उडत्या तबकड्यांचे गूढ !
अमेरिकेच्या सुरक्षायंत्रणेचे मुख्यालय पेंटॅगॉनने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालाचे वैशिष्ट्य म्हणजे तो उडत्या तबकड्यांविषयीचा आहे. वर्ष २००४ पासून अमेरिकेतील विमानचालक, सैन्यातील लोक यांना उडत्या तबकड्या दिसण्याच्या एकूण १४४ नोंदी आहेत. यातील एक प्रकरण वगळता अन्य सर्व प्रकारांचे गूढ कायम आहे. या नोंदीमधील उडत्या तबकड्या या अन्य ग्रहांवरून येत असाव्यात अथवा पृथ्वीच्या कक्षेबाहेरुन येत असाव्यात, ही शक्यता नाकारता येत नाही. सातत्याने दिसणार्या या तबकड्यांविषयीचा अहवाल सिद्ध करण्याची मागणी अमेरिकन काँग्रेसने केली होती आणि त्यानंतर वर्ष २०२० मध्ये एक पथक स्थापन करण्यात आले होते.
पेंटॅगॉनने यातील काही घटनांचे स्पष्टीकरण देतांना ती रशिया किंवा चीनचे तंत्रज्ञान असू शकते किंवा रडारवर दिसणारी बर्फाच्या क्रिस्टलसारखी घटना असू शकते, तर काही ठिकाणी ती अमेरिकेतीलच गुप्त प्रयोगांचा भाग असू शकतो, असेही मत नोंदवले आहे. या विषयावर लिखाण करणार्या अमेरिकन पत्रकारांच्या मते आधी त्यांनी अशा गोष्टींविषयी माहिती दिल्यावर वेड्यात काढले जायचे; मात्र आता सरकारने अहवाल काढल्यामुळे शिक्कामोर्तब झाले आहे. अशा तबकड्यांच्या संदर्भात संशोधन करणार्या संस्थेने सांगितले की, गेली ५० वर्षे आम्ही या विषयावर संशोधन करत आहोत. तेव्हा त्यास मान्यता मिळालेली नव्हती. आता ती मिळाल्यामुळे चांगल्या प्रकारे संशोधन करता येईल.
‘बर्म्युडा ट्रँगल’
पेंटॅगॉनने याविषयीचा एक व्हिडिओही प्रसारित केला आहे. तो वर्ष २०१७ चा असून यात उडणारी वस्तू विमानाच्या रडारवर स्पष्ट दिसते. यामध्ये विमानचालकाला आलेला अनुभवही प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. यातून एक सूत्र स्पष्ट होते की, ‘जगात मानवी बुद्धी, मन यांच्या आकलनाच्या पलीकडे काहीतरी गूढ आहे’, हे तरी या अहवालाद्वारे मान्य करण्यात आले आहे, हे नसे थोडके ! अमेरिकेतील पॅसिफिक महासागरातील ‘बर्म्युडा ट्रँगल’ येथील त्रिकोणी आकाराच्या पट्ट्यात आतापर्यंत अनेक विमाने, शेकडो जहाजे अदृश्य झाली आहेत. अमेरिकन वायूसेनेची जी ५ विमानांची तुकडी या सागरी पट्ट्यावरून उड्डाण करतांना अदृश्य झाली, तिचा शोध घेणारे विमानही अदृश्य झाले. विशेष म्हणजे विमाने किंवा जहाजे यांचे अवशेष, मृतदेह असे काहीच त्यानंतर आजतागायत सापडलेले नाहीत. याचा अर्थ ते एकतर खोल समुद्रात जात असावेत किंवा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेच्या पलीकडे कुठेतरी जात असावेत. समुद्रातील अवशेष एव्हाना अमेरिकेच्या सागरी मोहिमांमध्ये मिळाले असते; म्हणजे ते ‘समुद्राच्या तळाशी जात नसून पृथ्वीच्या कक्षेबाहेरच जात असावेत’, असा निष्कर्ष काढता येतो. याच्याशी साधर्म्य सांगणारी गोष्ट कृष्णविवराच्या (ब्लॅक होल्स) संदर्भात होते. कृष्णविवराची गुरुत्वाकर्षण क्षमता पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण क्षमतेच्या १० पट अधिक असते. कृष्णविवराच्या तोंडाजवळ आलेली वस्तू प्रचंड वेगाने त्यात खेचली जाते. ही विवरे म्हणजे अन्य ग्रहांवर, अन्य सृष्टीमध्ये जाण्याचे मार्गही असू शकतात.
