जिहादी आतंकवादी हाफीज सईद याच्या घराबाहेर पाक सैन्यानेच बॉम्बस्फोट घडवल्याची शक्यता

लाहोर (पाकिस्तान) – येथील जौहर टाऊनमधील अकबर चौकात असणार्‍या जिहादी आतंकवादी हाफीज सईद याच्या घराबाहेर ३ दिवसांपूर्वी झालेला बॉम्बस्फोट हा पाकच्या सैन्यानेच घडवून आणल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या स्फोटात ४ जण ठार, तर १४ जण घायाळ झाले होते.

मे मासाच्या तिसर्‍या आठवड्यामध्ये पाकिस्तानी सैन्य, आय.एस्.आय. आणि जिहादी आतंकवादी संघटनांचे प्रमुख यांची पाकव्याप्त काश्मीरमध्ये एक बैठक झाली होती. या बैठकीमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या काही म्होरक्यांना ‘काश्मीरमध्ये आतंकवाद्यांची घुसखोरी अल्प का झाली ? मागील दीड वर्षामध्ये काश्मीरमध्ये कोणतेही मोठे आक्रमण का करण्यात आले नाही?,’ असे प्रश्‍न पाक सैन्याच्या अधिकार्‍यांकडून विचारण्यात आले. याला उत्तर देतांना म्होरक्यांनी आर्थिक चणचण असल्याचे कारण दिले. यावरून पाक सैन्याधिकारी आणि हे म्होरके यांच्यामध्ये वाद झाला. ‘खोटी कारणे न देता काश्मीरमध्ये घुसखोरी कशी करता येईल ? यासंदर्भातील माहिती द्यावी’, असे सैन्याधिकार्‍यांनी त्यांना सांगितले. या वादानंतर काही दिवसांनी पाक सैन्याकडून ‘ऑपरेशन ताशकीर-ए-जबल’ चालू करण्यात आले. डोंगराळ भागांमधील युद्ध अभ्यासाच्या नावाखाली हे ‘ऑपरेशन’ चालू करण्यात आले. याद्वारेच पाक सैन्याने हाफीज सईद याला धडा शिकवण्यासाठी त्याच्या घराबाहेर स्फोट घडवून आणल्याचे सांगितले जात आहे.