निरोगी आणि निरामय जीवनासाठी आयुर्वेद !
ब्राह्ममुहुर्ताचे अनन्यसाधारण महत्त्व जाणा !
१. ‘या काळात निराभिमानता असणार्या दैवी प्रकृतीच्या जिवांचा संचार होतो.
२. हा काळ सत्त्वगुणप्रधान असतो. सत्त्वगुण ज्ञानाची अभिवृद्धी करणारा आहे. या काळात बुद्धी निर्मळ आणि प्रकाशमान असते. ‘धर्म’ आणि ‘अर्थ’ यांविषयी करावयाची कामे, वेदांत सांगितलेली तत्त्वे (वेदतत्त्वार्थ) यांचे चिंतन, तसेच आत्मचिंतन यांसाठी ब्राह्ममुहूर्त हा उत्कृष्ट काळ आहे.
३. या काळात सत्त्वशुद्धी, कर्मरतता, ज्ञानग्रहणता, दान, इंद्रियसंयम, तप, शांती, भूतदया, निर्लोभता, निंद्यकर्म करण्याची लज्जा, स्थैर्य, तेज आणि शौच (शुद्धता) हे गुण अंगी येण्याचे कार्य सुलभ होते.
४. या काळात डास, ढेकूण आणि पिसवा क्षीण होतात.
५. या काळात वाईट शक्तींचे प्राबल्य क्षीण होते.’
-गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी
निसर्गनियमानुसार दिनचर्या का हवी ?
‘दिनचर्या निसर्गाच्या नियमांप्रमाणे असल्यास त्या कृतींचा मानवाला त्रास न होता लाभच होतो. यासाठीच निसर्गनियमांप्रमाणे (धर्माने सांगितलेल्या गोष्टींनुसार) वागणे आवश्यक आहे, उदा. सकाळी लवकर उठणे, उठल्यावर मुखमार्जन करणे, दात घासणे, स्नान करणे इत्यादी.
‘ऋषि सूर्यगतीप्रमाणे ब्राह्ममुहूर्ताच्या वेळी प्रातर्विधी, स्नान आणि संध्या करत. त्यानंतर वेदाध्ययन आणि कृषीकर्म करत अन् रात्री लवकर झोपत. त्यामुळे त्यांना शारीरिक स्वास्थ्य होते; परंतु आज लोक निसर्गनियमांच्या विरुद्ध वागत असल्यामुळे त्यांचे शरीरस्वास्थ्य बिघडले आहे. पशूपक्षीसुद्धा निसर्गनियमांनुसार आपली दिनचर्या करतात.’ – परात्पर गुरु पांडे महाराज
दात घासण्यासाठी काय वापरावे ?
‘दंतधावन करण्यासाठी कडुनिंब, खदिर (खैर), करंज, औदुंबर अशा वृक्षांचे काष्ठ (जाड काडी) वापरावे. दंतधावन करण्यासाठी गायीच्या शेणाच्या गोवर्या जाळून बनवलेली राखुंडी किंवा तुरटीची भुकटी वापरावी.
ब्रशने दात घासण्यापेक्षा बोटाने किंवा दातूनने स्वच्छ केल्याने शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही स्तरांवर लाभ होणे
१. ‘ब्रशचे केस कृत्रिम असल्यामुळे त्यांतून रज-तम कणांचे प्रक्षेपण होते. ब्रशच्या केसांच्या स्पर्शामुळे हिरड्या आणि दात यांवर रज-तम लहरींचे आवरण निर्माण होते. त्यामुळे दात केवळ स्थुलातून स्वच्छ होतात; परंतु सूक्ष्मातून ते अस्वच्छच असतात. याउलट बोटाने दात घासल्यावर देहातील चांगल्या शक्तीचे बोटाच्या पेरातून प्रक्षेपण होऊन हिरड्यांमध्ये संक्रमण होते. या प्रक्रियेमुळे हिरड्या आणि दात यांना सात्त्विकतेचा लाभ होऊन दात स्थुलातून आणि सूक्ष्मातूनही स्वच्छ होतात.
२. बोटाच्या पेराचा हिरड्यांवर दाब आल्यामुळे हिरड्यांचे मर्दन केल्याप्रमाणे परिणाम होतो. त्यामुळे हिरड्या बळकट होण्यास साहाय्य होते.
