आषाढी वारीत सहभागी होण्यासाठी शिवछत्रपतींच्या पादुकांचे किल्ले शिवनेरीहून रायगडाकडे प्रस्थान !
जुन्नर (पुणे), २५ जून – पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी होण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पादुकांचे किल्ले शिवनेरीहून रायगडच्या दिशेने २४ जून या दिवशी प्रस्थान झाले. शिवछत्रपतींच्या पालखी सोहळ्याचे यंदाचे सातवे वर्ष आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर केवळ पाचच शिवभक्त श्री शिवछत्रपतींच्या पादुकांवर रुद्राभिषेक झाल्यानंतर शिवाई देवीची महापूजा, महाद्वार पूजन झाल्यानंतर रायगडच्या दिशेने प्रतिकात्मक सहस्र पावले चालून पुढे वाहनाने मार्गस्थ झाले.
शिवनेरीहून निघालेल्या पादुका मंचर, खेड, पुणे मार्गे श्री शंभुराजांच्या जन्मभूमी असलेल्या पुरंदर गडावर विसावा घेऊन पुढे राज्याभिषेक महोत्सवासाठी रायगडला पोचतील. शक्ति परंपरेतील शिवरायांच्या पादुका प्रतिवर्षी आषाढी वारीच्या निमित्ताने भक्तिसागरात सामील होण्यासाठी शिवनेरीहुन संग्रामदुर्ग, मल्हारगड, पुरंदर, रायरेश्वर असा प्रवास करून रायगडला जातात. राज्याभिषेकापासून पुढील ५ दिवस रायगडावरच विसावा घेऊन ज्येष्ठ वद्य चतुर्थीला श्रीक्षेत्र पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करतात. आषाढी वारी पूर्ण झाल्यानंतर पुढील वर्षभरासाठी पादुका शिवजन्मभूमीत परत येतात.