नगर येथील नारायणगीरी महाराज गुरुकुलमधील विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासमवेतच इंग्रजी भाषेतून कीर्तन करण्याचे प्रशिक्षण

संताची महती, तसेच आपल्या देशाची संस्कृती, संस्कार यांचा लौकिक साता समुद्रापार पोचवण्याचा गुरुकुलाचा उद्देश

नगर (शिर्डी), २४ जून – संतांची शिकवण आणि त्यांचा महिमा उच्च शिक्षित परदेशी लोकांनाही समजावा म्हणून शिर्डी जवळच्या बाबळेश्वर येथील नारायणगीरी महाराज गुरुकुलमधील विद्यार्थ्यांना गुरुकुलचे संस्थापक ह.भ.प. नवनाथ म्हस्के आणि भगवान महाराज ढमाले यांच्या मार्गदर्शाखाली इंग्रजीतून कीर्तन करण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. इयत्ता तिसरी ते पदवीधर, पदव्युत्तर असे ४० विद्यार्थी या संस्थेत प्रशिक्षण घेत आहेत. अध्यात्म, कला, विज्ञान यांची सांगड घालत कालानुरूप पुढचे पाऊल टाकत २० विद्यार्थ्यांचा संघ इंग्रजीतून कीर्तन करण्यास सिद्ध झाला आहे.

शालेय शिक्षणाच्या समवेतच वारकरी सांप्रदायिक संतांचे साहित्य विद्यार्थ्यांना शिकवून विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षित कीर्तनकार व्हावे. मराठी, हिंदी तसेच इंग्रजी भाषेमध्ये कीर्तन करून आपल्या देशाची संस्कृती, संस्कार यांचा लौकिक परदेशीसुद्धा पसरवावा हा या गुरुकुलाचा मुख्य उद्देश आहे.

नवनाथ म्हस्के यांनी सांगितले की, आताच्या ‘ग्लोबल वॉर्मिंग आणि आतंकवाद यांसारख्या समस्यांवर प्रबोधन करणे, हेच या नविन इंग्रजी कीर्तन शिक्षणातून केले जात आहे. ‘ग्लोबल वॉर्र्मिंग’ म्हणजे पृथ्वीवरील तापमान वाढ, जे शांत करण्याचे काम वृक्ष करतात. या समस्येवर उपाय ३५० वर्षांपूर्वी संत तुकाराम महाराजांच्या ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ या अभंगातून मिळतो.

ते पुढे म्हणतात, ‘‘आतंकवादाची समस्या संपवण्यासाठी आतंकवादी माणूस नाही तर दुष्टांमधील दुष्ट प्रवृत्ती संपवावी लागेल, अशी विनंती संत ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदानातून केली आहे.
जे खळांची व्यंकटी सांडो | तया सत्कर्मीं रती वाढो || भूतां परस्परें जडो | मैत्र जीवांचें ||

ज्या व्यक्ती खळ (वाईट प्रवृत्तीच्या) आहेत त्यांच्यातील खलत्व (वाईट प्रवृत्ती) नुसतीच जावो (नष्ट होवो) नव्हे, तर त्यांची प्रवृत्ती सत्प्रवृत्तीत परावर्तित व्हावी आणि याची फलश्रुती म्हणजे सर्वच व्यक्ती सर्वांचे मित्र होवोत !

म्हणजे या समस्यांवर संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांनी त्या काळी उपाय सांगून ठेवले आहेत. त्यामुळे आताच्या कीर्तनातून याच संताच्या ओव्या इंग्रजीतून समाजातील उच्च शिक्षितांना समजावून सांगितल्या जातील.