‘गोमेकॉ’चा ‘सुपर स्पेशालिटी’ विभाग आणि दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालय यांच्या व्यतिरिक्त अन्य सर्व शासकीय रुग्णालयांचा ‘कोरोना रुग्णालया’चा दर्जा हटवला
पणजी, २४ जून (वार्ता.) – राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याची चिन्हे असल्याने राज्यशासनाने २४ जून या दिवशी राज्यातील ‘गोमेकॉ’चा बांबोळी येथील ‘सुपर स्पेशालिटी’ विभाग आणि दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालय यांच्या व्यतिरिक्त अन्य सर्व शासकीय रुग्णालयांचा ‘कोरोना रुग्णालया’चा दर्जा हटवला आहे.
‘गोमेकॉ’चा बांबोळी येथील ‘सुपर स्पेशालिटी’ विभाग आणि दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालय ही दोन्ही रुग्णालये ‘कोरोना रुग्णालये’ म्हणून कार्यरत रहाणार आहेत. ‘कोरोना रुग्णालया’चा दर्जा हटवण्यात आलेल्या रुग्णालयातील कोरोनाबाधित रुग्णांना उपचारांसाठी उपरोल्लेखित ‘कोरोना रुग्णालया’त हालवण्यास सांगण्यात आले आहे; मात्र ज्या खासगी रुग्णालयांकडे कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्याची क्षमता आहे, त्यांना तशी अनुमती देण्यात आली आहे.
राज्यात कोरोनाबाधित २२९ नवीन रुग्ण, तर कोरोनाबाधित ९ रुग्णांचे निधन
राज्यात २४ जून या दिवशी कोरोनाच्या ३ सहस्र ५९६ चाचण्या करण्यात आल्या, तर यामध्ये कोरोनाबाधित २२९ नवीन रुग्ण (कोरोनाबाधित रुग्ण सापडण्याची टक्केवारी ६.३ टक्के) सापडले. कोरोनापासून २५८ रुग्ण बरे झाले, तर प्रत्यक्ष उपचार चालू असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २ सहस्र ७२७ झाली आहे. २४ जून या दिवशी कोरोनाबाधित ९ रुग्णांचे निधन झाल्याने कोरोनाची लागण झाल्याने मृत पावलेल्यांची एकूण संख्या ३ सहस्र २२ झाली आहे.