३. कडुलिंबाच्या काड्यांचा ‘दातून’ म्हणून वापर केल्यामुळे दात चांगल्या प्रकारे स्वच्छ होतात, तसेच कडुलिंबातील रस आणि चैतन्य यांचा लाभ हिरड्या आणि दात यांना होऊन ते बळकट होतात.’
-ईश्वर (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून, २८.११.२००७, रात्री १०.४०)
अभ्यंगस्नानाचे लाभ !
१. ‘अभ्यंगस्नान म्हणजे पहाटे उठून डोक्याला आणि शरिराला तेल लावून नंतर कोमट पाण्याने स्नान करणे
२. पिंडाच्या अभ्युदयासाठी केलेले स्नान म्हणजेच अभ्यंगस्नान !
३. अभ्यंगस्नानात तेल लावण्याचे महत्त्व
‘अभ्यंगाने, म्हणजेच स्नानापूर्वी तेल लावण्याने पिंडातील चेतनेतील प्रवाहाला अभंगत्व, म्हणजेच अखंडत्व प्राप्त होते. स्नानापूर्वी देहाला तेल लावल्याने पेशी, स्नायू आणि देहातील पोकळ्या जागृत अवस्थेत येऊन पंचप्राणांना कार्यरत करतात. पंचप्राणांच्या जागृततेमुळे देहातील टाकाऊ वायू ढेकरा, जांभया इत्यादींद्वारे बाहेर पडतात. यामुळे देहातील पेशी, स्नायू आणि अंतर्गत पोकळ्या चैतन्य ग्रहण करण्यात संवेदनशील बनतात. हा टाकाऊ वायू किंवा देहात घनीभूत झालेली उष्ण टाकाऊ ऊर्जा कधी कधी लहरींच्या रूपात डोळे, नाक, कान आणि त्वचेची रंध्रे यांतून बाहेर पडते; म्हणून तेल लावून झाल्यावर कधी कधी डोळे आणि मुख (चेहरा) लाल होतो.’
– एक विद्वान (श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, १२.९.२००७, दुपारी २.०८)
दिवसा का झोपू नये यामागील कारण !
‘दिवस आणि रात्र या दोन मुख्य काळांपैकी रात्रीच्या काळात साधना करण्यासाठी जास्त प्रमाणात शक्ती व्यय (खर्च) होते; कारण या काळात वातावरणात वाईट शक्तींचा संचार वाढल्याने साधनेसाठी हा काळ प्रतिकूल असतो. हा काळ मांत्रिकांना (मांत्रिक म्हणजे बलाढ्य आसुरी शक्ती) पोषक असतो; म्हणून सर्व मांत्रिक या तमोकाळात साधना करतात. याउलट सात्त्विक जीव सात्त्विक काळात (दिवसा) साधना करतात. ‘दिवसा जास्तीतजास्त साधना करून त्या साधनेचे रात्रीच्या काळात चिंतन करणे आणि दिवसभरात झालेल्या चुका सुधारण्याचा संकल्प करून परत दुसर्या दिवशी परिपूर्ण साधना करण्यासाठी प्रयत्न करणे’, असे ईश्वराला अपेक्षित असल्याने दिवसा झोपणे टाळावे.’ – एक विद्वान (श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २१.३.२००५)
झोपेच्या संदर्भातील आचार
- झोपण्याच्या खोलीत पूर्ण अंधार करू नका.
- झोपतांना अंथरुणाभोवती देवतांच्या सात्त्विक नामजप-पट्ट्यांचे मंडल करा. (अशा सात्त्विक नामजप-पट्ट्या सनातनच्या विक्रीकेंद्रांत मिळतात.)
- दिवसभरात स्वतःकडून घडलेल्या चुकांविषयी देवाची क्षमा मागा.
- उपास्यदेवतेला प्रार्थना करा, ‘तुझे संरक्षककवच माझ्याभोवती सतत असू दे आणि झोपेतही माझा नामजप अखंड चालू राहू दे.’
- पूर्व-पश्चिम दिशेने आणि शक्यतो डाव्या कुशीवर झोपा.
- तिरपे, उताणे, दक्षिणेकडे पाय करून, तसेच अगदी देवासमोर झोपू नका.
