जम्मू-काश्मीरला पुन्हा विशेष दर्जा मिळत नाही, तोपर्यंत राज्यात निवडणुका लढवणार नाही ! – पीडीपी अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती यांची घोषणा

‘सुंठीवाचून खोकला गेला’, असेच या घोषणेविषयी म्हणता येईल !

पीडीपी अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – जोपर्यंत जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा बहाल केला जात नाही, तोपर्यंत माझा पक्ष कोणतीही निवडणूक लढवणार नाही, अशी घोषणा पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या (पीडीपीच्या) अध्यक्ष आणि जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी केली आहे.
मुफ्ती म्हणाल्या की, मी केंद्रशासित प्रदेशांतर्गत कोणतीही निवडणूक लढवणार नाही, हे मी अनेकदा स्पष्ट केले आहे; परंतु त्याचवेळी आम्ही कुणालाही राजकीय जागा घेण्यास अनुमती देणार नाही, याची जाणीव माझ्या पक्षाला आहे. आम्ही गेल्या वर्षी जिल्हा विकास परिषद निवडणूक लढवली होती. अशाच प्रकारे विधानसभा निवडणुका घोषित झाल्यास पक्षाचे पदाधिकारी बसून चर्चा करतील. (‘पीडीपी निवडणुका लढवणार’, असाच यातून अर्थ काढता येईल. मेहबूबा मुफ्ती यांची निवडणुका न लढवण्याची घोषणा म्हणजे केवळ नाटक आहे, असेच म्हणता येईल ! – संपादक)