भारतातील शासनकर्त्यांनी वेदादी शास्त्रसंमत दर्शनविज्ञान पृथ्वीवर लागू करण्याचे व्रत घेतल्यास कोरोनाची महामारी समाप्त होईल ! – पुरी पीठाधीश्वर जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती
पुरी (ओडिशा) – निसर्गाने जगाला आणि भारताला धडा शिकवून जो संकेत दिला आहे, तो मी समजून चुकलो आहे. भगवंताच्या कृपेने कोरोनाची ही महामारी दूर व्हावी. भारताच्या शासनकर्त्यांनी ‘आम्ही वेदादी शास्त्रसंमत दर्शनविज्ञान भारताद्वारे पृथ्वीवर लागू करण्याचे व्रत घेतो’, असे घोषित केल्यास कोरोनाची ही महामारी लगेच समाप्त होण्यास प्रारंभ होईल, असे प्रतिपादन पुरी पीठाधीश्वर जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी येथे नुकतेच केले.
जगद्गुरु शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती पुढे म्हणाले,
१. निसर्ग ही ईश्वराची शक्ती आहे. निसर्ग हा निर्जीव असूनही चिन्मय आहे. निसर्ग हा कर्तव्यनिष्ठ आणि गुणनिष्ठ असल्याने तो शासनकर्त्यांची भाषा समजून घेईल; परंतु यांची, तसेच पुढेही होतील त्या शासनकर्त्यांची एकच अडचण आहे. त्यांना वाटते, ‘त्यांनी एखाद्या मनुवाद्याची गोष्ट ऐकली, तर ते राज्य करू शकणार नाहीत. त्यामुळे भारत नष्ट झाला तरी चालेल, तो रसातळाला गेला तरी चालेल; पण कोणतेही धर्माचार्य किंवा आध्यात्मिक पुरुष यांच्याकडे जाऊन त्यांच्यासमोर गुडघे टेकायचे नाही आणि त्यांचे मार्गदर्शन घ्यायचे नाहीत. शक्य झाल्यास त्यांनाही स्वतःच्या पक्षाचे प्रचारक बनवून ठेवायचे. या उन्मादामुळे ही स्थिती आहे.
२. देशात आजार नसून उन्मादाची पराकाष्ठा आहे. त्यामुळे भारताच्या शासनकर्त्यांनी घोषणा करावी, ‘निसर्गाने धडा शिकवून जो संकेत दिला आहे, तो आम्हाला कळला आहे. निसर्गाने आम्हाला अशा उंबरठ्यावर आणून उभे केले आहे की, आता आम्ही सनातन परंपरेद्वारे विकास केला पाहिजे.