- झोपतांना चित्रपटगीते आदी ऐकू नका, तर नामजप किंवा संतांनी गायलेली भजने ऐका.
षड्चक्रांपैकी संबंधित चक्रावर ध्यान करून रोगमुक्ती !
ज्या अवयवाचा रोग झाला असेल, त्या अवयवावर आणि त्या अवयवाचे नियंत्रण करणार्या शरिरातील सूक्ष्म चक्रावर धारणा करावी. आपली प्राणशक्ती आणि मनःशक्ती त्या अवयवावर दृष्टी एकाग्र करून किंवा त्या अवयवावर हात ठेवून केंद्रीत करावी अन् ‘तो अवयव लवकर आरोग्यसंपन्न व्हावा’, अशी मनोमन प्रार्थना करावी. रोगी बेशुद्ध असल्यास नातेवाइकाने रोग्याच्या हृदयावर हात ठेवून गुरुमंत्र किंवा कुलदेवतेचा जप मनात म्हणत, दृष्टी रोग्याच्या हृदयावर स्थिर करून, मानसिक शक्ती दृष्टी आणि हात यांच्या माध्यमातून रोग्याच्या हृदयाकडे प्रसारित करावी.
जननेंद्रियांच्या विकारांत जननेंद्रियावर आणि स्वाधिष्ठान चक्रावर ध्यान करावे. स्वरयंत्राचे विकार असल्यास स्वरयंत्रावर आणि विशुद्ध चक्रावर ध्यान करावे. आतड्यांचे विकार असल्यास मणिपूर चक्रावर ध्यान करावे.
व्यायाम आणि योगाभ्यास
सकाळी रिकाम्या पोटी तेलाने मसाज करून व्यायाम करावा. रात्रीच्या झोपेत रक्तात शोषलेले अन्नघटक खर्च होत नाहीत. झोपून उठल्यावर शरिराला जडपणा आलेला असतो. ते घटक नीट पचवून आत्मसात होण्यासाठी सकाळीच व्यायाम करण्याची आवश्यकता असते. हेमंत आणि शिशिर ऋतूत, म्हणजे थंडीच्या दिवसात व्यायाम केल्याने उष्णता निर्माण होते आणि दिवसभर टिकते. वसंत ऋतूतही शरिरात कफाचा प्रकोप होत असल्याने या काळातही व्यायाम करावा. ग्रीष्म, वर्षा आणि शरद या ऋतूंत अल्प व्यायाम करावा. व्यायामानंतर शरिरास क्लेष होणार नाहीत अशा प्रकारे अंग रगडून घ्यावे.
व्यायामाने शरिरास हलकेपणा येतो. कर्मसामर्थ्य वाढते. चरबी न्यून होते. अग्नि वाढून भूक लागते. उष्णता वाढून पचन होते. त्वचेस कांती येते. आळस जातो. हाडे आणि मणके आरोग्यवान होतात. सांध्ो स्थिर होऊन त्यांची क्षमता वाढते. वाढलेले वात-पित्त-कफ यांचा क्षय होतो. फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते. रक्तदाब न्यून होतो. हृदयविकार, पक्षाघात, कर्करोग होण्याची शक्यता अल्प रहाते. मधुमेह नियंत्रित रहातो. मनोबल आणि आत्मविश्वास वाढतो. दुःख सहन करण्याची क्षमता वाढते.
कोणत्या रोगांवर कोणती आसने उपयुक्त ?
- थायरॉइड : या रोगासाठी शीर्षासन, सर्वांगासन, सिंहमुद्रा, हलासन ही आसने उपयुक्त आहेत.
- अपचन : अग्निसार, सर्वांगासन, मयूरासन, हलासन, धनुरासन आणि उड्डियान बंध
- जननेंद्रियाचे विकार : शीर्षासन, उड्डियान बंध, योगमुद्रा, पश्चिमोत्तानासन, स्वस्तिकासन
- मलावरोध : वक्रासन, योगमुद्रा, हलासन
- स्वादुपिंडाचे विकार : मयुरासन, पवनमुक्तासन आणि उड्डियान बंध
- स्पाँडिलायटिस : मत्स्यासन
- दमा : कपालभाती, मत्स्यासन
- पाठदुखी : धनुरासन, भुजंगासन, चक्रासन
- मासिक पाळीचे विकार : पश्चिमोत्तानासन