विशाळगडावरील अतिक्रमणे हटवून नरवीरांची समाधीस्थळे आणि हिंदूंची मंदिरे यांचा जिर्णाेद्धार करा ! – बजरंग दलाचे नायब तहसीलदारांना निवेदन
कागल (जिल्हा कोल्हापूर), २५ जून (वार्ता.) – हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडी तालुक्यातील विशाळगड किल्ला पुरातत्व विभाग आणि जिल्हा प्रशासन यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे. तेथील समाधीस्थळे आणि मंदिरे यांची दुरवस्था झाली आहे. तरी विशाळगडावरील अतिक्रमणे हटवून नरवीरांची समाधीस्थळे आणि हिंदूंची मंदिरे यांचा जिर्णाेद्धार करावा, या मागणीचे निवेदन बजरंग दलाच्या कसबा सांगाव शाखेच्या वतीने नायब तहसीलदार शिवाजीराव गवळी यांना देण्यात आले.
मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एकीकडे राज्य सरकारने ‘गडकोट संवर्धन मोहीम’ हाती घेतली आहे आणि दुसरीकडे विशाळगडाच्या ऐतिहासिक वारशाकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. ही गोष्ट गंभीर असून शिवभक्तांच्या भावना दुखावणारी आहे. या वेळी बजरंग दलाचे श्री. विनायक आवळे, श्री. प्रवीण माळी, श्री. दीपक माने, श्री. राहुल कोळी, कागल शिवसेना उपशहरप्रमुख श्री. प्रभाकर थोरात, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कागल येथील श्री. अनिल चव्हाण आणि कसबा सांगाव येथील श्री. कैलास खोत, हिंदुत्वनिष्ठ दीपक भोपळे उपस्थित होते.