आमदार उदयसिंह राजपूत यांच्या चापानेर येथील महाविद्यालयास पायाभूत सुविधांवरून खंडपिठात आव्हान !
राज्य सरकारसह कुलगुरूंना नोटीस !
संभाजीनगर – येथील कन्नडचे शिवसेनेचे आमदार उदयसिंह राजपूत यांच्या संस्थेस राजकीय क्षेत्रातील व्यक्ती म्हणूनच ५ महाविद्यालये संमत करण्यात आलेली असून त्यामधील चापानेर येथील महाविद्यालयास दिलेल्या इरादा पत्रास पायाभूत सुविधांवरून मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठात आव्हान देण्यात आलेले आहे. या प्रकरणातील सुनावणीत खंडपिठाचे न्यायमूर्ती एस्.व्ही. गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती एम्.जी. सेवलीकर यांनी ‘संस्थेस मिळालेल्या इरादापत्राचे भवितव्य न्यायालयाच्या न्यायप्रविष्ट याचिकेच्या निर्णयावर अवलंबून असेल’, असा अंतरिम आदेश देत राज्य सरकार, उच्च शिक्षण विभागाचे संचालक, उपसंचालक संभाजीनगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाचे कुलगुरु आणि संस्थेच्या वतीने आमदार राजपूत या प्रतिवादींना नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत.
१. या प्रकरणी हनुमान सांस्कृतिक आणि शैक्षणिक मंडळाचे सचिव शरद नारायणराव पवार यांनी अधिवक्ता संदीप बी. राजेभोसले यांच्याद्वारे खंडपिठात याचिका प्रविष्ट केली आहे.
२. याचिकेनुसार शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासून नवीन महाविद्यालयासाठी महाराष्ट्र शासनाच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने चापानेर या गावात चित्राई कला आणि वाणिज्य महाविद्यालय चालू करण्यास आमदार राजपूत हे अध्यक्ष असलेल्या नागद येथील श्रद्धा शैक्षणिक आणि बहुउद्देशीय प्रतिष्ठान या संस्थेस इरादा पत्र दिलेले आहे.
३. आमदार राजपूत यांनी राजकीय शक्तीचे वजन वापरलेले आहे. आमदारांच्या प्रस्तावित महाविद्यालयात पायाभूत सुविधा नाहीत.
४. याचिकाकर्त्यांच्या महाविद्यालयाचा प्रस्ताव आमदार राजपूत यांच्या शैक्षणिक संस्थेपेक्षा चांगला असतांना कुठलेही सबळ कारण न देता केवळ राजकीय हेतूने प्रेरित होऊन आणि श्रद्धा शैक्षणिक बहुउद्देशीय प्रतिष्ठान यांचा प्रस्ताव हा शासन निकषात बसत नसतांनाही त्यांच्या संस्थेस इरादापत्र देण्यात आलेले आहे.
५. या आणि इतर सूत्रावर आमदार राजपूत यांच्या संस्थेच्या इरादापत्रास आव्हान दिले आहे. या प्रकरणी खंडपिठाने वरीलप्रमाणे आदेश दिला आहे. पुढील सुनावणी १६ जुलै या दिवशी होणार आहे.