रणलक्ष्मी झाशीची राणी लक्ष्मीबाई आपणांस विनम्र अभिवादन !
१७ जून या दिवशी झालेल्या राणी लक्ष्मीबाई बलीदानदिनानिमित्ताने…
१७ जून १८५८ चे वर्णन स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांच्या शब्दांत (सारांश रूपाने)
…रक्ताने लालभडक पडलेली ती रणलक्ष्मी रणशय्येवर पहुडली आणि तिच्या मृण्मय पिंजर्यातून उडून तिचा तो दिव्य आत्मा चिन्मयरूपी सारूप्य पावता झाला… लक्ष्मीराणी कृतकृत्य झाली ! जातीने स्त्री, वयाने पंचविशीच्या आत, रूपाने खूबसूरत, वर्तनाने मनमोहक, आचरणाने सत्यशील, राज्यांचे नियमन सामर्थ्य, प्रजेची प्रीती, स्वदेश भक्तीची जाज्वल्य ज्वाळा, स्वातंत्र्याची स्वतंत्रता, मानाची माननीयता रणांची रणलक्ष्मी ! लक्ष्मीराणी, तुझ्यासारख्यांच्या संभवाने या जड पृथ्वीला वसुंधरा म्हणतात… राणी लक्ष्मीच्या अंगात जे रक्त खेळत होते, ते रक्त, ते बीज, ते तेज आमचे आहे. ही यथार्थ गर्वोक्ती करण्याचे भाग्य, हे भारत भू तुझे आहे ! वीरप्रसव भारतभू, तुला दृष्ट न लागो, तुझी सर्व इडापिडा टळो !
श्री. श्रीकांत ताम्हणकर, पुणे (साभार : ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’)