गूढ विश्व
एका प्रसिद्ध लेखकाने त्याच्या मित्राचा मार्कंडेय डोंगरातील गुहेविषयी अनुभव मांडला आहे. नाशिक येथे मार्कंडेय डोंगरातील एका गुहेत ते काही अंतर गेल्यावर त्यांची विजेरी आपोआप बंद पडली. त्यांचा मित्र एकटा निमुळत्या होत जाणार्या गुहेतून पुढे जाऊन तिच्या दुसर्या टोकाला गेला, तेथे वेगळीच सृष्टी असल्याचे त्याच्या लक्षात आले आणि एका ऋषींचे दर्शन मित्राला झाले. त्या ऋषींनी मित्राच्या डोक्यावर हात ठेवून त्याला परत पाठवले. हा त्याच्या जाण्याचा कालावधी त्याच्या दृष्टीने २ दिवसांचा होता; मात्र गुहेच्या बाहेर तो आल्यावर प्रत्यक्षात ६ मास होऊन गेले होते. अशा गूढ गोष्टी या पृथ्वीवर पुष्कळ आहेत. त्यातील अगदी काहीच गोष्टींची उकल झाली आहे, उकल न झालेल्या गोष्टी अनेक असू शकतात. यातून पृथ्वीवर किंवा विश्वात स्थूल डोळ्यांनी दिसणार्या, पंचज्ञानेंद्रियांनी अनुभवू शकणार्या गोष्टींपेक्षा त्यांच्या पलीकडे असणारे विश्व पुष्कळ मोठे आहे. त्या अदृश्य विश्वाचा पसारा, त्याची विविधता यांची मानवी बुद्धीला अद्यापही जाण नाही. आपल्या धर्मग्रंथांत उल्लेख असणारे विविध देवतांचे लोक, मर्ह, जन, तप, सत्य लोक, सप्तपाताळ, सप्तनरक, ऋषिलोक, नागलोक, गंधर्वलोक, देवीलोक असे लोकांचेही अनेक प्रकार, त्यांची वैशिष्ट्ये आहेत. देवता, ऋषि मनाच्या गतीने विश्वात भ्रमण करू शकतात. देवतांच्या वाहनांचीही विशिष्ट गती आहे. संत ज्ञानेश्वर तर कलियुगात निर्जीव भिंत चालवून चांगदेव महाराजांच्या दर्शनाला गेले होते. संत तुकाराम महाराज हे सदेह वैकुंठाला गेले, त्यांना घेऊन जाण्यास विमान आले असे असतांना पुरो(अधो)गामी लोक ‘त्यांची हत्या झाली म्हणतात’, हे दुर्दैवी आहे.
१००-१२५ वर्षांपूर्वी विज्ञानाचा शोध लागला आणि वैज्ञानिक कसोट्यांच्या आधारे उपकरणे, वस्तू, यंत्रे सिद्ध करण्यात आली. या वैज्ञानिक शोधांचा उपयोग मानवाला सुख अधिकाधिक देण्यासाठी झाला. परिणामी मानव त्याच्या मूळ स्वरूपाकडे म्हणजे ईश्वराकडे जाण्याऐवजी मायेत अधिकाधिक गुंतला. ऋषिमुनींनी पूर्वी जे शोध लावले, त्यातील शास्त्रे ज्यामध्ये सूर्याच्या ऊर्जेवर विमान उडवणे, विविध अस्त्रांचे ज्ञान त्यातील काहीच आता उपलब्ध आहे. जे आहे ते गूढ भाषेत आहे. कलियुगातील स्वार्थी मानवाकडून त्यांचा गैरवापर होऊ शकतो, याची निश्चिती ऋषिमुनींना असावी, त्यामुळे ते ज्ञान सध्या गूढ स्वरूपात आहे. आयुर्वेदासारखे ज्ञान उपलब्ध आहे. ऋषिमुनी मानवाला हे ज्ञान देतील; मात्र त्यांची मानवाने साधना करावी, ही प्राथमिक अपेक्षा असेल. साधनेने प्राप्त होणार्या गूढ विद्येचा स्वार्थासाठी नव्हे राष्ट्र आणि धर्म यांच्या हितासाठी उपयोग होऊ शकतो. तात्पर्य उडत्या तबकड्यांसारख्या गूढ गोष्टींचा शोध घेण्यासाठी वैज्ञानिकतेच्या जोडीला साधनाही केली पाहिजे, हे निश्चित !