श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीवर राजकीय व्यक्तीच्या नियुक्तीस ‘विश्व वारकरी सेने’चा विरोध
असा विरोध का करावा लागतो ? प्रशासनाच्या ते लक्षात येत नाही का ?
पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अध्यक्षपदी राजकीय व्यक्तीची नियुक्ती न करता, वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ महाराजांची नियुक्ती करावी, अन्यथा ‘विश्व वारकरी सेना’ राज्य सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन करेल, अशी चेतावणी संघटनेचे अध्यक्ष तुकाराम भोसले यांनी दिली. राज्य सरकारने काही विकास मंडळे आणि प्रमुख देवस्थान समित्या यांची नव्याने रचना करण्याची सिद्धता चालू केली आहे. यामध्ये पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी देवस्थान काँग्रेसच्या वाट्याला आले आहे. त्यादृष्टीने पक्षाच्या वतीने अध्यक्षपदासाठी काही नावे समोर येत आहेत.
विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती अध्यक्षपद काँग्रेसकडे, वारकरी संप्रदाय म्हणतो राजकीय नेता नको https://t.co/agJ2g70X1s #Pandharpur | #VitthalMandir | #Varkari
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 24, 2021
मंदिर समितीच्या अध्यक्षपदी राजकीय व्यक्तीच्या नावाला वारकरी आणि विविध वारकरी संघटना यांच्याकडून विरोध होत आहे. या संदर्भात २४ जून या दिवशी येथील संत मुक्ताबाई महाराज मठामध्ये ‘विश्व वारकरी सेने’च्या पदाधिकार्यांची बैठक झाली. या बैठकीत अध्यक्ष तुकाराम भोसले म्हणाले की, राजकीय व्यक्तीच्या पुनर्वसनासाठी सरकारकडे अनेक समित्या आणि महामंडळे आहेत. त्या ठिकाणी त्यांची नियुक्ती करावी. वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान असलेल्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीवर वारीची परंपरा आणि भागवत धर्माचा प्रचार अन् प्रसार करणार्या एखाद्या ज्येष्ठ वारकरी महाराजांची नियुक्ती करावी, अन्यथा राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन केले जाईल.