कोल्हापूरच्या अस्मितेस कोणीही डिवचण्याचा प्रयत्न केल्यास शिवसेना खपवून घेणार नाही ! – राजेश क्षीरसागर, कार्यकारी अध्यक्ष, राज्य नियोजन मंडळ
कोल्हापूरच्या स्वागत कमानीवर शिवसेनेकडून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नावाचा फलक
कोल्हापूर, २६ जून – राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे कोल्हापूरचा अभिमान आहेत. त्यांच्या विचाराने आजपर्यंत आम्ही शिवसैनिक काम करत आलो आहोत. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी त्यांचा स्वाभिमान अखंड जगाला दाखवला असतांना, कुणी उद्योगपती कोल्हापूरच्या स्वाभिमानाला डिवचून कोल्हापूरच्या प्रवेशद्वारावर विज्ञापन फलक लावत असेल, तर शिवसेना कदापि खपवून घेणार नाही, अशी चेतावणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांनी दिली. कोल्हापूरच्या प्रवेशद्वारावर शिवसेनेच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नावाचा फलक २५ जून या दिवशी लावण्यात आला.
शिवसैनिकांनी छत्रपती शाहू महाराज जयंतीच्या पूर्वसंध्येलाच हा फलक बदलल्याने शाहूप्रेमी, तसेच कोल्हापूरकरांकडून शिवसेनेवर कौतुकाचा वर्षाव होत होता.https://t.co/SjBwXLIRIT
— Saamana (@SaamanaOnline) June 26, 2021
गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूर शहराच्या प्रवेशद्वारावर एका उद्योगपतीच्या नावाचा फलक झळकत होता. याविषयी समस्त कोल्हापूरवासियांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. कोल्हापूरचा स्वाभिमान आणि अस्मिता दाखवून देण्यासाठी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली शहर शिवसेनेच्या वतीने कोल्हापूरच्या प्रवेशद्वाराचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज असे नामकरण करत त्यांच्या नावाचा फलक लावण्यात आला. या वेळी ‘जय भवानी, जय शिवाजी’, तसेच राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या.
या प्रसंगी माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, शिवसेना उपशहरप्रमुख जयवंत हारुगले, तुकाराम साळोखे, दीपक चव्हाण, किशोर घाटगे आणि शिवसेना युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.