लढाऊ हेलिकॉप्टर्सना लक्ष्य करून ड्रोनच्या साहाय्याने बॉम्बस्फोट !
|
|
जम्मू – येथील विमानतळावर तैनात असलेल्या भारतीय वायूदलाच्या लढाऊ हेलिकॉप्टर्सना लक्ष्य करून बॉम्ब आक्रमण करण्यात आले; मात्र येथील तांत्रिक परिसरातील इमारतीवर हे बॉम्ब पडले. २६ जूनच्या उत्तररात्री २ च्या सुमारास २ बॉम्ब ड्रोनच्या साहाय्याने ५ किमी अंतरावरून फेकण्यात आले. बॉम्ब हेलिकॉप्टर्सवर पडण्याऐवजी इमारतीवर पडल्याने मोठी हानी टळली, असे सांगण्यात येत आहे. या स्फोटांत २ सैनिक किरकोळ घायाळ झाले आहेत. ५ मिनिटांच्या अंतरावर हे दोन स्फोट झाले. रात्री १ वाजून ३७ मिनिटांनी पहिला, तर १ वाजून ४२ मिनिटांनी दुसरा स्फोट झाला. स्फोट झालेल्या इमारतीपासून काही अंतरावर मुख्य विमानतळ आणि भारतीय वायूदलाचे हवाईतळ (स्टेशन) आहे. पहिला स्फोट इमारतीच्या छतावर, तर दुसरा स्फोट भूमीवर झाला. बॉम्बमुळे इमारतीच्या स्लॅबच्या छताला भोक पडण्याएवढी या स्फोटकांची तीव्रता होती. या प्रकरणी दोघा जणांना अटक करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. स्फोटांची माहिती मिळाल्यानंतर केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी वायूदलाच्या अधिकार्यांशी चर्चा केली.
Twin explosions at #IndianAirForce station in #Jammuairport a terror attack: J&K DGPhttps://t.co/EiWq3EeXZx
— Zee News English (@ZeeNewsEnglish) June 27, 2021
१. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे विमानतळ पाक सीमेपासून केवळ १४ किमी अंतरावर आहे. ड्रोनद्वारे १२ किमीपर्यंत स्फोटके फेकता येतात. ही स्फोटके टाकण्यासाठी २ ड्रोन वापरण्यात आले आहेत. स्फोटके लादलेले ड्रोन रडारवर दिसत नाहीत. यामुळे अशा आक्रमणांसाठी वजन वाहून नेणारे ड्रोन वापरले जातात. या आधीही असे प्रकार करण्यात आले आहेत.
२. स्फोटांनंतर काही वेळातच संपूर्ण परिसर सील करण्यात आला. पोलीस आणि फॉरेन्सिक टीम सध्या घटनास्थळी असून ते स्फोटांचे मुख्य कारण शोधत आहेत. एन्.एस्.जी. (राष्ट्रीय सुरक्षा गार्ड) आणि एन्.आय.ए. (राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा) यांचे पथकही घटनास्थळी पोचले आहे.
चीनने पाकला दिलेल्या ड्रोनचा वापर !
पाकिस्तानी सैन्याने जिहादी आतंकवाद्यांना ड्रोनच्या साहाय्याने बॉम्ब फेकण्याचे प्रशिक्षण दिल्याचे समोर आले आहे. आतंकवाद्यांनी वापरलेले ड्रोन चीनने पाकच्या सैन्याला दिलेले आहेत. हे २० किमीपर्यंत उड्डाण करू शकतात आणि एका वेळी २५ किलो साहित्य नेऊ शकतात.