाजताच मुंबई विमानतळावर उतरले. विमान सुटण्याच्या आणि उतरण्याच्या वेळा ठरलेल्या असतात. वेळेआधी विमान पोचणे, ही मोठी अनुभूती देवाने आम्हाला दिली. देवद आश्रमातील साधक आम्हाला घेण्यासाठी आधीच येऊन थांबले होते. रात्री ८ वाजता आम्ही देवद आश्रमात पोचलो आणि सासूबाईंचे अंत्यदर्शन घेऊ शकलो. त्यासाठी गुरुचरणी कृतज्ञता.
१ ऐ. साधकांनी सर्वतोपरी केलेले साहाय्य !
१ ऐ १. आश्रमातील साधकांनी अंत्यविधीची सिद्धता करणे : सकाळी ११.५५ वाजता सासूबाईंचे निधन झाले. आम्ही रात्री ८ वाजता देवद आश्रमात पोचलो. आम्ही आश्रमात पोचेपर्यंत साधिकांनी सासूबाईंना अंघोळ घालून त्यांना हिरवी साडी नेसवली होती. त्यांच्या पार्थिव देहाला घालण्यासाठी तुळस आणि फुले यांचे हार केले होते. आम्ही पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन श्री. आनंद यांनी पार्थिवाला हार घातला. आश्रमातील साधकांनीच अन्य सर्व सिद्धता केली होती. आमच्यापैकी कुणालाच काही करावे लागले नाही.
१ ऐ २. स्मशानात अग्नी शांत होईपर्यंत २ साधकांनी स्मशानात थांबणे : सासूबाईंवर अंत्यसंस्कार झाल्यानंतर काही वेळाने श्री. आनंद, संपतदादा आणि सासरे आश्रमात परतले; पण अग्नी शांत होईपर्यंत २ साधक तिथे रात्रभर थांबले होते. दुसर्या दिवशी श्री. आनंद यांना ‘स्मशानभूमीत जाऊन सर्व ठीक आहे ना, हे बघून यावे’, असे वाटले. त्यासाठी त्यांनी श्री. निनाद गाडगीळ यांना विचारले, ‘‘स्मशानात जाऊन येऊ शकतो का ?’’ तेव्हा दादांनी ते स्वतः दोन वेळा जाऊन तेथील स्थिती बघून आल्याचे सांगितले.
‘एक साधक आणि त्याच्या कुटुंबियांसाठी गुरुमाऊली आणि साधक किती करतात !’, याची आपण कल्पनाच करू शकत नाही. माझे मन कृतज्ञतेने भरून आले. माझी साधकांच्या रूपातील गुरुमाऊलीच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली. (२१.६.२०२१)
(समाप्त)
सौ. विद्या जाखोटिया (जाऊबाई), पुणेअ. सौ. चंद्ररेखा जाखोटिया (जीजी) यांच्या निधनासंदर्भात मिळालेली पूर्वसूचना ! : माझ्या जाऊबाई सौ. चंद्ररेखा (जीजी) यांचे निधन होण्याच्या २ दिवस आधी मी नेहमीप्रमाणे आगाशीत गेले होते. तेव्हा अकस्मात् अनेक कावळे माझ्या अंगावर येऊ लागले. तेव्हा मला भीती वाटली. मी प्रतिदिन अगाशीत जाते; मात्र कावळे अंगावर आले, असे कधीच झाले नव्हते. त्यानंतर २ दिवसांनी जीजी गेल्याचे समजले. तेव्हा देवाने मला दिलेली पूर्वसूचना माझ्या लक्षात आली. (२१.६.२०२१) |
कु. चारुशिला शिंदे (सुनेची लहान बहीण), पुणेअ. आनंदी : ‘सौ. चंद्ररेखाकाकूंना तीव्र वेदना होत असतांनाही त्यांच्या तोंडवळ्यावर तसे कधीच जाणवायचे नाही. त्या स्वतःला होणार्या वेदनांविषयी सांगत नसत. त्या नेहमी आनंदी असत. आ. साधनेची तीव्र तळमळ : त्यांना तीव्र शारीरिक त्रास असूनही त्यांना साधनेची तीव्र तळमळ होती. त्या या स्थितीतही ‘मला संत व्हायचे आहे. मला त्यासाठी प्रयत्न करायचे आहेत’, असे सांगायच्या. इ. गुरुदेवांप्रती भाव : एकदा त्यांनी स्वतःला होणार्या शारीरिक त्रासांविषयी गुरुदेवांना सांगितल्यावर गुरुदेव त्यांना म्हणाले, ‘‘माझ्यापेक्षा तुम्हाला अधिक त्रास होतो. तुम्ही कसे सहन करता ?’’ तेव्हा काकू म्हणाल्या, ‘‘तुम्हाला सर्वकाही ठाऊक आहे. तुम्हीच मला सहन करण्याची शक्ती देता.’’ (२१.६.२०२१) |
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |